दोघांच्या भांडणात....

दोघांच्या भांडणात आपला राजकीय फायदा करून घेण्याचा भाजपच्या चाणक्यांचा अंतस्थ: हेतू आता स्पष्ट झाला
दोघांच्या भांडणात....

अलीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जोरदार आव्हान दिले आहे. शिवसेनेतून फुटून निघण्यास शिंदे व त्यांच्या समर्थकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य कुणी केले असेल, तर ते भाजपच्या चाणक्यांनी. याच चाणक्यांनी याआधी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती; परंतु मागील आठ वर्षे भाजपची केंद्रात सत्ता असूनही त्यांना काँग्रेसला काही संपविता आलेले नाही. आता त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. मुळात संपविण्याची भाषा कुणी कितीही केली, तरी कुणी कुणाला संपवू शकत नाही. शिवसेनेतून याआधी फुटून निघालेली मनसे-शिंदे गट आणि ठाकरे गट यांना परस्परात झुंजवून दोघांच्या भांडणात आपला राजकीय फायदा करून घेण्याचा भाजपच्या चाणक्यांचा अंतस्थ: हेतू आता स्पष्ट झाला आहे. खरेतर, केंद्र सरकारला वाढती महागाई रोखण्यात अपयश आले आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. देशातील शेतकरी, कष्टकरीवर्ग अस्वस्थ आहे. त्यामुळेच मूळ प्रश्नांपासून देशातील जनतेचे अन्यत्र लक्ष वळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे जाती-धर्माच्या मुद्द्यावरून भांडणे लावून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केल्यास आपली सत्ता कायम राहील, या भ्रमात सत्ताधारी आहेत; मात्र राज्य घटना मानणाऱ्या नागरिकांना हे प्रकार चांगलेच खटकले आहेत. तसेच, विरोधकांचे आमदार, खासदार फोडण्याची कृतीही देशातील जनतेच्या काही फारशी पचनी पडलेली नाही. मागील आठ वर्षांच्या काळात देशापुढील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या प्रश्नांकडे प्राधान्याने व गांभीर्याने लक्ष दिले असते, तर देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट्य निश्चितच गाठता आले असते. सरदार पटेल यांचा पुतळा, दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा अथवा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली आहे; परंतु त्यांचे देशातील जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्षच झाले आहे. कोरोनाकाळात देशातील लघुउद्योग रसातळाला जाऊन अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली. या साऱ्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्याऐवजी समाजात भांडणे लावणे, विरोधी पक्षात फूट पाडणे, यासारखे प्रकारच सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत राहिले. परिणामी, भाजपच्या लोकप्रियतेलाच ओहोटी लागण्याचा धोका वाढत चालला आहे. हा धोका वेळीच लक्षात घेऊन भाजपने स्वत:ला सावरण्याची गरज आहे. अन्य राजकीय पक्षातील प्रमुख मोहरे आपल्या पक्षात आणून पक्ष वाढत नाही. उलट कुरबुऱ्याच वाढतात, हा इतिहास आहे. आता प्रश्न आहे, तो ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील भांडणाचा. जेव्हा दोन भाऊ परस्परांमध्ये भिडतात, तेव्हा ते आपल्याच घराला सुरुंग लावत असतात, हे दोन्हीही गटांनी लक्षात ठेवावे. या भांडणातून शिंदे व ठाकरे गट यांचेच राजकीय नुकसान होणार आहे, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. तेव्हा आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लावून प्रतिमासंवर्धन कसे करता येईल, याकडे शिंदे-ठाकरे यांच्या अनुयायांनी अधिक लक्ष दिलेले बरे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवी चौकात सदा सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांचे स्वागत मंडप एकमेकांसमोर उभारण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून परस्परांना चिथावण्यात आले. त्यातून वातावरण तापले. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने उभय गटातील पुढील संघर्ष टळला; पण समाजमाध्यमांवर एकमेकांविरोधात टीका करण्यात येत होती. त्यातून वाद उद्भवला व शनिवारी रात्री उभय गटात राडा झाला. या राड्यात उभय बाजूंच्या अनुयायांना पोलीस ठाण्यात येराझाऱ्या घालाव्या लागल्या. या राड्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या गल्लीतील वादात आता गल्लीपासून दिल्लीपर्यंतची नेतेमंडळी उडी घेऊन वातावरण अधिक चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भांडणातून राजकीय पोळ्या भाजण्याचे जे प्रयत्न होत आहेत, ते निव्वळ लाजिरवाणे आहेत. त्यातून पोलिसांवर दबाव आणून फारसे काही हाती लागणार नाही. उलट, सणासुदीच्या काळात पोलिसांच्या कामावरील ताण अधिकच वाढणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी अशाप्रकारे जर कुणी दोन गटांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच अधिक होतील. आधीच वाढत्या महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत. पुण्यात रविवारी आभाळ फाटून आसपासच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले असून त्यांचे अश्रू पुसण्याची ही वेळ आहे. तेव्हा राजकीय नेत्यांनी आता कोंबड्या झुंजविण्याचे प्रकार थांबवून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, हे उत्तम.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in