यात्रा खरेच कलाटणी देणार?

भारत जोडो’ यात्रेस प्रारंभ करण्याआधी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील गांधी मंडपात प्रार्थना सभा योजण्यात आली होती
यात्रा खरेच कलाटणी देणार?

काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेस बुधवारी कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला. यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील श्रीपेरुम्बुदूर येथील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकास भेट दिली आणि आपल्या दिवंगत पित्यास आदरांजली वाहिली. त्यावेळी बोलताना, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या पित्यास गमाविले; पण द्वेष आणि दुहीच्या राजकारणापायी माझा प्रिय देश मला गमवायचा नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेस प्रारंभ करण्याआधी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील गांधी मंडपात प्रार्थना सभा योजण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या हस्ते खादीचा राष्ट्रध्वज प्रदान करण्यात आला. त्या ठिकाणी आयोजित सभेस राहुल गांधी यांनी संबोधित करून या ‘भारत जोडो’ यात्रेस प्रारंभ झाला. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ३,५७० किलोमीटरचे अंतर या यात्रेद्वारे पायी कापले जाणार आहे. देशातील सर्वात जुन्या अशा काँग्रेस पक्षाने आयोजित केलेली ही ‘भारत जोडो’ यात्रा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल आणि या यात्रेमुळे एक नवीन सुरुवात होईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. देशातील सर्वसामान्य जनतेशी या यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी संपर्क साधणार आहेत. काँग्रेसने आयोजित केलेली ‘भारत जोडो’ यात्रा ही देशातील सर्वात मोठी अशी पदयात्रा आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. देशाच्या विविध भागातून जाणाऱ्या १५० दिवसांच्या या पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासमवेत १२५ अन्य नेते आणि कार्यकर्ते असणार आहेत. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधी आणि त्यांच्यासमवेत असणाऱ्या सर्वांची विविध सोयींनी युक्त अशा सुमारे ६० कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने आम्ही एका सकारात्मक राजकारणास आरंभ करीत आहोत, महागाई, बेकारी आणि सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा अन्य मुद्द्यांवर जनता संघटित होईल, असा विश्वास काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा म्हणजे ‘मन की बात’ नाही. जनतेचे प्रश्न आणि मागण्या दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा या यात्रेचा हेतू आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. जनतेचा आवाज संघटित करण्याचा हेतू या यात्रेमागे असला तरी प्रत्यक्षात काँग्रेस पक्षामध्ये जी मरगळ आली आहे, ती दूर करून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षामधील अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत, पक्षातील ‘जी - २३’ गटाने पक्ष ज्या प्रकारे चालविला जात आहे, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व अवस्थेतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासमवेत रॉबर्ट वाड्रा यांचेही छायाचित्र असल्यावरून ही ‘भारत जोडो’ यात्रा नसून ‘परिवार जोडो’ आणि ‘भ्रष्टाचार जोडो’ यात्रा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. काँग्रेस पक्षावर गांधी परिवाराचे नियंत्रण राहण्यासाठी आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठीचा हा आणखी एक प्रयत्न असल्याची टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. आपल्या पक्षाला एकसंध ठेवू न शकलेले राहुल गांधी देश जोडायला निघाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी, भारत एकसंध करण्याची राहुल गांधी यांची इच्छा असल्यास त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेसाठी पाकिस्तानात जावे, असे म्हटले आहे. तर हिमंत बिस्व सर्मा यांच्यासारख्या संधीसाधू व्यक्तीचे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. तर ‘काँग्रेस छोडो’ चळवळीला रोखण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली असल्याची टीका ‘आप’ने केली आहे. तर काँग्रेसचे नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपची रथयात्रा सत्तेसाठी होती, तर काँग्रेसची भारत जोडो यात्रा सत्यासाठी असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या यात्रेसंदर्भात अशी उलटसुलट चर्चा होत असताना या यात्रेचा प्रारंभ झाला आहे. आगामी काळात काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका, २०२४ साली होणारी लोकसभा निवडणूक या गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, हे सांगायला नको! तसेच राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रस्थापित करणे हाही या यात्रेमागचा अंतस्थ हेतू आहे, हे सांगण्याची आवश्यकता आहे काय?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in