हे सगळं विसरायच आहे का ?

यशवंत जाधव व त्यांची पत्नी यामिनी जाधव या सध्या शिंदे समर्थक झाल्यात हे आश्‍चर्य आहे
हे सगळं विसरायच आहे का ?

मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाते. त्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ‘ईडी’ने छापे टाकून प्रचंड संपत्ती जप्त केली. ते यशवंत जाधव व त्यांची पत्नी यामिनी जाधव या सध्या शिंदे समर्थक झाल्यात हे आश्‍चर्य आहे; परंतु हे विसरण्यासारखे आहे का?

शरद पवारांचे गुन्हेगारांशी कसे संबंध आहेत, त्यांचे दाऊद इब्राहिम या खतरनाक दहशतवाद्याबरोबर घनिष्ठ संबंध होते, असा पाढा विधानसभेत वाचणारे अनिल गोटे हे आता राष्ट्रवादीत पदाधिकारी झाले आहेत. आता गोटेंचे पूर्वीचे वक्तव्य सामान्यांनी विसरायचे का?

शरद पवार, बलवा, विनोद गोएंका हे एका विमानातून कोलकाता येथे गेले, असा गौप्यस्फोट करणारे भाजपनेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने त्यांचे प्ाूर्वीचे वक्तव्य सामान्य जणांनी विसरायचे का?

करुणा शर्मा प्रकरणात भाजपनेते, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकरिता धनंजय मुंडे यांना ‘करुणा’ दाखवली हे आता विसरायचे का? अनिल देशमुखांपाठोपाठ करुणा शर्मा प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे हे अडकले होते. एक मंत्री विशेषतः सामाज कल्याण मंत्री एका स्त्रीशी पत्नी असताना अनैतिक संबंध राजरोसपणे ठेवतो याची जाहीरपणे कबुली देतो. त्या मंत्र्याला कोणतीही शिक्षा नाही, किमान मंत्रिमंडळातून डच्चू मिळत नाही. याला मुख्य कारण अजित पवारांपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंना ‘करुणा’ दाखविली, असा स्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला; परंतु धनंजय मुंडे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे गुफ्तगू महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही.

त्यावेळी तर शरद पवारांना धनंजय मुंडेंचा काटा काढायचा होताच ना? याचे मुख्य कारण म्हणजे अजित पवारांचे आठ तासांच्या बंडाचे सूत्रधार धनंजय मुंडे हेच होते. त्यांच्या बंगल्यावर या बंडाचे मनसुबे रचले गेले, हे शरद पवार विसरले नव्हते; परंतु अजित पवारांपुढे काही चालू शकले नाही. असे असले तरी ‘करुणा शर्मा’ ही महिला हे संबंध विसरू देत नाही, एवढे खरे! ज्या ४२/४४ आमदारांच्या मतावर राज्यसभेत खासदार झालेले संजय राऊत हे या आमदारांना रेड्याची उपमा देऊन त्यांना गुवाहाटीला बळी देण्यासाठी पाठविले आहेत, असे म्हणत होते. मुंबईत आणून त्यांचे शवविच्छेदन केले जाईल, अशी शेखी मिरवत होते ते राऊत सध्या ‘ईडी’च्या जेलमध्ये आहेत. त्यांचे नावही कुणी काढत नाही. त्यांना विसरायचे का? सध्या तरी ज्यांच्यासाठी रोज बोरू पाझळत होते, शिवसेनेच्या मुखपत्रातून मॅरेथॉन मुलाखत छापीत होते, ते शरद पवारही खा. राऊत यांना विसरले आहेत; मात्र जनता विसरली नाही. मराठी माध्यमंही रोज मुलाखत मिळत नाही, तेही विसरले आहेत. कुणीही सध्या खा. संजय राऊतांचे नाव घेत नाही.

गेल्या अडीच वर्षांत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते; परंतु त्यांचा ‘रिमोट कंट्रोल’ मातोश्रीवरून शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’ या बंगल्यात गेला होता. त्याची कबुली वेळोवेळी खा. संजय राऊत हे देतच होते. हेही आता शिवसैनिकांनी विसरायचे का? मराठा मुख्यमंत्री नको म्हणून शरद पवारांनी आयत्या वेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट करून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करून त्यांना मुख्यमंत्री केले. हे जनता, सेना आमदार विसरले नाहीत. म्हणून तर उठाव झाला आणि ७५ ते ८० टक्के शिवसैनिकांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. कुठे गेले ते शिवसैनिक म्हणे या गद्दारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. उलट जनता त्यांचे रत्यावर प्रचंड स्वागत करीत आहे; परंतु डोळ्याला डोळा लावू शकणार नाही म्हणणारे आदित्य ठाकरे आज शहाजीबापू पाटील, गुलाबराव पाटील यांच्या डोळ्याला डोळा लावू शकले नाहीत. हे जनता व सार्वभौम विधानसभा सदस्य विसरले नाहीत.

राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पद! त्यांना शासकीय विमानात बसले असताना खाली उतरविले. हे कोणी विसरावे का? शेवटी मर्यादा या असतातच ना? तुम्ही १२ आमदारांची यादी केली नाही. म्हणून आम्ही तुम्हाला विमानातून उतरवणार? विद्यापीठ ही स्वायत्त संस्था, त्याची चर्चा विधानमंडळात यापूर्वी मधुकरराव चौधरी विधानसभा अध्यक्ष असताना होत नव्हती. आता तर कुलपती या संस्थेवर सरळ सरळ ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाला हे विसरण्यासारखे आहे का? आता हा कायदा येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी उपयोगात आणू नये, हा काही बदल राज्य सरकारने मोडीत काढला पाहिजे. शिक्षणतज्ज्ञ हा प्रकार विसरणार का?

दोन साधूंच्या झालेल्या अमानुष हत्या, राज्याचे मुख्यमंत्री, संजय वाझे हा काय लादेन आहे का? असे म्हणणे हे जनता विसरणार आहे का? ज्यांनी स्फोटकांची गाडी ठेवली, हिरेन हत्या, पुढे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत हे विसरायचे का? बँक घोटाळ्यात कोट्यवधी रुपयाचा घपला करणाऱ्या वाधवान बंधूंना पोलीस संरक्षणात फरारी असताना महाबळेश्‍वरी मुक्कामाला नेले. हे कुणाच्या सांगण्यावरून, त्या पोलीस अधिकाऱ्यास नावापुरते रजेवर पाठविले आणि बढती देऊन पुणे पोलीस आयुक्तपदी पाठविले हे विसरणार का?

कुणाच्या हुकमावरून त्या आयपीएस अधिकाऱ्याने काम केलेे, हे आता संजय राऊत अटकेनंतर उघड होईल का? हे मात्र नेते विसरले असतील, जनता नाही. राष्ट्रवादी मंत्रिमंडळात २०१३मध्ये आदिवासी विकासमंत्री असताना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले विजयकुमार गावित हे २०१४ ते २०१९पर्यंत देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होऊ शकले नाहीत. खरं पाहू गेले तर त्याकाळी उत्तर महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रवादी, काँग्रेसचे आमदार भाजपवासी झाले होते, त्यांचे त्यावेळचे सूत्रधार होते एकनाथ खडसे; परंतु खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर गावित खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेले नाहीत. ७ ते ८ वर्षे भाजपमध्येच राहिले आणि आता २०२२ मध्ये मंत्री झाले. ‘धीर से गंभीर’ ही युक्ती गावित यांना लागू झाली आहे. हे नंदुरबार येथील जनता विसरली नाही. सध्या त्यांची कन्या हीना गावित या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या खासदार आहेत.

एकनाथ खडसेंचे पाहा ना, ते स्वतः भाजप सोडून राष्ट्रवादीत आमदार झाले आहेत; परंतु तेथे अजित पवार, देवेंद्रजींच्या मैत्रीमुळे विधान परिषद विरोधी पक्षनेतेही होऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे, त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या मात्र भाजपच्या आजही खासदार आहेत? हे रावेर लोकसभा मतदारसंघातील जनता विसरली का? देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण पाहा, ते काही वेगळं नाही. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले, अडीच वर्ष विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पूर्ण करताना तीन मंत्र्यांना (अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राठोड) एकत्र जेलमध्ये तर दुसऱ्या मंत्र्याला मंत्रिपदावरून घालवण्यास भाग पाडले, त्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून हाताखालच्या मंत्र्याबरोबर काम करावे लागत आहे हे जनता विसरली नाही. ‘मीच, पुन्हा मुख्यमंत्री’ या देवेंद्रजींच्या घोषवाक्यास यशस्वी खेळी खेळून एकनाथ शिंदेंनी शह दिला, हे विसरता येणार नाही. जे उद्धव ठाकरेंना जमले नाही, ते एकनाथ शिंदेंनी करून दाखविले हे जनता विसरणार का?

आपल्या मार्गातील एक-एक नेत्यास बाजूला करण्यात देवेंद्रजी मात्र यशस्वी झालेत हे एवढे नक्की! भाजपच्या राष्ट्रीय संसदीय निवड समितीवरून विदर्भातील वजनदार नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाजूला करून देवेंद्रजींची वर्णी लागणे हे लोक विसरणार का? यापूर्वी देवेंद्रजींनी आपल्या मार्गातील एक-एक काटा बाजूला काढला. प्रतिस्पर्धी असलेले एकनाथ खडसे, त्यापाठोपाठ विद्यार्थी परिषदेपासून पुढे आलेले विनोद तावडे, मुंडे कन्या पंकजा मुंडेंचा पराभव तर केलाच, त्याचबरोबर मुंडेंची दुसरी खासदार कन्येचे केंद्रीय मंत्रिमंडळातील सनाव कापून डॉ. भागवत कऱ्हाड यांना दिले. त्यापाठोपाठ आता चंद्रकांत पाटील यांचाही जवळजवळ काटा काढला. त्यांना दोन नंबरचे मंत्रिपद देऊन जवळजवळ नारळच दिला, असेच म्हणता येईल. प्रदेश भाजपचे अध्यक्ष राहिलेले, २०१४ ते २०१९ पर्यंत नंबर २चे भाजपचे मंत्री राहिलेले, त्यांना नंबर २ वर टाकून दिले. तेही म्हणे चंद्रकांत पाटील व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचे संबंध असल्याने किमान मंत्रिपदी तरी राहिले. हे पश्ि‍चम महाराष्ट्रातील जनता विसरली का? आता भाजपची कोअर कमिटीच अस्तित्वात राहिली नाही. विशेष म्हणजे, हे सर्व करीत असताना अमित शहांशी चर्चा करण्यासाठी देवेंद्रजींचे उजवे व डावे हात असलेले गिरीश महाजन यांना पाठविले. आता बघा एक खांबी तंबू देवेंद्र फडणवीस यांचा झाला आहे. प्रदेश भाजप अध्यक्षपदी विदर्भाच्याच बावनकुळे यांना संधी दिली. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी ज्या प्रदेश विभागाचा नेता असतो, त्या विभागाचा प्रदेशाध्यक्ष नसतो; परंतु हे सर्व संपविल्याचे दिसते. हे भाजपत सध्यातरी कोणी विसरू शकत नाही. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत; परंतु पुतणे अजित पवारांनी बंड केले आणि बंडात सामील झालेल्या आमदारांना महाविकास आघाडी असताना महत्त्वाची पदे दिली. एवढेच नाही, तर विधानसभेचे उपाध्यक्षपदही अजित पवारांनी आपले बंडातील शिलेदार नरहरी झिरवळ यांना दिले. हे संजय राऊत विसरतील; परंतु शिवसेना आमदार विसरतील का?

मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाते. त्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ‘ईडी’ने छापे टाकून प्रचंड संपत्ती जप्त केली. त्यात मातोश्रीस दोन कोटी व ५० लाखांच्या घड्याळाचा समावेश होता. ते यशवंत जाधव व त्यांची पत्नी यामिनी जाधव या सध्या उद्धवजींच्या विरोधी गटात शिंदे समर्थक झाल्यात हे आश्‍चर्य आहे; परंतु हे विसरण्यासारखे आहे का? खासदार भावना गवळी, अमरावतीचे माजी खा. आनंद अडसूळच काय, अनेक सेनानेते शिंदे गटात सामील झाले ते ईडीच्या भीतीने हे सर्वश्रुत आहे. हे जनता थोडीच विसरणार आहे. सन २०२४च्या निवडणुका येऊ द्या, बघा भाजपकडे इतर पक्षांतून येणाऱ्यांच्या कशा रांगा लागतात बघा!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in