भाजपविरोधात लढण्याचा राष्ट्रवादी निर्धार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत
भाजपविरोधात लढण्याचा राष्ट्रवादी निर्धार

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव तिसरी आघाडी उभारण्याच्या गोष्टी करीत असताना पवार हे मात्र सर्व विरोधकांच्या एकजुटीची भूमिका पुढे नेत आहेत. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा मुकाबला करणे शक्य नसल्याची त्यांची भूमिका आहे आणि आजच्या काळात तीच व्यवहार्य आणि राजकीय शहाणपणाची भूमिका म्हणता येऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यांनीही पवार यांचीच भूमिका मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला वगळून भाजपशी मुकाबला होऊ शकत नाही, या मुद्द्यावर पवार आणि नितीशकुमार यांचे एकमत आहे. जे पक्ष भाजपविरोधी आघाडीत सहभागी होऊ शकतात, त्या पक्षांमध्येही आपसात मतभेद आहेत. तरीसुद्धा व्यापक भूमिका घेऊन ही एकजूट घडवण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. अशा वेळी या पक्षांच्या नेत्यांनी किमान एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करू नयेत, अशी अपेक्षा बाळगता येऊ शकते. अर्थात, हे भान आणि तेवढी समज सगळ्याच नेत्यांना असते, असे नाही. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते पी. सी. चाको हे त्यापैकी एक म्हणावे लागतील. कारण एकीकडे शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी झटत असताना त्यांच्याच पक्षाचे पी. सी. चाको यांनी मात्र काँग्रेसवर टीका करून आघाडीतले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या विरोधात असेल, म्हणून देशपातळीवरील व्यापक भूमिकेसाठी काही तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. चाको यांना मात्र ते तारतम्य दाखवता आलेले नाही. त्यांनी काँग्रेसवर आणि थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेवरच टीकास्त्र सोडले आहे. या यात्रेचा काही परिणाम होणार नाही. काँग्रेस मेलेली नाही, हे दाखवण्यापुरताच भारत जोडो यात्रेचा उद्देश असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. विरोधी पक्षांची एकजूट घडवून आणण्याची क्षमता असलेले शरद पवार हे एकमेव नेते असल्याचेही चाको यांनी म्हटले आहे.

चाको यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वासंदर्भात केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे; परंतु त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रासंदर्भात विधान करून पवार यांनीच मांडलेल्या व्यापक भूमिकेशी विसंगत सूर लावला आहे. ठिकठिकाणी विरोधी पक्षांचे नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होत असताना किंवा पाठिंबा देत असताना स्थापनेपासून काँग्रेससोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने विरोधात वक्तव्य करण्यामुळे त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवर होऊ शकतो. शरद पवार यांच्या भूतकाळातील काही निर्णयांचे दाखले देऊन त्यांच्यासंदर्भात संशयकल्लोळ निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतात. त्याला पुष्टी देण्याचे काम चाको यांच्यासारखे नेते करीत असतात, हे लक्षात घ्यावे लागते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा विचार या पार्श्वभूमीवर करावा लागतो. अधिवेशनामध्ये शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आणि कार्यकर्त्यांना नेमके दिशादर्शन केले; परंतु त्याऐवजी चर्चा झाली ती महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कथित नाराजीची. अजित पवार हे राष्ट्रीय प्रश्नांसंदर्भात कधीही बोलत नाहीत. त्यासंदर्भात शरद पवार, प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे बोलतील, असे सांगत असतात. महाराष्ट्राबाहेरील विषयावर आपण बोलणार नाही, असे स्पष्टपणे सांगत असतात. दिल्लीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी भाषण न करण्यामागे तीच भूमिका होती; परंतु माध्यमांनी त्याला नाराजीचा रंग दिला. अजित पवार यांची पक्षातील आणि जनमानसातील ताकद शरद पवार यांनाही माहीत आहे आणि त्यांनी बोलायचे ठरवले असते तर कुणी नाव पुकारण्याचीही वाट पाहिली नसती आणि त्यांना कुणी अडवू शकले नसते. भाषण न करण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. हे नीट समजून घेतले तर राष्ट्रीय अधिवेशनाला जी वादाची फोडणी दिली गेली, त्यातला फोलपणा स्पष्ट होतो.

दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांची लक्षणीय गर्दी. अधिवेशनाचे नियोजनच युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते अधिवेशनासाठी उपस्थित होते. त्यामुळे अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात अधिवेशन पार पडले. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना जे विचार दिले, ती विचारांची शिदोरी कार्यकर्त्यांना दिशादर्शक होती.

शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू असते. शरद पवार हे याच महापुरुषांचे विचार पुढे नेणारे देशातील प्रमुख राजकीय नेते आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विचारधारेमध्ये कधी संदिग्धता किंवा वैचारिक गोंधळाला थारा मिळाला नाही. स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या भूमिकेपासून फारकत घेतलेली नाही हे वास्तव समोर आहे. महत्त्वाचे म्हणजे या अधिवेशनाने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय राजकारणातील भूमिका ठळकपणे समोर आणली. आजच्या अत्यंत कठीण काळात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असल्याचा संदेश अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आला.

भारतीय जनता पक्षाविरोधात संघर्ष करण्याची रोखठोक भूमिका घेऊन शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणातील आपली दिशा स्पष्ट केली आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या कार्यक्रमापैकी पहिला कार्यक्रम आहे तरुणांचे नेतृत्व उभे करण्याचा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणुकीत कायद्यानुसार निम्म्या जागा महिलांना जाणार आहेत; परंतु एकूण उमेदवारांपैकी निम्मे उमेदवार तरुणांपैकी असावेत, असे पवार यांनी म्हटले आहे. पक्षाच्या राज्य शाखांचे प्रमुख, जिल्हा प्रमुखांनी तरुणांना पुढे आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना पवार यांनी केली आहे. दुसरा कार्यक्रम दिला आहे, तो भाजपशी लढण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्याचा. राज्याराज्यांमध्ये त्यासंदर्भात बैठका घेऊन रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा करावी. वैचारिकदृष्ट्या आपल्याला जवळच्या असलेल्या पक्षांना सोबत घेऊन एकत्रितपणे काही कार्यक्रम घेता येईल का, याचाही विचार करण्याची सूचना पवार यांनी दिली आहे. महागाई, अत्याचार, बेरोजगारी यासारखे विषय घेऊन रस्त्यावर उतरून शांततामय मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. तरुणांना संधी, समविचारी पक्षांशी आघाडी आणि जनतेच्या प्रश्नावर संघर्ष अशी त्रिसूत्री पवार यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशापुढे, लोकशाहीपुढे अनेक संकटे उभी आहेत. जगाच्या व्यासपीठावर भारताने लोकशाहीवादी देश म्हणून आपली प्रतिमा टिकवून ठेवली असली तरी ती प्रतिमा धोक्यात आली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या विचारांचा पगडा समाजावर असल्यामुळे इथल्या तरुणांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी लोकशाही बळकटीकरणासाठी योगदान दिले. लोकशाहीवर अनेक हल्ले झाले; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे नागरिकांमधील स्वातंत्र्य आणि संसदीय लोकशाहीबद्दलची आदराची भावना टिकून राहिली असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्याच्या कठीण काळातही गांधी-नेहरूंचे विचार आणि बाबासाहेबांचे संविधानच देशातील लोकशाहीचे रक्षण करू शकेल, असा विश्वास पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ही वैचारिक भूमिका आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधी लढण्याचा निर्धार हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in