पवार, शिंदे, ठाकरे आणि बरेच...

राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण हेच सांगत आहे. शरद पवारांनी मला आजवर कधीही गुगली टाकलेला नाही, हे एकनाथ शिंदे यांचे विधान अतिशय बोलके असून सद्य राजकारणावर प्रकाश टाकणारे आहे. व्यावहारिक राजकारण करताना ताठरपणा चालत नाही, तशी भावनिकताही कामी येत नाही. याउलट गरज असेल तिथे वाकता यायला पाहिजे, हेच दिल्ली ते गल्लीतल्या भेटीगाठी सांगत आहेत.
पवार, शिंदे, ठाकरे आणि बरेच...
एक्स @PawarSpeaks
Published on

मुलुख मैदान

रविकिरण देशमुख

राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण हेच सांगत आहे. शरद पवारांनी मला आजवर कधीही गुगली टाकलेला नाही, हे एकनाथ शिंदे यांचे विधान अतिशय बोलके असून सद्य राजकारणावर प्रकाश टाकणारे आहे. व्यावहारिक राजकारण करताना ताठरपणा चालत नाही, तशी भावनिकताही कामी येत नाही. याउलट गरज असेल तिथे वाकता यायला पाहिजे, हेच दिल्ली ते गल्लीतल्या भेटीगाठी सांगत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच धामधुम सुरू आहे. त्यातच एक मजेशीर घटना घडली. त्याचे पडसाद पुढचे अनेक दिवस उमटत राहतील अशी चिन्हं दिसू लागली आहेत. घटना दिल्लीत घडली असून त्याची कंपने मुंबईत जाणवतील असे दिसते.

मंगळवारी दिल्लीत 'सरहद' या संस्थतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपताच शिंदेनी दिल्लीला कूच केले आणि डोक्यावर शिंदे पगडी घालून हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारला. त्यावेळी बराच मुक्तसंवादही झाला.

ही घटना सहज सोपी नाही. अलीकडे शिंदे अबोल असतात, चेहऱ्यावर हास्यरेषा फारशा उमटत नाहीत, मंत्रालयात कमी येतात, काही महत्त्वाच्या बैठकांना हजर नसतात, रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद, त्यांच्या मंत्र्यांना मनाजोगते स्वीय सहाय्यक (पीए), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) आणि खासगी सचिव (पीएस) घेऊ दिले जात नाहीत, काही समित्यांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, अशा अनेक चर्चा मंत्रालय परिसरात ऐकायला येत आहेत.

मध्ये त्यांनी आभार दौरा सुरू केला. दोन-तीन ठिकाणी जाऊन आले. शिवसैनिकांशी संवाद साधला. पण पूर्वीचा जोश, धडाडी दिसत नाही, असे म्हटले जात असतानाच दिल्लीत शरद पवार आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत ते काहीसे मनमोकळेपणाने बोललेले दिसतात. पवारांचा गुगली भल्याभल्यांना समजत नाही. पण त्यांनी मला आजवर कधी गुगली टाकलेला नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत, हे त्यांचे विधान बरेच बोलके आहे.

पवारांनी शिंदेंचा गौरव करताना सातारा जिल्ह्याचे राजकीय महात्म्य सांगितले. आता बरेच पक्ष घायाळ होणार, याची चुणूक दिसून आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांची या सन्मान समारंभावरची उद्वेगजनक प्रतिक्रिया बरेच काही सांगणारी आहे. भाजपा उघड प्रतिक्रिया देणार नाही; पण दुर्लक्षही करणार नाही आणि अजित पवार काही डोळे बंद करून घेणार नाहीत.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा भर भावनिकतेवर आहे. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा वाटा अधिक आहे. लोक व्यक्तिमत्त्वावर प्रेम करताना गुण-दोषांचा विचार करत नाहीत. याचा फायदा शिवसेनेला मिळाला. इतर पक्षांनीही राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या प्रतिमांचा पुरेपूर वापर करत लोकांना त्यात गुंतवून ठेवत राजकारण केले. सदोदित महापुरुषांची नावे घेणारे विविध घोटाळ्यात सहभागी कसे काय असू शकतात, त्यांच्यावर गंभीर आरोप असतील तर त्यांना महापुरुषांची नावे घेऊन लोकांना आवाहन करण्याचा नैतिक अधिकार असतो का, असे प्रश्न सहसा लोकांना पडत नाहीत. मते मागताना महापुरुषांच्या प्रतिमा वापरायच्या आणि व्यावहारिक राजकारण करताना स्वतःचा स्वार्थ पुढे करायचा, यामुळे राज्याचे राजकारण भरकटत गेले.

पवार आणि शिंदे यांच्या दिल्लीतल्या कार्यक्रमामुळे ठाकरे सेना जास्तच अस्वस्थ झाली आहे. भावनिक राजकारण सातत्याने केल्यामुळे राजकीय व्यवहार चातुर्याला सोडचिठ्ठी दिली जाते आणि मग टोकाच्या प्रतिक्रिया येतात. झपाट्याने बदलत चाललेल्या राजकारणात सध्या आपण कोठे आहोत आणि पुढे कसे जायचे आहे, त्यासाठी काय करावे लागेल याचा विचार गांभीर्याने केला नाही तर काही पक्षांना कठीण दिवस येणार आहेत हे नक्की. एकीकडे पवार-शिंदे जवळीक नवी चर्चा निर्माण करत असेल तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना सतत भेटून काय साध्य करतात हाही चर्चेचा विषय बनतो.

पवारांच्या हातून सत्कार स्वीकारताना शिंदे काहीसे मोकळेपणाने बोलतात आणि त्याला ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपाचे नेते उपस्थित असतात. तिथे शिंदे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाविषयी आपलेपणाने बोलतात. त्यांनी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांचा उल्लेख आवर्जून करतात. हे सहज दुर्लक्षिण्यासारखे नाही. शिंदेंच्या विधानाचा संदर्भ घेताना, पवारांनी शिंदेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुगली टाकला नाही हे ही महत्त्वाचे आहे. त्या काळात या दोन नेत्यांच्या भेटीगाठी हा चर्चेचा विषय होता. त्याविषयी शिंदे यांना माध्यमांकडून विचारणाही झाली होती. मंत्रालय आणि विधान भवन परिसरात अनेक वावड्या उठत असतात. पवार-शिंदे यांच्याबाबतही वावड्या होत्याच.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत पवार आणि शिंदे यांनी एकामेकांना लक्ष्य केलेले दिसले नाही. हो दोघेही नेते एकामेकांवर टीका करताना दिसले नाहीत. याचीही चर्चा होती. पवारांच्या राष्ट्रवादीचा शिंदेंच्या सेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, याचीही चर्चा झाली. राजकीय हालचालींकडे घारीसारखे लक्ष देणाऱ्या भाजपाची नजर त्याकडे वळली नसेल असे म्हणणे धाडसाचे होईल. लोकसभा सोडा, पण विधानसभेत अनेक व्यूहरचना झाल्या. त्यात शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना, दादांची राष्ट्रवादी विरुद्ध साहेबांची राष्ट्रवादी, भाजपा विरुद्ध काँग्रेस इतका सोपा खेळ नव्हता. त्यात भाजपा विरुद्ध इतर असाही एक वेगळा कोन होता. त्यात पवारांची राष्ट्रवादी अधिकाधिक कमजोर झाली पाहिजे आणि राज्यातील संभाव्य असे एक वेगळे समीकरण जन्माला आले नाही पाहिजे, असाही अफलातून खेळ झाला.

राजकारण फार मजेशीर असते. इथे क्षणात शत्रूचा मित्र होतो आणि मित्राचा शत्रू होतो. दात-ओठ चावून ज्याच्या विरोधात चाली रचल्या त्याला गळाभेट देऊन छान हसून पोज देता आली पाहिजे. राजकारणात प्रसंग पाहून जो निर्णय घेतो तो अधिक टिकतो. ताठरपणाला इथे वाव नाही. हातांना आणि पाठीला स्प्रिंग असाव्या लागतात. जिभेवर काबू ठेवावा लागतो. आत्ता या क्षणाला काय असा विचार करतानाच दूर-दूरचा विचार करावा लागतो. तात्कालिक फायद्याचा विचार न करता माणसांमध्ये गुंतवणूक करावी लागते. शिंदेंनी ती केली म्हणून ते शांत दिसतात. घाई अथवा वाचाळपणा करताना दिसत नाहीत.

पण सध्याचे राजकारण किती काळ चालेल, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडत असणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम एकदा पार पडला की घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत भाजपाचे सूत व्यवस्थित जमले आहे. त्याचाही त्रास बहुदा शिंदे सेनेला होत आहे. त्यामुळेच की काय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरचा वाद लगेच संपताना दिसत नाही.

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यात बरेच काही सुरू आहे. उद्योग विभागातील कामकाज पद्धतीवरून उदय सामंत घुश्श्यात दिसताहेत. एसटी महामंडळातील निर्णयांवरून प्रताप सरनाईक उघड बोलत नसले तरी चुळबूळ सुरू आहेच. त्यांना एसटीच्या काही हजार एकर जमिनीचा विकास करायचा आहे. पण निर्णयासाठी महत्त्वाचे असलेले महामंडळाचे अध्यक्षपद परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे गेले आहे. शिंदे यांच्या सहकारी मंत्र्यांना धडाधड निर्णय घ्यायचे असतीलही, पण त्यांनी सरकारी खाच-खळग्यांचा अभ्यास करायला पाहिजे.

मुळात एसटीची एकूण जमीन जेवढी दिसते तेवढी ती पूर्णपणे महामंडळाच्या मालकीची नाहीच. निम्म्यापेक्षा जास्त जमिनीवर इतर हक्क आहेत. याचा अभ्यास केला नाही तर शिंदेसेना अडचणीत येण्याची शक्यता जास्त. ते चांगलेच अडचणीत येईपर्यंत त्यांना कोणी सावध करेल का? हा सुद्धा एक प्रश्नच आहे.

ravikiran1001@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in