
पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या वन-डे मालिकेतील पहिल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने इंडिजवर तीन धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताने दिलेले ३०९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर आलेल्या यजमानांची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शाय होप सात धावा करून बाद झाला. त्यानंतर कायले मायर्स आणि शमराह ब्रूक्स यांनी दमदार खेळ करत डावाला आकार दिला. मायर्सने ७५ आणि ब्रूक्सने ४६ धावा केल्या. त्यापाठोपाठ ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. शेवटी अकील हुसेन आणि रोमरिओ शेफर्ड जोडी भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटच्या षट्कात वेस्ट इंडिजला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती; मात्र विंडीजचा संघ केवळ ११ धावाच करू शकला.
त्याआधी, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि शिखर धवनने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गिल ६४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली.
श्रेयस अय्यरने ५४ धावांचे योगदान दिले. कर्णधार शिखर धवनचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने ९९ चेंडूत ९७ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्याने त्याने १० चौकार आणि तीन षट्कार लगावले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार अवघ्या १३ धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक संजू सॅमसनने १३ तर दीपक हुडाने ३२ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजच्या वतीने अल्जारी जोसेफ आणि गुडाकेश मोतीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.