
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असलेले नेते आणि वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या गटात असलेले राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधान आलं आहे.
आमदार रोहित पवार 'साहेबांचा संदेश' या कार्यक्रमाअंतर्गत राज्यव्यापी दौरा करत आहेत. आज कोल्हापूरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हसन मुश्रीफ यांना १९९८ मध्ये संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण सर्वांचा विरोध डावलून शरद पवार यांनी मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता मुश्रीफ यांचे नातेवाईक एमआयडीसीमध्ये अडचणी निर्माण करत आहेत, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, रोहित पवार नवखे आहेत. त्यांना तिकडे अजित पवारांची जागा घ्यायची आहे. ते कशासाठी एवढं धाडसं करत आहेत. आधी कोल्हापूरात सहा आमदार होते. आता कमी झाले आहेत. पुण्यात देखील अशीच परिस्थिती आहे. जागा नसल्याने ते असे बारीक आरोप करतात. त्यांनी मला १९९८ मध्ये कोणाचा विरोध होता हे जाहीरपणे सांगावं. मंडलीक साहेब तर माझ्याच सोबत होते, असं मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादीत फुट पडल्यापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. पवार यांनी सुरुवातील नाशिक मधील येवला, त्यानंतर बीड आणि उद्या कोल्हापूरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले की, पवार साहेबांना एवढ्या छोट्या मैदान आणायला नको होतं. त्या मैदानात पाच हजार लोक बसू शकतील. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी याचं आमच्या सुभेच्छा, असं मुश्रीफ म्हणाले.