५६ वर्षांनी ठाण्याला न्याय

काँग्रेस उमेदवारांचा झालेला दारूण पराभव या घटना या मागील महिनाभरात घडल्या.
५६ वर्षांनी ठाण्याला न्याय

महाराष्ट्रात जून महिनाअखेरीस एकुण साऱ्याच धक्कादायक घटना घडल्या. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंड, त्या अगोदर विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचा झालेला पराभव, एका बाजूला महाविकास आघाडीकडे बहुमत असतानाही शिवसेना उमेदवार संजय पवार व परिषद निवडणुकीत बहुमत असताना काँग्रेस उमेदवारांचा झालेला दारूण पराभव या घटना या मागील महिनाभरात घडल्या. अखेर शिंदेंचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जनाधार हा भाजप-सेना युतीला मिळाला होता; परंतु मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेना नेतृत्वाने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणे पसंत केले. सुरूवातीला हे महाविकास आघाडीचे सत्तानाटय सुमारे पंधरा दिवस चालले होते. एकदा निश्‍चित झाले की, सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार येणार! मात्र काँग्रेस पक्षाला सेनेबरोबर जाण्यास हायकमांडचा प्रारंभी विरोध होता. शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना महाविकास आघाडीत येण्यास प्रवृत्त केले आणि पुढे शिंदे रामायण सुरू झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, तशी पत्रे आम्ही राज्यपालांना राजभवनवर पाठवितो, असे म्हटल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सहीचे पत्र राजभवनवर देण्यासाठी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे हे राज्यपालांना राजभवनवर जाऊन भेटले. त्या पत्रावर आघाडीचे मुख्यमंत्री, नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव होते. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, असे दिसताच त्यांच्या बंगल्यावर प्रोटोकॉलही वाढविला. पोलीस आयुक्त, कलेक्टर हे शिंदेंच्या बंगल्यावर जाऊन पोहचले. शिंदे हे आठ तास मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलमध्ये होते; मात्र पुढे चक्र फिरले. त्यावेळी शरद पवारांनी उध्दव ठाकरे यांचे नाव पुढे आणले आणि बरोबर त्याच पहाटे अजित पवारांनी बंड केले. हा सर्व वृत्तांत सर्वज्ञात आहे. त्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांचे स्वप्न होते मुख्यमंत्री होण्याचे, हे काही लपून राहिले नव्हते. पुढे-पुढे शिंदे यांच्याबद्दल बातम्या येऊ लागल्याने मातोश्रीने शिंदे यांना निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवण्याचे सत्र सुरू केले. काही प्रमाणात त्यांच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. इकडे शरद पवार आता म्हणतात की, ‘‘शिंदे यांच्या हालचालीबाबत आपण व गृहखात्याने उध्दव ठाकरे यांना कल्पना दिली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचवेळी काही पावले उचलली असती तर हे बंड घडलेही नसते,’’ असा दावा आता पवार करताहेत!

ही सर्व पार्श्वभूमी सांगण्याचे कारण असे की, गेल्या अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मनात होते, की आपला मुख्यमंत्रीपदाचा घास शरद पवारांनी काढून घेतला होता. उध्दव आज म्हणत असतील, मला मुख्यमंत्री पदाचा त्यावेळी मोह नव्हता; परंतु शरद पवारांच्या आग्रहाखातर आपण मुख्यमंत्री होण्यास मान्यता दिली. गेल्या अडीच वर्षात ‘मुख्यमंत्री’ ही खुर्ची किती महत्वाची आहे, महाराष्ट्रात, देशात मोठा मान, पुढे-मागे सुरक्षा गाडयांचा ताफा व वातावरण पोषक झाल्यानेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास उशीर लावला. सत्ता, खुर्ची याचा मोह किती असतो, हे आतापर्यंत अनेकवेळा पाहिले आहे. याला अपवाद होते. प्रा.मनोहर जोशी. बाळासाहेबांनी जोशी सरांना राजीनामा द्या, असे आदेश देताच सर, पाचव्या मिनिटाला राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व दहाव्या मिनिटाला सरांनी शासकीय वर्षा बंगलाही सोडला. खरं पाहू गेल्यास ३९-४० आमदारांनी बंड केले तेव्हाच उध्दवजींनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडणे आवश्यक होते. ते झाले नाही. ‘वर्षा’ वरून आपला मुक्काम हलवून ‘मातोश्री’ गाठली त्याच रात्री उध्दवजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, असे कयास बांधले जात होते. त्यावेळी ‘मातोश्री’ वर हजर असलेले आमदार एक-एक करून शिंदे गटात पोहचले.

दादा भुसे, दादरचे सदा सरवणकर, रामदास कदम यांचे चिरंजीव आणि लता सोनावणे हे चार आमदार गुवाहाटीला पोहोचले. त्या पाठोपाठ शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिटिंगला हजर असलेले उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला पोहोचले. असे असतांनाही ‘मातोश्री’ वरून मात्र ‘या चिमण्यांनो परत फिरा’ असे आव्हान उध्दवजी करीत होते. शिवसेनेच्या ४० व शिवसेना समर्थक आमदार असलेले ११ अशा ५१ बंड केलेल्या आमदारांनी त्यांना दाद दिली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत हे सर्व बंडखोर आमदार शिंदे यांच्या पाठीमागेच कायम राहीले. याचे मुख्य कारण खा.राऊत हे आहेत.

यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांनी शिवसेनेत बंड केले. त्या पाठोपाठ ‘राज ठाकरे’ ही बाहेर पडले. त्यावेळी मुंबई-महाराष्ट्रात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ती परिस्थिती मात्र यावेळी दिसून आली नाही. उध्दवजींनी आपला मुक्काम वर्षावरून हलवून मातोश्री निवासस्थानी हलवला, त्यावेळी वर्षा, मातोश्री व काही ठिकाणी शिवसैनिक बाहेर पडले; मात्र त्यानंतर फारसा कुठे धुरळा उडाला नाही. उलट ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले.

‘ठाणे’ म्हणजे शिवसेना! सन १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा ठाण्याच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि आज ५६ वर्षांनंतर या ठाणे शहरातील आमदार एकनाथ शिंदे यांनी ‘बंड’ करून उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करावयास लावले. हा एक योगायोग नव्हे नियतीने घातलेला घाव आहे, असे दिसते. या ठाण्याने यापूर्वी बंडखोरी पाहिली होती. नगरपालिका असतांना मारोतराव शिंदे यांनी बंडखोरी करून ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग लावला होता. त्यावेळी गाजलेले हे ठाणे आम्ही डोळ्यांनी पाहिले. मारोतराव शिंदे यांची गाढवावरून धिंड काढा म्हणून बाळासाहेबांनी केलेले आवाहन, त्यानंतर शिवाजी मैदानावर झालेली ती विराट सभा ही एक त्यावेळी स्थिती होती आणि आज ५६ वर्षानंतर बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणारे बॅनर ठिकठिकाणी लागतात, हाच एक मोठा फरक आहे.

एकनाथ शिंदे हे ‘मुख्यमंत्री’ झाल्याने ठाणे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात ठाण्याला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता शिवसेनेचे असलेले ठाणे आता राहणार का? हा प्रश्‍न विचारला जात आहे. राजकीय पक्ष हे कधीच संपत नसतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नसताना एवढे मोठे बंड झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्रीपदी असताना उध्दव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयात गेले नाहीत; मात्र राजीनामा देण्याची वेळ येताच उध्दवजी सतत दोन दिवस मंत्रालयात आले. जेव्हा शिवसेना बुडते आहे, हे लक्षात आले, तेव्हा उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवनची पायरी चढली. हा फरक कशामुळे झाला तर शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे! या बंडाला अनेक कांगोरे आहेत. बंडामध्ये सामील झालेल्या प्रत्येक आमदाराचे विषय व खदखद ही वेगवेगळी आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे जास्त रोष हा खासदार संजय राऊत यांच्या मदतीने शरद पवारांनी शिवसेना संपवायला घेतली आहे म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत, हा बंडखोर आमदारांचा युक्तीवाद आहे.

सन २०१९ च्या निवडणुकीत लोकसभेच्या नऊ मतदारसंघांत व विधानसभेच्या ४२ मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी शिवसेनेच्या उमेदवारांनी टक्कर दिली होती. आजही कोकणातून सहा वेळा निवडून गेलेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते व शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही गेल्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीत चाललेले सत्ताकारण पसंत नव्हते. सुभाष देसाई व दिवाकर रावते हे शिवसेनेचे नेते. त्यांनी पक्षवाढीसाठी योगदान दिले; त्यांनाही उमेदवारी न देता घरी बसविले. मात्र, जेव्हा शिवसेनेमधून फुटून ८० टक्के आमदार गेले, तेव्हा उध्दवजींच्या बाजुला उजव्या व डाव्या खुर्चीवर हे दोन नेते शिवसेनाभवन येथे बसलेले दिसून आले. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत असे नव्हते. आनंद दिघेंच्या रोषानंतर सतीश प्रधानांचे पुनर्वसन बाळासाहेबांनी केले. त्यांना पाच वर्षे राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. ती परिस्थिती आता न राहिल्याने हा बंडाचा झेंडा ठाण्यातील एकनाथ शिंदेनी उचलला हे महत्वाचे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in