भाजपची यशस्वी खेळी

महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे कार्यकर्ते संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते
भाजपची यशस्वी खेळी

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यात महाविकास आघाडीला तीन; तर भारतीय जनता पक्षाला तीन जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे कार्यकर्ते संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. छत्रपती संभाजीराजे यांची अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. शिवसेनेसह मविआतील घटक पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची इच्छा होती; पण छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरच त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसेनेने धरल्यामुळे आणि त्यास छत्रपतींनी नकार दिल्याने संजय पवार यांची वर्णी लागली. भाजपने तिसरा उमेदवार उभा करून ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला; पण भाजपने तीन उमेदवार रिंगणात उतरवून आणि तिघांनाही विजयी करण्याच्या निर्धाराने सर्व व्यूहरचना तयार केली. ज्या अपक्ष आमदारांच्या बळावर आमचे चारही उमेदवार विजयी होतील, अशी खात्री महाराष्ट्र विकास आघाडीला वाटत होती त्यातील काहींनी भाजप उमेदवारांना मतदान करून मविआ सरकारबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे तिघे विजयी झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीपूर्वी जे बोलले होते ते त्यांनी ‘करून दाखविले!’ या निवडणुकीसाठी जी व्यूहरचना आणि डावपेच देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वाखाली भाजपने आखले होते ते पूर्णपणे यशस्वी झाले! या निवडणुकीचे मतदान होण्याआधी आमची आघाडी चारही जागा जिंकेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता; पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. या निवडणुकीत ‘चमत्कार’ झाला हे मान्य करावे लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात फडणवीस यांना यश आले, अशी कबुलीही शरद पवार यांनी दिली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील कोणाचीही मते फुटली नसल्याचे आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. कोणाला मतदान केले हे पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवून मतदान करायचे असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या सूचनेनुसार मतदान केले; पण मविआ सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या काही अपक्ष आमदारांनी मात्र आपली मते भाजपच्या पारड्यात टाकली. त्या मतांमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला जे अपेक्षित नव्हते, असे अघटित भाजपच्या या विजयामुळे घडले! निवडणूक निकालानंतर, या निकालाचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत ज्या आमदारांनी दगाबाजी केली, त्याची यादी राज्य सरकारकडे असल्याचे जाहीरपणे सांगण्यासही ते विसरले नाहीत! या इशाऱ्याद्वारे संजय राऊत यांना काय सूचित करावयाचे, ते त्यांनाच माहीत! या निवडणुकीची मतदान पद्धती वेगळी आणि किचकट असल्याने त्याचा नीट अभ्यास करून जो पक्ष व्यूहरचना करतो, त्या पक्षास यश मिळते. या निवडणुकीतही ते दिसून आले. महाविकास आघाडीच्या अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांसह अन्य नेत्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली असतानाही भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी जी नीती वापरली, त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले आणि भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. या निवडणुकीत दगाबाजी झाली, घोडेबाजार झाला, असे आरोप करण्यात आले. भाजपकडून रडीचा डाव खेळून मतदानाच्या वेळी आक्षेप घेण्यात आल्याचे आरोप करण्यात आले. पराभव दिसत असल्याने भाजप असे आक्षेप घेत असल्याचे आरोप करण्यात आले; पण या निवडणुकीत भाजपची रणनीती यशस्वी झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीच्या नंतर येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. त्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान होणार असल्याने मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. सहावे उमेदवार सदाभाऊ खोत भाजपसमर्थित उमेदवार आहेत. आमचे सहाही उमेदवार विजयी होणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीला अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे. आपले सर्व उमेदवार विजयी होतील, हे पाहण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीपुढे आहे!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in