अनावश्यक उड्डाणपुलासाठी एकही झाड तोडू देणार नाही;आमदार गणेश नाईक

अनावश्यक उड्डाणपुलासाठी एकही झाड तोडू देणार नाही;आमदार गणेश नाईक

राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून नवी मुंबईची सुरू असलेली लूट आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी याविरोधात नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनजागृती लाँग मार्चला अभूतपूर्व प्रतिसाद नवी मुंबईकरांकडून लाभला. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात हा लाँग मार्च काढण्यात आला होता. नवी मुंबईची लूट थांबविण्याचा खणखणीत इशारा देतानाच नाईक यांनी अनावश्यक उड्डाणपुलासाठी एकही झाड तोडू देणार नाही, असे निक्षून सांगितले.

नवी मुंबईवर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून नवी मुंबई भाजपच्या वतीने जनजागृती अभियान सुरू करण्यात आले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन लाँग मार्च शुभारंभ करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रबाळे येथे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागात वृक्षारोपण करण्यात आले. लाँग मार्चची सांगता वाशीच्या अरेंजा कॉर्नर येथे सभेत रूपांतर होऊन झाली.

आमदार गणेश नाईक, भाजप नेते आशिष शेलार, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, दशरथ भगत भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. मागील दोन वर्षात नवी मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत नवी मुंबईची प्रचंड लूट सुरू असून नवी मुंबईकरांचे सुख आणि समाधान हिरावून घेतले जात असल्याचा घणाघात नाईक यांनी केला.

नवी मुंबईचे नाक समजल्या जाणाऱ्या वाशी येथे अनावश्यक बायोगॅस प्रकल्प लादला जात आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईमध्ये भविष्यात प्रचंड दुर्गंधी निर्माण होणार असून वर्षीचा गॅस चेंबर होण्याचा धोका आहे. अतिशय मोक्याची जागा ठेकेदाराच्या घशात घातली जात असून या जागेतून नवी मुंबई पालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळू शकते. हे सर्व अनावश्यक प्रकल्प रद्द झालेच पाहिजे,” अशी मागणी गणेश नाईक यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in