पावसाचे कथन विज्ञान की अंधश्रद्धा

जून महिना सुरू झाला की, वेध लागतात आगामी पाऊसकाळाचे. शेतकऱ्यांना ते अधिक तीव्रतेने लागतात. त्यातच या सुमारास गावोगावच्या जत्रा-यात्रांमध्ये यंदाचा पाऊस कसा असेल, याविषयीची शक्यता वर्तवणारी भाकिते प्रसिद्ध होऊ लागतात आणि वळीवाच्या पावसाच्या जोडीला आशा-निराशेचा खेळ सुरू होतो.
पावसाचे कथन विज्ञान की अंधश्रद्धा

वेध

प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड

जून महिना सुरू झाला की, वेध लागतात आगामी पाऊसकाळाचे. शेतकऱ्यांना ते अधिक तीव्रतेने लागतात. त्यातच या सुमारास गावोगावच्या जत्रा-यात्रांमध्ये यंदाचा पाऊस कसा असेल, याविषयीची शक्यता वर्तवणारी भाकिते प्रसिद्ध होऊ लागतात आणि वळीवाच्या पावसाच्या जोडीला आशा-निराशेचा खेळ सुरू होतो. या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्गात औत्सुक्याचा आणि श्रद्धेचा विषय असणारी भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी आणि तो सगळा सोहळा पार पडला आहे. त्याचा निकाल समोर आला असून जून आणि जुलै हे महिने कमी पावसाचे असल्याचे सांगितले गेले आहे. पावसाळ्यातील तिसरा महिना चांगल्या पावसाचा असेल. चौथा महिना सर्वत्र चांगला पाऊस होईल. तसेच यंदा अवकाळीही भरपूर पडेल, असे या भेंडवळच्या भाकणुकीतून स्पष्ट झाले. थोडक्यात, यंदाचा मान्सून आशादायक आहे, असे म्हणण्यास वाव आहे. थोडक्यात आता पारंपरिक ठोकताळे आणि आधुनिक विज्ञानाच्या आधारे मांडलेले अंदाज हे दोन्ही समोर आले आहेत.

एकीकडे शास्त्रज्ञ वातावरणातील बारीकसारीक बदलांचा अभ्यास करून आगामी मान्सूनसंबंधी अंदाज व्यक्त करतात, तर दुसरीकडे भारतीय कृषी परंपरेतील या श्रद्धा आणि विश्वासावरही कृषिक्षेत्र बऱ्यापैकी भरवसा ठेवते. म्हणून आधुनिक विज्ञान आणि वर्षानुवर्षाच्या परंपरा यातील श्रेष्ठत्वाची चर्चा, जनमानसाचा दृष्टिकोन आणि त्यातील योग्यायोग्यता यावर दरवर्षी चर्चा झडते. रिवाजाप्रमाणे यंदाही ती घडली. भावी पर्जनकाळासंबंधीची ही दोन्ही भाकिते साधारणपणे एकाच वेळी समोर मांडली जातात. त्यानुसारच यंदा वर्तवले गेलेले ‘पाऊस चांगला आणि राजा तोच’ हे कथन चर्चेत आहे. काही लोक यास अंधश्रद्धा म्हणतात वा मानतात. परंतु मागील साठ वर्षांच्या काळात या दोन्ही दृष्टिकोनांबाबतचे जनमत लक्षात घेता हा दृष्टिकोन चुकीचा ठरत नाही, असे दिसते.

तसा विचार करता दोन्ही दृष्टिकोन ढोबळच असतात. एकीकडे शास्त्राचा आधार तर दुसरीकडे देवाचा आधार असल्याचे सांगितले जात असले तरी हे दोन्ही दृष्टिकोन शंभर टक्के खात्रीशीर नसतात, ही यातील पहिली आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणावी लागेल. खेरीज वर्षानुवर्षांच्या सवयीमुळे शेतकरी यात्रा-जत्रांमधील भाकणुकीवर अधिक भरवसा ठेवताना दिसतो. त्या तुलनेत पावसाबाबतच्या पाश्चिमात्य दृष्टिकोनावर त्याचा फारसा विश्वास नसतो.

अशा या दोन दृष्टिकोनांमधील पाश्चिमात्य दृष्टिकोनाचा विचार करायचा तर, ते टक्केवारीच्या मापकात यंदा किती पाऊस पडेल हे सांगतात. उदाहरणार्थ, गेल्या दहा वर्षांमधील आकडे पाहिले तर ते ९७ ते १०५ टक्क्यांदरम्यान असलेले दिसून येतात. मागील वर्षी ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यावेळी १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मागील वर्षी शास्त्रज्ञांची बरीच गफलत झाल्याचे समोर आले. कारण देशातील तसेच राज्यातील बऱ्याच भागांमध्ये दुष्काळ पडला तर काही भागात चुकीच्या वेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळेच शास्त्रानुसार सखोल अभ्यास करून वर्तवलेला अंदाजही शंभर टक्के खरा ठरतो असे दिसत नाही. पारंपरिक ज्ञानानुसार काही गृहितकांच्या वा मांडणीच्या आधारे व्यक्त होणाऱ्या आणि ग्रामीण बाजाच्या अंदाजकथनाला पाश्चात्य लोक अंधश्रद्धांचा कारभार म्हणतात. मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे अजूनही भारतीय शेतकरी याच दृष्टिकोनाला चिकटून आहे.

सध्या दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी हे धोके वाढले आहेत. त्यामुळे होणारे नुकसानही बरेच मोठे असते. अशा नैसर्गिक संकटामुळे शेतमालाचे नुकसान होतेच, खेरीज जीवितहानीचा धोकाही बराच मोठा असतो. म्हणूनच हा संभाव्य धोका वा नुकसान टाळण्यासाठी ढोबळमानाने व्यक्त होणारे हे अंदाज गांभीर्याने अभ्यासले जातात. मात्र अद्यापही हे दोन्ही अंदाज शेतकऱ्यांना शंभर टक्के उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. मागील वर्षाचे उदाहरण द्यायचे तर काही भागात दुष्काळ पडला तर काही भागात दर महिन्याला पाऊस पडत राहिला. अगदी आत्ता-आत्तापर्यंत अवकाळी पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचे आकडे अगदी ताजे आहेत. म्हणजेच सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत मागील मेपासून सतत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतच असेल तर अशा भाकितांचा नेमका उपयोग काय आणि त्यावर विश्वास ठेवून नेमके काय साधते, हा प्रश्न उरतो.

त्यातल्या त्यात तुलना करायची तर परंपरांगत पद्धतीने व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये काही प्रमाणात तरी तथ्य आढळून येते. उदाहरणार्थ, मागील वर्षी ‘हानिकारक पाऊस’ असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार खरोखर वर्षभर वेळी-अवेळी आणि कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने ती हानिकारकता दाखवून दिली. हा पाऊस खरोखरच शेतकऱ्यांची खूप हानी करून गेला. म्हणूनच भारतीय दृष्टिकोनाला अंधश्रद्धा न मानता त्याचा शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे, असे वाटते. या भाकितांचा अभ्यास करून, त्यांचे ठोकताळे कोणते हे पाहून त्यांचा रितसर आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला तर या मातीतील पावसाविषयी कदाचित आणखी काही माहिती हाती लागू शकेल. मात्र अद्याप तरी कोणी असा प्रयत्न करण्याची तयारी दर्शवलेली नाही वा असा विचारही समोर आलेला नाही.

शेवटी शेतकरी सुखी होणे अधिक महत्त्वाचे आहे. आजही देशातील मोठे शेतीक्षेत्र मान्सूनमधील पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे योग्य वेळी पाऊस झाला तरच तो सुखी होतो, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच संपूर्ण हंगामात प्रमाणात पाऊस पडणे गरजेचे आहे. शेतीला पूरक पाऊस न पडल्यास शेतकऱ्याला कोणताही लाभ होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये खरीप हंगामात अगदी कमी पाऊस पडताना दिसून येत आहे. काही ठिकाणी तर खरीप हंगाम पूर्णपणे कोरडाच जातो. उलटपक्षी, दुसरीकडे याच हंगामात पिके वाहून जातील, इतका पाऊस होतो. सहाजिकच हा पाऊस हानिकारक ठरतो. पाश्चात्य पर्जन्यशास्त्रानुसार ‘अल निनो’च्या स्थितीनुसार पावसाचा अंदाज वर्तवला जातो. सध्या ही स्थिती पूरक असल्यामुळे चांगल्या म्हणजेच १०५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र आधी विवेचन केल्याप्रमाणे हा चांगल्या टक्केवारीनिशी पडणारा पाऊस संपूर्ण हंगामात शेतीला पूरक प्रमाणात पडला तर उपयुक्त आहे. एकाच दिवशी अतिरेकी पाऊस बरसला तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा तो कोणता? केवळ मोठ्या शहरांमध्ये पाऊस झाला आणि माळराने कोरडी राहिली तर शेतकऱ्यांना काय फायदा? थोडक्यात, पावसाच्या केवळ अंदाजावर अवलंबून राहणे वा त्यावर विश्वास ठेवून निर्धास्त होणे अयोग्य आहे. त्याऐवजी संभाव्य धोके टाळण्यासाठी बदलत्या हवामानाचा विचार करत शेतीक्षेत्रात मूलभूत बदल करणे गरजेचे आहे, असे वाटते.

खरीप, रब्बी आणि उन्हाळी हे शेतीचे तीन महत्त्वाचे हंगाम आहेत. या तीनही हंगामात पूरक आणि पुरेसा पाऊस झाला पाहिजे. तरच तो पाऊस समाधानकारक म्हणता येईल. मात्र पाश्चिमात्य शास्त्रही यासंबंधीचा अंदाज व्यक्त करू शकत नाही. त्यामुळेच वर्तमानपत्रांमध्ये हे अंदाज व्यक्त होत असले तरी शेतकरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. हे बघून तरी पाश्चिमात्य ते सगळेच बरोबर आणि भारतीय ते सगळेच चुकीचे, या मानसिकतेमधून आता आपण बाहेर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण बाहेरच्या शास्त्राप्रमाणेच आपल्या शास्त्राचाही नव्याने अभ्यास करणे गरजेचे आहे.

यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असला तरी तो सगळीकडे समान पडेल असे नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंडिगड, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव याठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. परंतु जम्मू आणि काश्मीर, लद्दाख, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये सामान्य पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या आसपासच्या भागातही कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(लेखक प्रख्यात शेतीतज्ज्ञ आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in