बाईपण भारी देवा..!
कोटीचा गल्ला आणि भावनांवर हल्ला

बाईपण भारी देवा..! कोटीचा गल्ला आणि भावनांवर हल्ला

सिनेमातील अभिनय आणि बाहेरचं वास्तव कितीही मिळतंजुळतं असलं तरी ते पूर्णत: खरं नसतं.

सध्या गाजणारा एकमेव मराठी चित्रपट म्हणजे बाईपण भारी देवा..! या चित्रपटाने एका दिवसात सहा कोटी आणि बारा दिवसात ३१ कोटीचा गल्ला जमवला आहे. मंगळागौर हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या विषयावर चित्रपट निर्मिती करणं ही कल्पनाच मुळात भारी आहे. त्यानंतर विषयाला न्याय देणारी चित्रपटातील प्रत्येक कलाकार न्यारी आहे. म्हणूनच बाईपण भारी देवा..!

माहेरची साडी चित्रपटाने १९९१ साली तीन महिन्यात १२ कोटीचा गल्ला जमवला होता. त्यावेळी हा बघण्यासाठी लोक बैलगाडीतून यायचे. चित्रपटगृहाबाहेर १०० भर बैलगाड्या उभ्या असायच्या. तर चित्रपटगृहात साड्यांचं वाटप केलं गेलं होतं. अख्खा गाव चित्रपट पहायला एकत्र असायचा. पडद्यावर अलका कुबल रडल्या तर प्रेक्षकातील प्रत्येक स्त्री रडायची. चित्रपट संपेपर्यंत ती मुसमुसत रहायची. माहेरची साडी घर घर की कहाणी असंच वाटायचं. परवा परवाच झिम्मा येऊन गेला. त्यानंतर महिलांचं सहलीला जाण्याचं प्रमाण वाढलं. त्यातील अभिनेत्रीनी महिलांना आनंदाने जगण्याचा जणु मंत्रच दिला. झिम्मा प्रचंड लोकप्रिय ठरला. या चित्रपटाने १४ कोटी जमवले.

बाईपण...बघायला जाताना काही महिला नऊवारी नेसतात.नथ,गॉगल घालतात. तर काहीजणी जिन्स टॉप, नथ घालतात. सगळ्या कशा नटून थटून येतात. गॉगल हा बाईपणाचा सिंबॉलच झालाय असं वाटू लागलंय. थिएटरच्या आत बाहेर जिकडंतिकडं महिलांचं फोटो सेशन असतं. या महिला खऱ्या अर्थानं स्वत:तील बाईपण शोधत असाव्यात. मोकळेपण अनुभवत असाव्यात. चित्रपट पाहताना त्यातील सहा बहिणी रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, सुचित्रा बांदेकर ,शिल्पा नवलकर यांच्याशी प्रत्येकीचा काहीतरी संबंध जुळतोच. आपल्या मुलीचं तिच्या सासुवरचं जास्त प्रेम बघून मनातून तडफडणं, नवऱ्याच्या मैत्रिणीला मेकअप किट भेट देऊन त्या नात्यातून सुटका करुन घेणं,नवऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी धडपडणं, सासऱ्याला घाबरुन भावना दडपणं, मर्यादांच्या चोकटीत स्वत:ला सतत बांधून घेणं अशा पध्दतीने स्त्रीची होणारी कुचंबणा, घुसमट असं पडद्यावर बघताना स्वत:ची गोष्ट पडद्यावर बघतोय असंच सगळ्याना वाटत असावं.

सिनेमातील अभिनय आणि बाहेरचं वास्तव कितीही मिळतंजुळतं असलं तरी ते पूर्णत: खरं नसतं. कारण बहुतांशी स्रियांना कुटुंबात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्याची कारणं बरीच वेगवेगळी असतात. ते काहीही असलं तरी त्यामुळे होणारी घुसमटही कालांतराने सवयीची होते. बऱ्याच वेळा बाईपणाच्या शारीरिक मानसिक विकासाचे टप्पे बाईलाच नीटसे माहित नसतात. ती चाळीशीत पोहोचेपर्यंत जाणीवपूर्वक स्वत:कडे बघतच नाही. त्यामुळे चाळीशी संपल्यावर अचानक तिला धडधडायला लागतं. भीती वाटायला लागते. तिच्या भावना अचानक तीव्र व्हायला लागतात. तिला खूप घाम यायला लागतो. उगीचच रडायला येतं. कुणी थोडं जरी काही बोललं तर टचकन डोळ्यात पाणी येतं. असं जेंव्हा होतं तेंव्हा तिला कळत नाही. आपल्याला काय होतंय. घरच्यांना कळत नाही ही अशी का वागते. त्यामुळे इतकी वर्ष शांतपणे सगळं सहन करणाऱ्या बाईला नवराही सहजच म्हणून जातो, तू आधी अशी नव्हतीस. आता बदललीस. थंड वातावरणातही तिला गरम होताना पाहून घरात तिची चेष्टा मस्करी केली जाते. त्यावरून ती नाराजही होते. म्हंटलं तर किती छोटी गोष्ट, पण तिच्यासाठी ही समस्या असते. मानसिक गोंधळ असतो. तिला एकाकी वाटत असतं. आपल्याला कुणी समजून घ्यायला हवं अशी तिची छोटी अपेक्षा असते.

अलीकडे चाळीशीपासून महिलांचा मेनोपॉज सुरू होतो. तीस पस्तीस वर्ष दर महिन्याला येणारी त्यांची मासिक पाळी थांबण्याचा हा काळ. या काळात गर्भाशयाला गाठी होण्याचं प्रमाण वाढतं. मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात रक्त जातं. पाळी मागे पुढे होते. कधीकधी तीन चार महिने येतच नाही. मग अचानक येते. वेदनादायक पाळीचा सामना करावा लागतो. योनीमार्ग कोरडा होतो. योनी मार्गाला खाज येते, अंगावरून पांढरं जाण्याचं प्रमाण वाढतं. मेनोपॉजमधे असं होतं याची जाणीव नसेल तर महिला घाबरून जातात. अशावेळी हार्मोनल बदलांमुळं असं होतंच असतं. थोडं सहन करायचं. सगळं नीट होतंय. अशा विचाराने स्त्रियांची शारीरिक मानसिक अवस्था ढासळते. अशावेळी मेनोपॉजच्या अवस्थेबद्दल समाजात, महिलांमध्ये जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे.

त्यासाठी शासन आणि काही सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यायला हवा. बाईपण चित्रपट बघितल्यानंतर असा एक प्रयोग सांगलीमधील संवादिनी या महिलांच्या ग्रुपने केला. त्यांनी सेकंड इनिंग भारी देवा असा एक परिसंवाद आयोजित केला होता. महिलांमधील चाळीशीनंतरच्या शारीरिक मानसिक समस्यांवर चर्चा झाली. महिलांनी एकापेक्षा एक झन्नाट प्रश्न विचारले. त्याची उत्तरं सिनेमापलिकडची होती. काही प्रश्न बघूया..

१) महिलांना मेनोपॉज असतो तसा पुरुषांनाही असतो का? त्यांच्या समस्या काय? २) पुरुषांचा अँड्रोपॉज आणि या काळात त्यांना एखादी मैत्रिण असावी वाटणं याचा काही संबंध आहे का? ३) फायब्रॉईड का होतात? ४) मेनोपॉज जवळ आलाय ओळखायचं कसं? ५) हार्मोनल बदल आणि भावना यांचा संबंध काय? उपाय काय? ६) शरीर संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते का? होत असेल तर का?

अशा अनेक प्रश्नांवर अडीच तीन तास चर्चा केली. म्हणजेच महिलांची व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठाची आवश्यकता लक्षात येते. अशा नाजुक विषयांवर उपायांप्रमाणेच मनमोकळ्या गप्पा आणि चर्चा याची जास्त गरज असते. काही उत्तरं समजून घेऊया...

मेनोपॉज-अँड्रोपॉज

स्त्रियांना मेनोपॉज असतो तसा पुरुषांना अँड्रोपॉज असतो. अँड्रोपॉज आणि लैंगिक संबंधाची तीव्र इच्छा होणं याचा परस्पर संबंध काहीच नाही. कोणत्याही वयात पुरूषाला एखादी मैत्रिण असावी असं वाटणं हे प्रत्येक पुरूषाचा वैयक्तिक विचार, जडणघडण, वातावरण, पत्नीशी असलेले संबंध यावर अवलंबून असतं. मेनोपॉजमधील शारीरिक मानसिक समस्यांमुळं स्त्रियांची शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते. पण त्याचं कारण १००% मेनोपॉजच असतं असं नाही. तर मेनोपॉज आला म्हणजे माझी गरज संपली. मी नवऱ्याला खुष करू शकत नाही असे अनेक नकारात्मक विचार आणि भावनांचा तो परिणाम असू शकतो.

फायब्रॉइड आणि गर्भाशय

गर्भाशयाच्या भोवती गाठी होणं ही सर्वसामान्य समस्या आहे. या गाठींचा आकार, प्रकार,होणाऱ्या वेदना, त्रास कळण्यासाठी सोनोग्राफी करता येते. त्यावरून सर्जरी करून गर्भाशय काढायचं की नाही किंवा ओव्हरीजची काळजी घेऊन गर्भाशय काढायचं याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. महिलांमधे फायब्रॉइडची अनावश्यक भीती असते.

स्वयंप्रेरणा

आजुबाजुला सतत नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला हवं. सकारात्मक - नकारात्मक विचार आणि भावनांचा स्वीकार करायला हवा. त्यासाठी स्वत:ला आहे तसं स्वीकारायला हवं. स्वत:ला प्रेरित करायला हवं. स्वत:साठी वेळ द्यायला हवा. आपले छंद जोपासायला हवेत. त्यामुळे मेनोपॉजच्या समस्यांची तीव्रता सौम्य होऊ शकते.

बकेट लिस्ट

या वयात येता येता खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या. पैसे कमवणं, एखादी नवी गोष्ट शिकणं, सुंदर आवरणं, मैत्रिणींसोबत मनसोक्त हिंडणं असं काहीही जे करायचं राहून गेलं असेल ते करायला हवं. जगणं राहून गेलं ही भावना वयाच्या उत्तरार्धात खुपच त्रासदायक असते. तर जगण्याची ही सेकंड इनिंग जमवलीच पाहिजे.

भावनिक गुंता

मेनोपॉजच्या अवस्थेत भावनिक गुंता तर होतोच. रडणं, उदास होणं, आत्मविश्वास गमवणं, घाबरणं या भावना तीव्र होण्याची शक्यता असते. या भावनांकडे सजगतेनं पहायला हवंय. भावनाना व्यक्त करता येण्यासाठीच्या जागा शोधायला हव्यात. या भावनांना समजून घेता यायला हवं.

जीवनशैली

शारीरिक - मानसिक समस्यांवर व्यायाम आणि योगा प्राणायाम, सूर्य नमस्कार यांचा उपयोग होतो. ध्यानामुळे मन शांत होतं. परंतु ध्यानाचं तंत्र नीट समजून घ्यायला हवं. मेनोपॉजमधेच नाही तर नेहमीच पौष्टीक आहार घेतला पाहिजे. आहारातून कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, इतर जीवनसत्व आहारातूनच मिळवली पाहिजेत.

नातेसंबंध

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाबद्दल सतत टोकण्यापेक्षा त्यांच्या वर्तनाची कारणं पाहावीत. कोणत्याही कृतीला काही ना काही कारण असतं. नात्यातील एखाद्याच्या बोलण्याचा त्रास होत असेल तर तो का होतोय याचा विचार करावा. ज्यामुळे दुसऱ्याची बाजू समजून घेणं सोपं होईल.

चाळीशीनंतरची मनोशारीरिक अवस्था आरोग्यपूर्ण असायला हवी. त्यासाठी मेनोपॉज अवस्था जाणून घेणं महत्वाचं आहे. सध्या चांद्रयान ३ अवकाशात सोडलं गेलं. त्याच्या प्रमुख डॉ. रितू करिधल आहेत. साधारण मेनोपॉजच्या वयातील या रॉकेट वुमन. यांची चर्चा तर होणारच कारण विज्ञानातील शिखर यांनी गाठलं. पण त्याचवेळी स्वत:बद्दल अज्ञानात राहणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. म्हणूनच माहेरची साडी, झिम्मा,बाईपण यासारखे चित्रपट महिलाना महत्व देतात. त्यांच्या भावनांची मांडणी करुन मोठा गल्ला जमवतात. परंतु अडीच तीन तासाच्या कालावधीत स्त्रियांच्या प्रत्येक भावनेला न्याय देणं शक्यच नाही. तरीही माहेरच्या साडीमधे दु:ख, झिम्मा मधे आनंद, आत्मविश्वास आणि बाईपण मधे नैराश्य, घुसमट, इर्षा, तुलना,राग,अपेक्षा अशा भावनांवर आधारीत भुमिका साकारल्या आहेत. त्या सहा बहिणी म्हणजे सहा मुख्य भावना आणि त्याबरोबर येणारे ताणही दाखवले आहेत. शिवाय ताणावर जिच्या तिच्या परीने मार्गही दाखवले आहेत. अशा स्त्री केंद्रित चित्रपटानी कितीही गल्ला जमवला असला तरी त्यानी प्रत्येकवेळी महिलांच्या भावनांवर हल्ला केलाय. असे चित्रपट स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात. स्रियांचं कुतुहल जागवतात. म्हणूनच स्त्रियांच्या शारीरिक मानसिक आरोग्याबाबत समाजभान जागवणंही अत्यंत महत्वाचं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in