
कोरोनाच्या रूग्णवाढीला काही प्रमाणात सुरूवात झालेली निदर्शनास येत असून, कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोव्हीड टेस्टींगमध्ये वाढ करण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कोव्हीड उपचार केंद्रांमधील सुविधाही कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच सर्व रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, मुख्यालय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी व सर्व २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करीत गुरूवारी कोरोना स्थितीचा विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला. यामध्ये आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेताना त्यांच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या टेस्टींग व त्यामधील पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केले व तेथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी स्थानिक आरोग्य स्थितीविषयी विभागवार माहिती घेतली.
पॉजिटिव्ह रुग्णांचे ७ दिवस गृहविलगीकरण
टेस्टींगमध्ये आढळणाऱ्या पॉजिटिव्ह रुग्णांवरील उपचार आणि त्या रुग्णांचे ७ दिवस गृहविलगीकरण करणे तसेच सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्याही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड रूग्ण यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे त्यांनी निर्देशित केले.
सार्वजनिक रूग्णालयांमध्ये बेड्स राखीव
महापालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरूळ येथील तिन्ही सार्वजनिक रूग्णालयांच्या ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी एकूण ५० बेड्सची सुविधा कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी सद्यस्थितीत कार्यान्वित आहे. तथापि वाढत्या रुग्णसंख्येची व्याप्ती पाहता सर्व रुग्णालये सुसज्ज असल्याची खात्री करून घ्यावी असे आयुक्तांनी आरोग्य विभागास निर्देश दिले व अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांना याबाबतचा आढावा घेण्यास सांगितले. याशिवाय सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथील अतिदक्षता विभाग सुविधेतील ७५ बेड्स सर्व अत्यावश्यक सुविधानी सुसज्ज असल्याची पडताळणी करून घ्यावी व आवश्यकता भासल्यास ते तत्परतेने सुरू करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्यास आयुक्तांनी सांगितले.