आयोगाकडून जबर धक्का!

शिवतीर्थावरील मेळावा हा ‘एकनिष्ठ’ शिवसैनिकांचा असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
आयोगाकडून जबर धक्का!

शिवसेनेवर नेमका कोणाचा अधिकार, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणाकडे यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन वेगळा गट स्थापन केला आणि आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. शिवतीर्थ आणि बांद्रा- कुर्ला संकुलातील मैदानांवर जे भव्य दसरा मेळावे आयोजित करण्यात आले होते त्यावेळीही दोन्ही मेळावे शिवसेनेचेच असल्याचे जनमानसावर ठसविण्याचा प्रयत्न ठाकरे आणि शिंदे गटांकडून करण्यात आला.

शिवतीर्थावरील मेळावा हा ‘एकनिष्ठ’ शिवसैनिकांचा असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते. दसरा मेळावे आयोजित करून दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करून शिवसैनिक आमच्यामागे आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला; पण केवळ समर्थकांनी शिक्कामोर्तब करून ही लढाई जिंकता येणार नव्हती. यासंदर्भात दोन्ही गटांनी निवडणूक आयुक्तांकडे धाव घेतली. आपल्यामागेच कसे पाठबळ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात आला. याच दरम्यान, निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ३नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे ३ ऑक्टोबरला घोषित केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच शिंदे गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळायला हवे, असा दावा आयोगाकडे केला. तर ठाकरे गटाचा त्या चिन्हावर दावा होता. ठाकरे आणि शिंदे गटांकडून निवडणूक आयोगापुढे युक्तिवाद करण्यात आले. आपलीच शिवसेना कशी खरी आहे यासंदर्भात कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली. पक्षाच्या घटनेचे दाखले देण्यात आले; पण एवढ्या अल्पावधीत आयोगापुढे जी माहिती सादर करण्यात आली त्याद्वारे निवडणूक चिन्हांबाबत कायमस्वरूपी निर्णय घेण्याचे आयोगाने टाळले. आयोगाकडे जी कागदपत्रे दोन्ही गटांकडून सादर करण्यात आली आहेत त्यांची पडताळणी केल्याशिवाय अंतिम निर्णय देता येणार नव्हता. त्यामुळे तोंडावर आलेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लक्षात घेऊन आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले. आयोगाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला. कारण अंधेरी पूर्व मतदार संघातून शिवसेनेचे रमेश लटके हे निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे. आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटास या निवडणुकीत पक्षनाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. या मतदार संघात भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. शिंदे गट आणि भाजप याची युती असल्याने भाजप उमेदवारास शिंदे गटाचे समर्थन असणार हे उघड आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाचा शिंदे गटावर तसा थेट परिणाम होणार नाही. कारण कमळ चिन्हावर भाजपचा उमेदवार ही निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटास बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. पक्षनाव आणि चिन्ह गोठविण्याचा निर्णय देतानाच आज, १० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत नाव आणि चिन्ह यांचे तीन पर्याय आयोगास सादर करण्यात यावेत, असा आदेश दोन्ही गटांना देण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाने आयोगाने जो निर्णय दिला आहे त्यामुळे ‘लोकशाहीचा मुडदा’ पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच या निवडणुकीसाठी आयोगाने ‘मॅचफिक्सिंग’ केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला असल्याचा आरोप युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अंधेरीची पोटनिवडणूक शिंदे गट लढविणार नसताना त्या गटास धनुष्यबाण चिन्ह हवेच कशाला, असा युक्तिवाद शिवसेनेकडून आयोगाकडे करण्यात आला होता. पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय देऊन प्रामुख्याने उद्धव ठाकरे गटास हादरा दिला आहे. आयोगाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार ठाकरे गट करीत आहे. पक्षाचे नाव वा चिन्ह गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने या आधीही अन्य पक्षांच्या बाबतीत दिला आहे. काँग्रेस, लोकजनशक्ती पक्ष, उत्तराखंड क्रांती दल या पक्षात फूट पडल्यानंतर आयोगाने वेगळी नावे आणि वेगळी चिन्हे दिली होती. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बैलजोडी या चिन्हांवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी एका गटास बैलजोडी आणि दुसऱ्या गटास गायवासरू हे चिन्ह आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आयोगाचा निर्णय हंगामी स्वरूपाचा आहे, त्यात बदल होऊ शकतो हे दोन्ही गटांनी लक्षात घ्यायला हवे!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in