तोंडपाटीलकी!

महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत पाटील हे भाजपमधील एक परिपक्व नेते आहेत
तोंडपाटीलकी!

महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत पाटील हे भाजपमधील एक परिपक्व नेते आहेत असा एक समज. पण चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यांनी तो समज खोटा ठरविला आहे. बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा हात नव्हता, असे वक्तव्य करून एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार निष्ठा असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेस दुखावलेच, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटास सत्तारूढ आघाडीवर प्रखर टीका करण्यास निमित्त मिळवून दिले! चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा तसे करणे जमत नसेल तर स्वतःच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बाबरी मशीद पडली तेव्हा ती कोणामुळे पडली याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नव्हते. त्यावेळी भाजपचे नेते सुंदरसिंह भंडारी यांनी, ते शिवसैनिकांचे काम असू शकते, असे मोघम वक्तव्य करून ही जबाबदारी झटकून टाकली होती. पण भंडारी यांच्या वक्तव्याचा धागा पकडून, शिवसैनिकांनी बाबरी पडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य करून स्वतःला आणि शिवसेनेला एका वेगळ्या उंचीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेऊन ठेवले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ख्याती झाली. त्या सर्व घटनांनंतर शरयू नदीतून बरेच पाणी वाहून गेले. भव्य राम मंदिराची उभारणीही सुरु झाली. तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येस भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. शरयू नदीची आरती केली.

अलीकडेच निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह अयोध्येस भेट दिली. रामल्लाचे दर्शन घेतले. त्यांनीही शरयू नदीची आरती केली. अशा सर्व घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना, ६ डिसेंबर १९९२ दरम्यानच्या घटनेबद्दल भाष्य करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे अशा सर्वाना दुखविण्याची आणि त्यांचा रोष ओढवून घेण्याची काहीएक आवश्यकता नव्हती! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, चंद्रकांत पाटील यांनी जी भूमिका मांडली ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही, हे स्पष्ट केले. राम जन्मभूमी आंदोलनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महत्वाची भूमिका होती, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत झालेल्या दंगलीच्या वेळी शिवसैनिकांनी मुंबई वाचविली, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान मुख्यमंत्री शिंदे कसा काय सहन करू शकतात, असा प्रश्न करून चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलले. त्यांच्या बोलण्याचा रोख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान , आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राम जन्मभूमी आंदोलनात प्रत्येक व्यक्ती हिंदू म्हणून सहभागी झाली होती. बाळासाहेबांचा अनादर होईल, असे आपल्या तोंडून कधीच काही निघणार नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले. शिंदे - फडणवीस यांचा कारभार सर्व विरोधांना तोंड देत चालला असताना मध्येच अशी तोंडपाटीलकी करण्याची चंद्रकांत पाटील यांना गरज होती का? कशासाठी असे वक्तव्य त्यांनी आताच का केले? आपल्या वक्तव्यामुळे आपल्याच पक्षाला आणि मित्र पक्षाला आपण अडचणीत आणत आहोत हे या नेत्याचा कसे काय लक्षात आले नाही? मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी स्वीकारले, अशी काही वादग्रस्त वक्तव्ये करून आपण परिपक्व नसल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. हे सर्व लक्षात घेता तोंडपाटीलकी करण्याची सवय सोडून देण्यातच त्यांचे आणि पक्षाचे हित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in