सण-उत्सवांचे आनंदयात्री

साऱ्यांनाच हव्याहव्याशा वाटणाऱ्या पर्जन्यराजाच्या सुखद आगमनाने तहानलेली धरणी मनस्वी सुखावली आहे
 सण-उत्सवांचे आनंदयात्री

आभाळाला आनंदाचे भरते आले आहे. सर्वदूर अमृतधारांचा वर्षाव सुरू आहे. धरित्रीला अमृताचा पान्हा फुटला आहे. डोंगर-दऱ्यात धवलगंगा अवतरली आहे. या अमृतधारांच्या वर्षावात प्रवाही होऊन हसतखेळत खळखळून वाहणाऱ्या ओढे, नद्यांच्या प्रवाहालाही तालासुरांची आगळी धुंदी चढलीय. भुरभुर पावसात भिजणाऱ्या पक्ष्यांच्या संगीतदरबारात अनोखे निसर्गगान सुरू आहे. रानावनातून, पानाफुलातून, झाडावेलीतून मातीचा सुगंध पाझरत आहे. साऱ्यांनाच हव्याहव्याशा वाटणाऱ्या पर्जन्यराजाच्या सुखद आगमनाने तहानलेली धरणी मनस्वी सुखावली आहे. निसर्गाची ही अद‌्भुत किमया मनाला भुरळ घालीत आहे, बेधुंद करीत आहे. त्यामुळेच पर्जन्यसखा अन‌् हिरवा शालू पांघरलेल्या धरित्रीच्या नयनरम्य भेटीचे साऱ्यांनाच मनस्वी वेध लागले आहेत. या निसर्गराजाच्या भेटीसाठी उत्साही तरुणांची मने आनंदाने उचंबळून आली आहेत. या पर्जन्यसुखात शेतकरीराजाही अंतर्बाह्य चिंब चिंब झाला आहे. हा शेतकरीराजा आपल्या घुंगुरवाळ्या बैलजोडीच्या मदतीने शेतीच्या कामात रंगला आहे, दंगला आहे, आनंदला आहे. शेतीच्या आनंदी गाण्यांनी धरित्री नादावली असून तिलाही प्रेमाचे अंकुर फुटू लागले आहेत. दुसरीकडे निसर्ग, पाऊस आणि सणासुदीच्या गोडव्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यामुळे मानवी मनेही आनंदली आहेत. या आनंदयात्रेत यंदा उत्सवांचाही भर पडली आहे. सणासुदीच्या दिवसात घराघरातील, मनामनातील आनंद द्विगुणित होणार आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गराजा, पर्जन्यराजाप्रमाणेच सत्ताधीश राजांनाही मतदारराजांच्या प्रेमाचे भरते आले आहे. सत्ताधीश उदार झाला आहे. त्याचे कारण, अर्थातच आगामी निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सण-उत्सव धुमधडाक्यात, दणक्यात साजरा करण्याचे आदेश मायबाप सरकारने, महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खरेतर, कोरोनाचे मळभ दूर झाल्याने यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम हे सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. याआधी बंदीच्या कचाट्यात सापडलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींनाही यंदा विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येणार आहे. यावर्षी गणेशमूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच, गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी ‘एक खिडकी योजना’ ऑनलाइन राबविली जाणार आहे. हे सण-उत्सव साजरे होताना कुठेही, कुणाचीही अडवणूक, पिळवणूक होणार नाही. मंडपासाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, जाहिरात परवाना शुल्कच काय, हमीपत्रही घेतले जाणार नाही. याशिवाय, रस्त्यारस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्याच्या सूचना जारी झाल्या आहेत. मुंबईतील मूर्तिकारांसाठी मूर्तिशाळांच्या जागा निश्चित कराव्यात, मूर्तिकारांसाठीचे अटीनियम शिथिल करण्याचेही आदेश जारी झाले आहेत. ध्वनिप्रदूषणाचे गुन्हेही मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, श्रींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकादेखील जल्‍लोषात काढता येणार आहेत. दहीहंडीदेखील न्यायालयाचे नियम सांभाळून साजरी करता येणार आहे. कोकणात गणेशोत्‍सवासाठी एसटीच्या आणखी जादा बसेस सोडण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफीदेखील देण्यात येणार आहे. आपापले सण-उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होण्यासाठी पोलीसदादा नि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी पुढे येऊन भक्तांना मदतीसाठी हात पुढे करायचा आहे. मुळात कोणत्याही सणांसाठी किती रस्ते अडवायचे, एकाच शहरात किती परवानग्या द्यायच्या, हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन किती करू द्यायचे, देशातील नागरिक मूलभूत सेवासुविधांसाठी तडफडत असताना उत्सवांवर किती खर्च करायचा? अवघे जग निसर्ग वाचविण्याच्या मोहिमांमध्ये सहभागी होत असताना, आपण किती निसर्गाचा ऱ्हास करायचा याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अवघा निसर्गच धोक्यात आणणाऱ्या सण-उत्सवांबाबत अंतर्मुख होऊन विचारमंथन व्हायला हवे. केवळ निवडणुका तोंडावर आहेत, म्हणून सण-उत्सव साजरा करण्यास वाट्टेल तशा परवानग्या द्यायच्या असतील, तर कायदे हवेतच कशाला? अशा सरसकट परवानग्या दिल्या तर न्यायालयांच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही का? निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून राज्यकर्त्यांनी किती वाहवत जायचे? ‘एक गाव एक गणपती, एक प्रभाग एक गणपती’ या संकल्पना कुणी अमलात आणायच्या? प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही उत्सवांचा आग्रह धरायचा तुम्ही-आम्ही नाही तर कुणी? सार्वजनिक उत्सवात शिस्त नसेल, तर ते उत्सव काय कामाचे? सण-उत्सवातील गैरप्रकारांची जबाबदारी कुणाची? म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी सण-उत्सव साजरे करताना सामाजिक भान ठेवून उत्सवांची शान कशी वाढेल, उत्सवांचा दर्जा कसा राहील, त्यातून शांतता, सौहार्दाचा, बंधुतेचा, समतेचा, मानवतेचा संदेश सर्वदूर कसा जाईल, याचा विचार व्हायला हवा. निसर्ग आपल्या आनंदात साऱ्यांनाच सहभागी करून घेतो, अगदी तसेच, आपणही सण-उत्सवांचे आनंदयात्री व्हायला हवे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in