उद्विग्न सत्ताबाजार !

बातम्यांऐवजी विकृतीतल्या एकनाथाच्या बंडाचं भारुड ऐकवलं आणि दाखवलं जात होतं.
उद्विग्न सत्ताबाजार !

राज्याचे राजकारण शिवसेनेतल्या आमदारांच्या बंडानं ढवळून निघालंय. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महाराष्ट्र धर्माची संस्कृती असलेल्या ग्यानबा तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान आणि प्रयाण यांच्या बातम्यांऐवजी विकृतीतल्या एकनाथाच्या बंडाचं भारुड ऐकवलं आणि दाखवलं जात होतं. शिवसेनेला बंड हे काही नवं नाही. अशी अनेक बंडं पचवलीत. अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच हे होत आलंय. शिवसेनेच्या स्थापनेतले शिवसेनाप्रमुखांचे सहकारी घाटकोपरचे माधव देशपांडे यांनीच सामूहिक नेतृत्व हवंय म्हणत पहिल्यांदा बंड केलं होतं. आग्रही हिंदुत्व आणि हत्यारांचं प्रशिक्षण या मुद्द्यांवर बंडू शिंगरे आणि भाई शिंगरे या दोघांनी बंड केलं होतं. त्यांनी ‘प्रति शिवसेना’ स्थापन केली होती; पण त्यांच्यामागे कोणी गेलं नाही. दुसरीकडं शिवसेना मात्र वाढतच गेली. मुंबई महापालिकेवर भगवा फडकला. डॉ. हेमचंद्र गुप्ते पहिले महापौर बनले. आणीबाणीत शिवसेनेनं शिवसैनिकांना कारागृहात जायला लागू नये म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला; पण शिवसेनेनं जनता पक्षात सहभागी व्हावं, असा आग्रह धरत महापौर गुप्ते, दत्ता प्रधान आदी मंडळींनी बंड केलं; पण ते मोडून काढलं गेलं. पुढे गुप्ते, प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अस्तित्व राहिलं नाही. राजकारणातून दूर फेकले गेले. असे काही लहान-मोठे आघात शिवसेनेवर झाले. ठाण्यात पक्षविरोधात मतदान करणाऱ्या श्रीधर खोपकर याची हत्या केली गेली ‘गद्दारांना क्षमा नाही!’ असं म्हणत आनंद दिघे यांनी एक वेगळं वातावरण निर्माण केल्यानं त्यानंतरच्या काळात शिवसेनेत कुणी बंड करायचा विचारही केला नाही. छगन भुजबळ यांनी केलेलं बंड हे त्यानंतरचं मोठं बंड! १९९०च्या विधिमंडळातल्या १८ आमदारांना घेऊन ते काँग्रेसवासी झाले. त्यावेळी मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. ते पद त्यांना हवं होतं, ते न मिळाल्यानं त्यांनी मंडल आयोगाचं निमित्त करून शिवसेना सोडली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फुटलेला एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. ते राजकारणातून बाद झाले. अगदी भुजबळांचा माझगाव या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात बाळा नांदगावकर या तरुण शिवसैनिकानं त्यांचा पराभव केला. भुजबळांनी मग मुंबईऐवजी नाशिक हे कार्यक्षेत्र निवडलं. त्यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. १९९८च्या दरम्यान नव्या मुंबईतले गणेश नाईक यांनी बंड पुकारलं. नवी संघटना स्थापन केली; पण १९९९च्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेनं पराभव केला. यानंतरचं बंड हे नारायण राणे यांचं! २००५मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानं ११ आमदारांसह त्यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर झालेली पोटनिवडणूक वगळता आजवर राणे यांना कधीच निवडून येता आलेलं नाही. त्यांच्या साथीनं बंड केलेल्या ११ आमदारांनाही कधीच निवडून येता आलेलं नाही. किंबहुना, त्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आलं. हे सारे बंड शिवसेना विरोधी पक्षात असताना झाले होते. आताचं एकनाथ शिंदे यांचं बंड हे सत्ता असताना झालेलं आहे. ही सत्तेसाठीची साठमारी आहे. शिंदे यांच्यासोबत बंड करणारे हे आमदार हे खरे बंडखोर नाहीत, यांना ब्लॅकमेल केलं गेलंय, हे स्पष्टपणे दिसतंय. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यासारख्या यंत्रणांकडून त्यांच्या गळ्याला फास आवळला गेलाय आणि या फासाचा दोर आहे तो केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हाती! तो हळूहळू आवळला जातोय, त्यामुळं एक-एक जण गळाला लागतोय. या बंडातल्या अनेकांना जसं की, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यामिनी जाधव अगदी एकनाथ शिंदेचे आर्थिक व्यवहार पाहणारे सचिन जोशी यांनाही घेरलं आहे. ते सध्या बेपत्ता आहेत. अशा बातम्या आल्यात. त्यामुळं त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. याचं कारण यापूर्वी ज्या भाजपनेत्यांनी नारायण राणे, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील अशा अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ईडी वा तत्सम तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा सुरू झाल्या; मात्र या साऱ्यांनी भाजपला जवळ केल्यानं त्यांच्या चौकश्या थांबल्या. शिवसेनेतल्या अनेकांचा भूतकाळ हा अत्यंत सामान्य राहिला आहे. १२ बलुतेदारातल्या, सामान्य घरातल्या, कुणी रिक्षाचालक, कुणी भाजीविक्रेता, कुणी कामगार, कुणी पानपट्टीवाला अशाप्रकारच्या अनेक कुसाबाहेरच्या तरुणांना शिवसेनेचा परिसस्पर्श झाल्यानं त्यांचं जीवन उजळलं. लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार, मंत्री बनले. ते करोडपती, अब्जोपती बनले हे भाजपला माहीत असल्यानं त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना घेरायला सुरुवात केली. आपण भाजपसोबत गेलो तरच आपल्या मागचा हा चौकशीचा ससेमिरा संपेल आणि तसं दिसून आल्यानं या सेनेच्या नवश्रीमंतांनी भाजपबरोबर जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या मतदारांच्या, शिवसैनिकांच्या मानसिकतेला वेठीला धरलं आणि शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. रिक्षाचालक असलेल्या शिंद्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभं केलंय. त्यांची अमाप संपत्ती हा चर्चेचा विषय बनलाय. शिवाय शिंदेंची एनआयएकडून चौकशी सुरू झाली होती, असं सांगितलं जातंय. संजय निरुपम यांनी असा आरोप केला आहे की, अंबानींच्या घराजवळ जी स्फोटकं-जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, त्या कुणा व्यक्तीला नाही तर कंपन्यांना दिल्या जातात. ती स्फोटकं ज्या कंपनीला दिली होती, ती कंपनीशी शिंदे यांचा संबंध आहे. हे खरं खोटं निरुपम हेच जाणो. शिंदेंच्या बंडाची कुणकुण मुख्यमंत्र्यांना लागली होती. पोलिसी यंत्रणांनी याबाबतची माहिती त्यांना दिली होती. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावून घेतलं. आपल्याला अशी माहिती मिळालीय की, अशाप्रकारे काहीतरी चाललंय, हे कितपत खरं आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी शिंदे अडखळले. त्यांना असं काही विचारलं जाईल याची कल्पना नव्हती. शिंदेंनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यासमोर असं काहीही नाही. मी तुमच्या कुटुंबातला आहे. शिवसेनाप्रमुख हे माझं दैवत आहे. मला सारं काही मिळालंय, मी असं का करीन? तुम्हाला कुणीतरी खोटंनाटं सांगतंय, असं रडत रडत सांगितलं. उद्धव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणाले, असो, आपल्यावर भाजपचं लक्ष आहे. आता राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. त्यावर लक्ष ठेव, सगळ्या आमदारांशी संपर्क ठेवून कुठेही दगाफटका होणार नाही याची दक्षता घे! असं सांगितलं आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी म्हणजे ठाकरेंनीच या बंडासाठी शिंदेंना संधी दिली. हीच संधी साधून शिंदेंनी साऱ्या आमदारांशी संपर्क साधून बंडाची रचना केली. अर्थात, त्यासाठी भाजपनेत्यांच्या सहकार्यानं अंमलबजावणी केली आणि सुरत गाठली, पुढं गुवाहाटी जवळ केली. जवळपास तीन वर्षे सत्तेचा उपभोग आणि मंत्रिपदाच्या खुर्च्या उबवल्यानंतर अचानक त्यांना हिंदुत्वाची, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण झाली. आपण काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी केलेली युती ही अनैसर्गिक आहे, अशी जाणीव त्यांना झाली. आपण भाजपसोबत जायला हवं, अशी भूमिका घेत या आमदारांनी बंड पुकारलं. शिवसेनेतल्या ‘रंकाचे राव’ झालेल्यांनी हिंदुत्वासाठी बंड करत असल्याचा देखावा निर्माण करत असले तरी त्याआडून चौकशीचा ससेमिरा वाचविण्यासाठीच हे नाट्य उभं केलं असल्याचं दिसून येतंय. त्यामुळं राज्यात अस्थिरता, तणाव निर्माण झालाय. या बंडखोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनं शिवसेनेला संपविण्याचा डाव टाकलाय.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in