
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन चांगलचं नाट्य पहायला मिळत आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी पक्षाची मराठा पक्ष ही इमेज पुसण्यासाठी ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, शरद पवार यांनी या गोष्टी कळतात, असं विधान भुजबळ यांनी केलं आहे. अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यपदाची मागणी केल्याने या पदावरुन कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. आज सकाळी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या विषयावर आपलं मत मांडलं आहे.
या विषयावर बोलताना भुजबळ म्हणाले की, सर्वच पक्षात ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला संधी मिळाली आहे. ममता बॅनर्जी आणि बाकी लोक त्यांच्या बळावर काम करत आहेत. राजकारणात वेगळ्या दमाचे लोक आहेत. मुंडे, तटकरे, आव्हाड, यांचं मी नाव घेतलं आहे. भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहीजे. पक्षाची मराठी पक्ष ही प्रतिमा पुसली जावी, यासाठी ओबीसी नेत्यांना संधी देण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे. तसंच शरद पवार यांना या गोष्टी कळत असल्याचं ही भुजबळ म्हणाले आहेत.
या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, पक्षाची पदे वेगवेगळ्या समाजात वाटली पाहिजे. साधरण ९१ सालापासून मी शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी फक्त मराठा लोकांची पार्टी नाही मात्र, लोकांमध्ये तसा समज आहे. तो पुसला जावा यासाठी ओबीसी नेत्यांना पक्षात संधी दिली जावी. अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर देखील भाष्य केलं आहे. सर्वच विरोधक एकत्र आल्यानं राज्यावरील संकट बदलू शकतं, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. तसंच त्यांना शुभेच्छा देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.