सामाजिक भितीचा बागुलबुवा

विनयभंगाची तक्रार आहे. अजून एफआयआर केली नाही तुझ्यावर.. तू नाही आलास तर सरळ नोटीस पाठवेन तुझ्या घरी
सामाजिक भितीचा बागुलबुवा

ए.. तू साहेबराव असशील नाहीतर आणि कुणी. मी पी.आय. बोलतोय पोलीस स्टेशनमधून.

पी.आय...? (आश्चर्याने)

तुला काय आयडी दाखवायला पायजे काय रे... ए..

काय झालं सर...

आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला हजर व्हायचं.

पण झालंय काय?

आमालाच विचारतोयस होय रे...काय झालंय म्हणून

हे बघा पी.आय. साहेब मी तुमच्याबरोबर नीट बोलतोय. तुम्हीपण थोडं शांतपणे काय झालंय सांगितलं तर बरं होईल.

स्वत:ला काय समजतो रे तू? त्या लताबाईंचा विनयभंग केलास की रे.. तू ये... तुझ्यावर बलात्काराचीच केस टाकतो.

विनयभंगाची तक्रार?

विनयभंगाची तक्रार आहे. अजून एफआयआर केली नाही तुझ्यावर.. तू नाही आलास तर सरळ नोटीस पाठवेन तुझ्या घरी. तू आपणहून येतोयस की मी येऊ तुला घेऊन जायला.

काय?? मी काही नाही केलंय पी.आय. साहेब. तुम्ही एफआयआर कसं काय दाखल करताय.

समोरून फोन बंद झाला. इकडे साहेबराव अस्वस्थ झाले. आपण काहीही केलं नाही. असले खोटे आरोप करून लताबाईला काय मिळतंय? ती अशी का वागते आहे?

साहेबराव बावन्न वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगी, एक मुलगा आणि आई असे सर्वजण होते. लताबाई साहेबरावांच्या ऑफीसमध्ये क्लार्क म्हणून काम करत होती. एक वर्षापूर्वी तिला साहेबरावांनी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर खरंतर तिचा आणि साहेबरावांचा काहीच संबंध नव्हता. साहेबराव त्यांचा गाव आणि परिसर येथील नामांकित व्यावसायिक होते. सगळं गाव त्यांना ओळखत होतं.

एफआयआर म्हणजे उद्या दैनिकात ठळक बातमी येईल या भीतीनेच ते अर्धमेले झाले होते. काहीच वेळात पोलीस स्टेशनला हजरही झाले. पोलीस केस, न्यायालयीन भानगडी या विचारानेच घाबरून गेले होते. त्याशिवाय बदनामी होईल ती वेगळीच. त्यांना सगळ्यात जास्त भीती बदनामीच्या प्रसिद्धीची होती. लोक काय काय बोलतील. मी काहीही केलं नाही याचं स्पष्टीकरण कुणाकुणाला द्यावं लागेल आणि का देत बसायचं. घरातले तरी समजून घेतील की नाही, या शंकेने तर साहेबरावांना दरदरून घामच फुटला.

लताबाईंच्या खोट्या वागण्याने साहेबरावांच्या मनात राग, भीती या भावनांचा अतिरेक झाला होता. शिवाय लताबाईंच्या वागण्याचं प्रचंड आश्चर्य वाटत होतं. बातमी पसरू नये म्हणून साहेबरावांची सुरू झाली. प्रचंड धडपडीनंतर लताबाईना केस मागे घेण्यासाठी बरीच रक्कम द्यावी लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या. कोणताही गाजावाजा झाला नाही. साहेबराव, लताबाई, पोलीस स्टेशनचे पी.आय. यांच्यातच ही गोष्ट राहिली.

मी कोणावरही अतिप्रसंग केला नाही. मी पत्नीलाही विचारून तिच्या संमतीने जवळ जाणारा माणूस आहे. मी नाही असा वागलोय. तरी कोण ही बाई? हिचं का ऐकत आहेत सगळे? ही काय परिस्थिती ओढवली माझ्यावर? अशा विचाराने हैराण झालेल्या साहेबरावांना अतिप्रसंगाच्या आरोपाने प्रचंड मानसिक थकवा आला होता.

अशा कितीतरी साहेबरावांसारख्या व्यक्ती सामाजिक बदनामीच्या भीतीचा बागुलबुवा बाळगतात. चूक नसताना अनेक गोष्टी मान्य करतात. त्यांना प्रचंड मानसिक दडपण येतं. बदनामीच्या भीतीने स्त्रित्वाचा न केलेला अपमान मान्य करावा लागणे म्हणजे एकप्रकारचा अन्याय सहन करणेच आहे. अशा परिस्थितीत समाजाला एकच प्रश्न पडतो तो म्हणजे एखादी बाई काही घडलं नसताना आपली बदनामी का करून घेईल? त्यामुळे पुरुषाचीच चूक असणार असं गृहीत धरलं जातं. पुरुषांचं काही चुकलेलं नसताना बऱ्याच वेळा अशा तऱ्हेने त्याच्यावर अतिप्रसंग ओढवतो. ज्याला शोषणा व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कारण सापडत नाही. त्यामुळे त्याचा सामाजिक दर्जा घसरण्याची भीती वाटत राहते.

सर्वसाधारणपणे अनैतिक लैंगिक संबंध, लैंगिक अत्याचार, मुलींची-महिलांची छेडछाड, अतिप्रसंग, बलात्कार असे मुद्दे हे बदनामीच्या घटनांमधील महत्त्वाचे असतात. भ्रष्टाचार, घरातल्या व्यक्तीची आत्महत्या, उशिरापर्यंत लग्न न झालेली मुलं-मुली अशा बाबी देखील काही वेळा बदनामीची भीती घालतात, मात्र सामाजिक बदनामीची भीती केवळ लैंगिक संबंधांवर आधारित घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात असते हेच खरं. अर्थात सर्वच घटनांमध्ये साहेबरावांसारखीच व्यक्ती असेल असं नाही. काही घटनांमध्ये दोघांच्या संमतीने संबंध असू शकतात आणि नंतर काही कारणाने वाद निर्माण झाल्यास एकमेकांना वेठीस धरलं जातं. काही घटनांमध्ये आंबटशौकीन असतात, जे उगीचच महिलांना मानसिक त्रास देत राहतात. आजकाल पुरुषही काही प्रमाणात का होईना मानसिक छळाचे बळी पडत आहेत. हनी ट्रॅपसारख्या सोशल मीडियावरील अत्याचारामुळे पुरुषांनी आत्महत्या केल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. ब्लॅकमेल करून पुरुषांना धमक्या देणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा समस्यांतून बाहेर पडणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. हळवा, थोडासा भित्रा, कुटुंबाला महत्त्व देणारा अशा व्यक्तिमत्त्वाचे पुरुष असतील तर ते कुटुंबाच्या काळजीने अस्वस्थ होतात. चूक नसताना कुटुंबाला समाजाने वेठीस धरले, तर कुटुंबाने पुरुषाला समजून घेतले नाही तर? अशा विचारांमुळे भीती वाढते.

सामाजिक बदनामीची भीती प्रत्येकाला असते. समाज म्हणजे तरी नक्की कोण आहे. कुटुंब, नातेवाईक, शेजारी, कामामधले सहकारी, मित्र, ओळखीचे, अनोळखी अशी सर्व माणसं जिथे एकत्र राहतात त्याला समाज म्हटलं, तर बदनामीची भीती नक्की कोणाकडून असेल? सामान्यतः सर्वसामान्य माणसाचा सामाजिक परिघ जास्तीत जास्त काही शे लोकांच्या बाहेर नसतो. प्रश्न समजून घेण्यासाठी ही संख्या शंभर आकड्यात मोजली तर त्यापैकी किमान ४०-५०% लोक आपल्याला ओळखत असतात आणि त्यांना आपल्याविषयी खात्री असते. किमान २०-३०% लोक गंमत बघणारेच असतात, त्यांना चांगलं असो किंवा वाईट, गॉसिप करायला आवडत असतं. उरलेले २०-३०% मात्र संबंधित असतात, मात्र आपल्याला नीट ओळखत नसतात. आता सामाजिक बदनामी ही संकल्पना या २०-३०% संबंधित पण अनोळखी लोकांशी संबंधित आहे का? याचं उत्तर नाही असंच आहे. सामाजिक बदनामी ही संकल्पना आहे, वास्तव नाही. म्हणजे शेजारी किंवा सहकारी काय म्हणतील हे वास्तव आहे, समाज काय म्हणेल ही संकल्पना आहे.

देव, राष्ट्र, धर्म या अशा काही संकल्पना माणसाने निर्माण केल्या. त्यामुळे एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती झाली. समाजनियमांच्या नैतिक चौकटीमुळे मूलभूत मूल्ये टिकून राहण्यासाठी मदत होते. सामान्यतः माणूस भावनिक मेंदूचा वापर जास्त करतो. आकड्यात विचार करायला त्याला फार आवडत नाही आणि बऱ्याचदा जमतसुद्धा नाही. समाज काय म्हणेल हा विचार करताना त्याच्या मनात भीती असते आणि एकदा भीती मनात बसली की, प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे आपण चुकीचे आहोत याच हेतूने बघते असं आपल्याला वाटत राहातं. प्रत्यक्षात जे वास्तव काही निवडक लोकांच्या संबंधित आहे, त्याला कल्पनेत आपण कैक पट अधिक वाढवतो आणि त्यातून सामाजिक बदनामीचा बागुलबुवा आपल्या मनात बसतो.

आपण काय करू शकतो?

१. आपली समाजव्यवस्था, मूल्यव्यवस्था यांच्या मर्यादेत राहूनच वर्तन करावे. आपण कोणतीही चूक केलेली नाही याची निदान स्वतःला १००% खात्री हवी.

२. कुटुंब आणि निवडक विश्वासू मित्र्ा-मैत्रिणी जवळ असावेत. चूक नसताना सामाजिक बदनामीच्या भीतीने अन्याय सहन करणे योग्य नाही.

३. न्यायव्यवस्था ही आपल्या सोयीसाठी आहे. त्यांची मदत घ्यावी.

४. समाजमनाने प्रश्न समजून न घेताच कुणाबद्दलही आपले मत बनवू नये.

५. कोणालाही गुन्हेगार समजू नये. त्यासाठी पोलीस आणि न्यायालय आहेत.

समाजामधील सर्व घटकांनी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तीबद्दल संवेदनशील राहावे. त्याला समजून घ्यावे, त्याला मानसिक आधार द्यावा. जेवढ्या प्रमाणात संवेदनशील माणसांची संख्या समाजात वाढेल तेवढ्या प्रमाणात सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे होणारे शोषण कमी व्हायला मदत होऊ शकेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in