इम्प्तियाज जलील आज ठाकरेंना भेटणार

इम्प्तियाज जलील आज ठाकरेंना भेटणार

एमआयएमकडून आलेला युतीचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावल्यानंतरही एमआयएमने युतीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे रविवारी जाहीर केले. जलील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस समोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला. एमआयएमच्या अनपेक्षित प्रस्तावाने आघाडीत खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने युतीच्या प्रस्तावावर संयमी भूमिका मांडली.

मेलो तरी एमआयएमसोबत जाणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून भाजपचा सुरू असलेला छुपा प्रचार, ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीला दिलेली युतीची ऑफर या माध्यमातून शिवसेनेला मुस्लिमधार्जिणे ठरविण्याचा भाजपचा डाव आहे; मात्र औरंगजेबाच्या थडग्यावर माथी टेकणाऱ्या एमआयएमसोबत मेलो तरी जाणार नाही, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ मंगळवारपासून सुरू होत आहे. या अभियानाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना खासदार तसेच संपर्कप्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा तिथे भाजपने पाठिंबा दिलेल्या पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचेच सरकार होते; मात्र तेव्हा ब्र काढण्याची हिंमत नव्हती. तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काश्मिरी पंडितांसाठी उभा राहिले होते, हा इतिहास आहे. राजकारणासाठी हिंदुत्वाचा बुरखा पांघरणारे नवहिंदू हे हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायांचा आणि शिवसेनेचा भगवा बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिजाब पांघरलेल्या या नवहिंदूंना राजकारणातून नेस्तनाबूत करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसैनिकांना दिले.

औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्या ‘एमआयएम’सोबत मेलो तरी जाणार नाही, असे ठणकावून सांगताना भाजपचे हे डाव ‘शिवसंपर्क अभियाना’च्या माध्यमातून जनतेसमोर पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसैनिकांना केले. ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेना मुस्लिमधार्जिणी झाली आहे, असा गैरसमज पसरवण्याचा भाजपचा डाव आहे. शिवसेनेला जनाब म्हणायला त्यांनी सुरुवात केली आहे. आपल्याला ते हिंदूविरोधी ठरवू पाहताहेत. एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की, ज्यामुळे सगळे संमोहित होतील आणि वस्तुस्थिती विसरून जातील. आधी ‘इस्लाम खतरे में है’ अशी बांग दिली जायची, आता ‘हिंदुत्व खतरे में है,’ अशी एक नवीन बांग भाजपने द्यायला सुरुवात केली आहे. अशा वेळी सत्य काय आहे, हे गावोगावी आणि घरोघरी जाऊन आपल्याला सांगायला हवे. भाजपचे स्वप्न आहे, पंचायत ते पार्लमेंट, म्हणजे त्यांना कोणी दुसरा आपल्याशिवाय सत्तेत असताच कामा नये. या त्यांच्या धोरणाला आपल्याला काटशह द्यायचा आहे. कारण हा अट्टाहास पुढच्या घातक हुकूमशाहीची नांदी आहे.

शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करत आली आहे; पण हे राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करीत आहेत, हा आपल्या आणि त्यांच्या हिंदुत्वाचा फरक आहे. मी अयोध्येला गेलो होतो, तेव्हा मी ठामपणे सांगितले होते, तेच माझे मत आजही ठाम आहे. आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत. आम्ही भाजपला सोडलेय, हिंदुत्व आणि हिंदुत्वापासून वेगळे झालेलो नाही. हिंदुत्व आम्ही कदापि सोडू शकत नाही. सत्ता असो वा नसो, आम्ही हिंदुत्व एका तळमळीने अंगीकारले आहे आणि त्या तळमळीने आम्ही पुढे जात आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

समोरचा विरोधक आहे. त्याच्या ज्या कुरापती चालू आहेत, जी स्ट्रटेजी आहे, ती ओळखा. स्वतः काय केले, ते सांगता येत नसल्याने दुसरा कसा देशद्रोही, वाईट आहे आणि आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र झालो आहोत, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येक वेळी एक अनामिक भीती दाखवायची. असले प्रकार सुरु आहेत. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात घडलेल्या घटना जनतेला विसरायला भाग पाडायचे. कोरोनाकाळात ७० बालकांचा ऑक्सिजनशिवाय झालेला मृत्यू, गंगेत सोडलेले मृतदेह, उन्नाव, हाथरस येथे शेतकऱ्यांना चिरडणे, शेतकरी आंदोलनातील मृत्यु हे सारे वाहून गेले आणि आता पुन्हा इतिहासाच्या खपल्या काढल्या जाताहेत. हा त्यांचा डाव उधळून लावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई बँक किंवा इतर बाबतीत यांचे नुसते जबाब घेतले तरी यांची तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच अन्याय झाला, लोकशाहीचा खून झाला, असे बोलायला सुरुवात करतात. दुसऱ्याने खाल्ले तर शेण आणि यांनी खाल्ले तर श्रीखंड हा जो प्रकार आहे, तो लोकांसमोर यायला हवा.

विधानसभेत गोंधळ घातला म्हणून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मग हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला अशी ओरड केली. यात थोडे बारकावे समजून घ्या. सुप्रीम कोर्टाने आपला अधिकार अमान्य केलेला नाही. त्यांना दिलेली शिक्षा रद्द केलेली नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर केलेली कारवाई मान्य केली आहे, पण शिक्षेचा कालावधी कमी करायला सांगितला. आपण कोणतेही खोटे काम केलेले नाही. या सर्व गोष्टी लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत आदेशाची अंमलबजावणी टाळणे हा अनादर नाही का, अशा शब्दांत राज्यपालांवर उच्च न्यायालयाने अप्रत्यक्ष ताशेरे मारलेले आहेत. विधान परिषदेचे १२ सदस्य निवडणे हा मंत्रिमंडळाचा अधिकार असतो. नावे सुचवायची आणि ती राज्यपालांनी त्याची नियुक्ती करायची, पण वर्ष-दीड वर्ष होऊन गेले अजूनही त्याचा पत्ता नाही. लोकशाहीचा खून आम्ही करतो म्हणता, राज्यपाल जे करताहेत हा लोकशाहीचा खून नाही का? असा सवाल करीत जनतेचा आवाज विधिमंडळात मांडणाऱया १२ आमदारांच्या नियुक्त्या न करणे हा जनतेचा आवाज दाबण्यासारखे नाही का, असा परखड सवाल ठाकरे यांनी केला.

चौकट-

मग तुम्हाला हिजबूल जनता पक्ष म्हणायचे का?

आम्ही भाजपसारखे सत्तेसाठी लाचार नाही. अफझल गुरूला फाशी देऊ नका असे सांगणाऱया मेहबुबा मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून जी काही सत्तेसाठी मांडीघाशी केलीत तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापिही येऊ देणार नाही. जनाब शिवसेना म्हणत असाल तर मेहबुबा मुफ्तीसोबत जाणाऱ्या तुम्हाला हिजबूल जनता पक्ष म्हणायचा का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in