भावनिक साद !

आपल्यामागे शिवसेनेचे आणि अन्य अपक्ष आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याने महाविकास आघाडी सरकारपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला
भावनिक साद !

महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर किती काळ राहणार याबद्दल अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. आपल्यामागे शिवसेनेचे आणि अन्य अपक्ष आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याने महाविकास आघाडी सरकारपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार मांडला त्यापासून शिवसेनेचे विद्यमान नेतृत्व दूर गेले असल्याचे म्हटले आहे. आपल्या समवेत आलेल्या लोकप्रतिनिधींचीही हीच भावना असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यामध्ये राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर राहणार की जाणार, विद्यमान सरकार बरखास्त केले जाणार का, राज्यात राष्ट्रपती राजवट जरी करणार का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. दुसरीकडे, शिवसेनेमधील बंडाची व्याप्ती वाढत चालल्याचेही दिसून येत होते. पण जे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले ते स्वखुशीने गेले नसल्याचे आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडणार का, अशा शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. आपल्याला मुख्यमंत्रीपदावर राहण्यात किंवा शिवसेना पक्ष प्रमुखपदी राहण्यात अजिबात स्वारस्य नाही. पण ज्यांना मी या पदावर नको आहे त्यातील एकाने तरी समोर येऊन तसे स्पष्टपणे सांगावे. तसे सांगितल्यावर तत्क्षणी मी या पदांवर राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपल्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आले. अनुभव नसतानाही मी त्या पदाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर गेली असल्याचे जे आरोप करण्यात येत आहेत त्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही आणि सोडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींना भेटत नसल्याचा आरोपांबद्दल बोलताना, आपल्यावर जी शस्त्रक्रिया झाली त्यामुळे आपणास कोणास भेटता आले नाही. पण त्यातून बरे झाल्यावर आपल्या भेटीगाठी होत आहेत, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिले. आपणास सत्तेचे प्रेम अजिबात नाही. राजीनामा देऊन ‘वर्षा’ वरून ‘मातोश्री’वर राहण्यास जाण्याची आपली तयारी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना, शिवसेनेत जे काही सुरु आहे त्याची कल्पना देऊन शिवसैनिकांना भावनिक साद घातली. आपल्याबद्दल नाराजी असल्यास मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्ष प्रमुखपद सोडून द्यायची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाची मनधरणी करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर यासंदर्भातील आपली भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे मांडली. एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात ते ही जनतेसमोर येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू मांडून शिवसेनेतील नाराज नेत्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा काय परिणाम होतो, ते पाहावे लागेल. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होणार का, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार सत्तेवर राहणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी ज्या घडामोडी घडत आहेत त्या पाहता राज्याचे राजकीय चित्र अस्पष्ट, धूसर आणि दोलायमान असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती त्यापासून शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाने जी फारकत घेतली ते या बंडामागील एक कारण असल्याचे सांगण्यात येते. एकनाथ शिंदे हे शिवसेना गटाचे नेते होते. पण त्यांना गटनेते पदावरून दूर सारण्यात आले. पण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून दूर करण्यात आले ती प्रक्रियाच अवैध असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यातूनच शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेनेचे आमदार गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले. आपणच अजून गटनेतेपदी असल्याचे गृहीत धरून एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केले, असे मानण्यास हरकत नाही. राज्याच्या राजकारणातील घडामोडी वेगाने घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भावनिक आवाहन केले आहे ते लक्षात घेऊन एकनाथ शिंदे गट आपले बंड मागे घेणार की आणखी कणखर भूमिका घेणार ते काही काळातच स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in