
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवणुका चालू आहेत. यावर्षी आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार काँग्रेसने घेतला आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि याचा फायदा काँग्रेस पक्षाला कर्नाटक निवडणुकीत मिळाल्याचा दिसून आला आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. यापूर्वी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 13 नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा 2.0 या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू करू शकतात आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत म्हणजे, तब्बल तीन महिने ही यात्रा सुरू राहील. हा प्रवास मागील प्रवासापेक्षा वेगळा असेल, असंही बोललं जातं आहे. मागच्या वेळी राहुल गांधींनी संपूर्ण प्रवास पायी केला होता, तर यावेळी कुठे पायी आणि कुठे गाडीनं प्रवास पूर्ण करणार आहेत. याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.