सुफी चळवळीचा शिक्षणपद्धतीवर परिणाम

मध्ययुगीन काळात मुस्लिम सत्तेच्या आगमनानंतर समाजव्यवस्थेतील बदल, जातीव्यवस्थेचे स्वरूप, सुफी संतांचा प्रभाव, तसेच शिक्षणपद्धतीत बदल झाला आहे. सुफी संतांनी जातिव्यवस्थेला विरोध करून सर्वसमावेशक अध्यात्माचा प्रचार केला. मुस्लिम सत्तांमुळे मक्तब-मदरशा सुरू झाली, जे शिक्षणप्रसाराचे केंद्र बनले. सुफी विचारसरणीचा प्रभाव हिंदू समाजावर विशेषतः मागास जातींवर मोठा झाला.
सुफी चळवळीचा शिक्षणपद्धतीवर परिणाम
फोटो- फेसबुक (Wbpsc The Success Strategy )
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

मध्ययुगीन काळात मुस्लिम सत्तेच्या आगमनानंतर समाजव्यवस्थेतील बदल, जातीव्यवस्थेचे स्वरूप, सुफी संतांचा प्रभाव, तसेच शिक्षणपद्धतीत बदल झाला आहे. सुफी संतांनी जातिव्यवस्थेला विरोध करून सर्वसमावेशक अध्यात्माचा प्रचार केला. मुस्लिम सत्तांमुळे मक्तब-मदरशा सुरू झाली, जे शिक्षणप्रसाराचे केंद्र बनले. सुफी विचारसरणीचा प्रभाव हिंदू समाजावर विशेषतः मागास जातींवर मोठा झाला.

भारताचा मध्ययुगीन इतिहास मुस्लिम आगमनाची दखल घेऊनच समजून घेता येतो. असे असले तरी, हिंदू, मुस्लिम, बौद्ध इत्यादी धर्म चौकटीतूनही तो पुरेसा समजून घेता येत नाही. या धर्म चौकटीच्या दर्शनांचे समाजव्यवस्थेवर काय परिणाम झाले व या तत्वज्ञानांचा एकमेकांवर काय प्रभाव पडला हे समजून घेऊनच योग्य दिशेने इतिहास समजून घेता येतो. मध्ययुगीन समाजव्यवस्था स्त्रीदास्य जातीव्यवस्थांक होती. या व्यवस्थेच्या समर्थनाचे व विरोधाचे स्वर मध्ययुगात उमटत होते. मुस्लिम आगमनानंतर यात कोणता बदल झाला व त्या बदलाचे शिक्षणावर काय परिणाम झाले? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सातव्या शतकात मुस्लिमांनी भारतावर आक्रमण केले. साधारणत: अकराव्या शतकापासून भारतात सत्ता स्थापनेस त्यांनी सुरुवात केली व ती १८व्या शतकापर्यंत विस्तारत गेली. गुलाम घराणे (१२०६ ते १२९०), खिलजी घराणे (१२९० ते १३२०), तुघलक घराणे (१३२० ते १४००) व त्यानंतर अकबर (१५५६ ते १६०५) आणि औरंगजेब (१६५७ ते १७०७) या प्रमुख राजांनी भारतात राज्य केले. सुलतानांनी राजकीय सत्ता विस्तारण्यासाठी हिंदुचा सहभाग करून घेतला. सत्ता विस्तारण्यासाठी शेती महसूल महत्त्वाचे साधन होते. शेती महसूल हे राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत होते व दुय्यम उत्पन्न परक्या मुलुकाची लुट व व्यापार यातून येत होते. हा महसुल गोळा करण्याचे काम देशमुख-देसाई ते पाटीलपर्यंत हिंदु वतनदार व जमीनदार करत होते. हे हिंदु वतनदार व जमीनदार सत्तेच्या दुय्यम स्थानावर होते, असे शरद पाटील सांगतात. मध्ययुगीन काळ जाती व्यवस्था व जाती बंदिस्त, संरजामी व्यवस्थेचा काळ होता. मुस्लिम राजकीय सत्तेने सरंजामी व्यवस्था कायम ठेवण्यासाठी हिंदु सरंजामदारांनाच सत्तेच्या दुय्यम स्थानी सामावून घेतले. राजसत्ता व धर्मसत्ता स्वतंत्रपणे कार्यरत होती. सुलतान व धर्मगुरुंना ही विभागणी मान्य होती. सुफी संत मात्र राजसत्तेपासून फटकून होते. राजसत्ता व धर्मसत्तेची स्वायतत्ता सरंजामी व्यवस्था टिकवण्यासाठी पुरक ठरली. त्यामुळे मुस्लिम राजसत्तांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेतली नाही, तर तिच्यात सुधारणा करण्याची भूमिका घेतली. त्याची काही उदाहरणे सापडतात.

मुस्लिम राजकीय सत्तांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली नसली, तरी सुफी संतांनी अध्यात्मिक चौकटीत सामाजिक सुधारणेची भूमिका घेतली. सुफी संतांच्या प्रबोधनाचा परिणाम समाज जीवनावर मोठ्या प्रमाणात झाला. अरुण सोनकांबळे यांनी त्यांच्या लेखात इस्लाम व सुफी संतांच्या तत्वज्ञानाचे सार पुढील प्रमाणे मांडले आहे. 'इस्लाम तत्वज्ञान व सुफीवाद एकेश्वरवादी होते. निर्माता (हक) व निर्मिती (खलक) यांच्यातील एकरुपता म्हणून हे चराचर विश्व एकात्म आहे.' या अद्वैत तत्वज्ञानातील पारलौकिकता बाजूला सारल्यास प्रत्येक जीव समान व एकात्म आहे, हा सिध्दांत अधोरेखित होतो. इस्लामचा एकेश्वरवाद व सुफींचा गुढवाद यांच्या समान व एकात्म दर्शनाचा प्रभाव हिंदु समाजावर मोठ्या प्रमाणात झाला. विशेषत: हिंदुमधील खालच्या जातीवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. सुफींच्या आगमनापुर्वी हिंदु भक्तीपंथ केवळ उच्च जातीपुरता बंदिस्त होता. जाती बंदिस्त उतरंडीच्या समाज रचनेमध्ये ईश्वराची भक्ती करण्याचा व आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा अधिकार सर्व जातींना नव्हता. शंबुकाने हा नियम मोडला म्हणून रामाने त्याला दंडीत केले होते. सुफी संत मात्र खालच्या जातींमध्ये जाऊन राहिले. आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत. आपण सगळे समान आहोत. एकच आहोत. अशी भूमिका घेतली. सुफींचा वैश्विक बंधुभावाचा (सुलेहकूल) सिध्दांत महत्वाचा ठरला त्यातून हिंदु-मुस्लिम बंधुभाव निर्माण झाला. खालच्या जातींनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्विकारला. शेख मंहमद यांनी सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करून हिंदु धर्म चौकटीला पुढीलप्रमाणे आव्हान उभे केले.

ऐसे केले त्या गोपाळे। नाही सोवळे ओवळे ।।

काटे केतकीच्या झाडा। आत जन्मला केवडा।

फणसा अंगा काटे। आत अमृताचे साठे।।

नारळ वरुता कठीण। परी अंतरी जीवन।।

शेख महमंद अविंद्य। त्याचे ह्रदय गोविंद।।

सुफींचे चिश्ती व सुरावर्दी हे दोन प्रमुख पंथ होते. त्यातील चिश्तींचा प्रभाव देशभर होता. मुईनुद्दीन चिश्ती व त्यांच्या शिष्यांनी सुफीवादाचा प्रसार देशभर केला. ईश्वर्एक्य व सर्वधर्म जनैक्यासाठी सुफींनी त्यांचे खानक (मठ) सर्वांसाठी खुले केले होते. सुफी संत कडक व्रताचे पालन करत. सन्यस्त जीवनावर अटळ राहत व सत्तेपासून अलिप्त राहत असत. शेख हमीउद्दीन यांच्या जगण्यातून ते अधिक स्पष्ट होते. भक्तांच्या दानावर व सत्तेच्या देणगीवर विसंबून रहावे लागू नये, म्हणून कुटुंबासह जगण्यापुरती शेती ते करत होते. इतर शेतकऱ्यांसारखेच पोशाख, भाषा व जीवनपद्धती जगत होते. ते मांसाहार करत नव्हते. सुलतान इल्तुतमिश यांनी एक गाव व ५०० चांदीचे शिक्के (टके) सुफी संत शेख हमीमुद्दीन यांना देऊ केले होते. ते त्यांनी नाकारले. हे सत्तेपासून फटकून व व्रतस्त राहण्याचे उत्तम उदाहरण आहे.

मुस्लिमांमध्ये जाती व्यवस्था नसल्यामुळे कोणीही अल्लाची भक्ती करू शकत होते व आध्यात्मिक चळवळीत सहभाग घेऊ शकत होते. हिंदु धर्मात याउलट परिस्थिती होती. सुफी संतांच्या प्रबोधनामुळे १२व्या शतकात संत चक्रधरांनी लिळाचरीत्र लिहुन हिंदु धर्म चौकटीला आव्हान उभे केले. स्त्री, शुद्रांना ईश्वर भक्तीचा समान अधिकार आहे हा स्वर त्यांनी पुढे आणला. त्याचा परिणाम म्हणून पुढच्या टप्प्यात ब्राह्मणेतर संत व संत चळवळ उदयाला आली. सुफी चळवळ उदयाला येण्यापुर्वी ब्राह्मणी-अब्राह्मणी ज्ञान परंपरा कार्यरत होती. सुफी परंपरेनी त्यात भर घातली. या बदलाचे परिणाम शिक्षणावर झाले. १२व्या शतकापर्यंत गुरुकुल (ब्राह्मणी) शिक्षण पद्धत व बौद्ध (अब्राह्मणी) शिक्षण पद्धत समातंरपणे कार्यरत होती. १२व्या शतकाच्या शेवटी खिलजींनी बौद्ध विद्यापीठ नष्ट केल्याचे काही इतिहासकार सांगतात. तर दुसऱ्या पंथाचे इतिहासकार आद्य शंकाराचार्य व राजा शशांक यांनी विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षुंची कत्तल केल्याचे मांडतात. इतिहासाच्या या वादात न पडता १२व्या शतकापर्यंत बौद्ध शिक्षण पद्धती कार्यरत होती, हे दोन्ही पंथाचे इतिहासकार मान्य करतात. वर्णव्यवस्थेपासून वसाहतीक काळापर्यंत गुरुकुल शिक्षण व्यवस्था सतत कार्यरत राहिली. मुस्लिम आगमनानंतर मक्तब व मदरसा सुरू झालेत. याचे शिक्षणावर कोणते परिणाम झाले ते समजून घेणे आवश्यक आहे.

हिंदू मंदिर, जैन मंदिर, विहार ही भक्तीची केंद्रे नव्हती, तर ज्ञानार्जन व ज्ञान प्रसाराची केंद्रे होती. तशीच मस्जिद सुद्धा ज्ञानार्जन व ज्ञानप्रसाराचे केंद्र होती. मस्जिदीत मक्तब हे प्राथमिक शिक्षणाचे व व मदरसा उच्च शिक्षणाचे केंद्र होते. महमंद पैगंबर ज्यांनी इस्लामची स्थापना केली ते स्वत:

शिकलेले नव्हते, परंतु ते ज्ञानार्जनाला अत्यंत महत्त्व देत होते, असे म्हणताना 'ज्ञान मिळवण्यासाठी चीनपर्यंत जावे लागले तरी जायला पाहिजे.' या पैगंबरांच्या विधानाचा अर्शद शेख त्यांच्या पुस्तकात उल्लेख करतात.

(क्रमश:)

Ramesh.bijekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in