
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भुजबळ यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मराठा समाजा विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात भुजबळ यांना धमकावण्यात आलं. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी धमक्यांना घाबरत नाही. समाजासाठी मेलो तर आनंदचं आहे. अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.
जीवे मारण्याच्या धमीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, मला धमकीचे फोन येत आहेत. एकदा नाहीतर अनेकदा येत आहेत. तुझी वाट लावू, जीवंत राहणार नाही, असं म्हणत शिव्या देत आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. पोलिसांकडे तक्रार केली आहे पोलिस काय ते बघतील, असंही भुजबळ म्हणाले.
शिवसेनेच्या जन्मापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी मुद्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं असं सांगून शिव्या देतात. मला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने मोठं केलं. मला मराठा समाजाची मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलं. माझं देखील काहीतरी योगदान आहे म्हणूनच मला संधी दिली असेल असं ते म्हणाले
छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, मी एका जातीचं प्रतिनिधीत्व करत नाही. मी ओबीसींसाठी काम करत आहे. जानकर यांनी मला समर्थन दिलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. ओबीसी बचाव हे एकच आमचं ध्येय आहे. राज्यात ५४ टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी आहेत. मराठा समाजाला वेगळे आणि टिकणारं आरक्षण द्या. मी मनोज जरांगे पाटील यांचं काय खाल्ल आहे हे त्यांनी सांगाव आणि आता जरांगे पाटील कुणाचं काय खातोय हे त्यांनी सांगावं म्हणत समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच असं देखील छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलं.