पुन्हा जुना घरोबा!

भाजपच्या सिंहासनाला २०२४च्या निवडणुकीत हादरा देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन नीतिशकुमार यांनी केले आहे
पुन्हा जुना घरोबा!

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी काडीमोड घेऊन पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा केला आणि बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतिशकुमार यांनी आठव्यांदा शपथ ग्रहण केली. संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा त्याग करण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याचे नीतिशकुमार यांनी या राजकीय उलथापालथीबद्दल बोलताना भाष्य केले. नीतिशकुमार यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून पाहिले जाते. पण ते बराच काळ बिहारच्या राजकारणात गुंतून पडले असल्याचे दिसून आले. पण आता पुन्हा राष्ट्रीय राजकारणात नव्या दमाने उतरण्याचा निर्धार त्यांनी केला असल्याचे दिसून येते. भाजपच्या सिंहासनाला २०२४च्या निवडणुकीत हादरा देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन नीतिशकुमार यांनी केले आहे. २२ वर्षांमध्ये आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नितिशकुमार यांनी एक विक्रमच केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नीतिशकुमार यांनी लक्ष्य केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना! मोदी यांनी २०१४ ची निवडणूक जिंकली पण आता त्यांनी २०२४च्या निवडणुकांची चिंता करावी, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांना त्यांनी दिला आहे. नीतिशकुमार हे बिहारच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात. २०२० च्या निवडणुकीनंतर आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. पण आपल्यावर ही जबाबदारी घेण्यासाठी सर्व बाजूंनी दबाब आला. त्यानंतर आतापर्यंत काय घडले ते आपण पाहात आहात. पण २०१४ सालामध्ये आता आपण रममाण होणार नाही, हेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले! नितीश कुमार हे आता सात पक्षांच्या आघाडीचे मुख्यमंत्री झाले आहेत. ज्या लालूप्रसाद यादव यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली त्या लालूप्रसाद यादव यांच्या पक्षांसमवेत त्यांना जुळवून घ्यावे लागले. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वीप्रसाद यादव यांचा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करावा लागला! राजकारणामध्ये काहीही घडू शकते याची प्रचिती, बिहारमध्ये जे सत्तांतर झाले त्यावरून पुन्हा एकदा आली! नीतिशकुमार यांनी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी का सोडली याबद्दल बरीच वक्तव्ये केली जात आहेत. एकेकाळी नीतिश कुमार यांच्या अत्यंत जवळचे असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी, नीतिश कुमार हे भाजपसोबत अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दल आणि अन्य पक्षांसमवेत युती करण्याचा निर्णय घेतला, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. हे सांगतानाच नवे सरकार बिहारच्या हितासाठी चांगली पावले टाकील, अशी अपेक्षा प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे. त्याच वेळी राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांची भ्रष्टाचारासह विविध मुद्यांबाबतची धोरणे भिन्न आहेत, याची आठवण करून देण्यासही प्रशांत किशोर विसरले नाहीत. तर भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी, नीतिशकुमार यांची उपराष्ट्रपती होण्याची इच्छा होती. पण भाजपने त्यास विरोध केल्याने त्यांनी भाजपची संगत सोडली, असे म्हटले आहे. पण त्यावर संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन यांनी, नीतिश कुमार यांच्याशी निकटचे संबंध असल्यावरून भाजपने त्यांना दूर लोटले असल्याची आठवण करून दिली. अशा वावड्या सोडून काही प्रमाणात आपले राजकीय पुनर्वसन होईल, असे त्यांना वाटत असावे, अशी पुस्ती ललन यांनी जोडली. संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी काडीमोड घेतल्याने देशामध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले असल्याचे विरोधकांना वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकार पडल्यानंतर भाजपच्या हातात आणखी एक राज्य आले. पण तो सर्व आनंद नीतिश कुमार यांनी हिरावून घेतला! भाजपने झारखंडच्या दिशेने ‘बाउन्सर’ टाकला होता पण त्यामध्ये बिहारचे सरकारच गमवावे लागले, अशी टीका छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. नीतिश कुमार विरोधकांना जाऊन मिळाल्याने २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीस पराभूत करू शकू, असे विरोधकांना वाटू लागले आहे. पण सत्तेच्या नवीन समीकरणामध्ये पंतप्रधानपद कोणाकडे जाणार यावर मतैक्य होण्याची गरज आहे. त्या पदासाठी इच्छुक अनेक आहेत. त्यामध्ये नीतिश कुमार हेही एक आहेत. ते गुंतागुंतीचे गणित सुटले तर विरोधकांचे स्वप्न साकार होऊ शकेल अन्यथा नाही! नीतिश कुमार यांनी पुन्हा जो जुना घरोबा केला आहे तो प्रदीर्घ काळ टिकावा, अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in