स्वप्नातील चांदवा

आशिया कप पटकाविला तर आशियाई देशात एक नंबर झाल्याचा पटका डोईवर चढेल
स्वप्नातील चांदवा

आॅस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्याआधी यूएईमध्ये येत्या २७ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा सुरू होत आहे. दोन्ही स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी आता फारच थोडा अवधी उरला आहे. ‘समय तू धीरे धीरे चल, सारी दुनिया छोड के पीछे आगे जाऊँ निकल, मैं तो आगे जाऊँ निकल...’ असे गाण्यातून विणवण्यानेही वेळ काही थांबणार नाही. जगाला मागे टाकायचे तर उरलेल्या वेळेत कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. ‘स्वप्नातील चांदवा’ अर्थात ‘वर्ल्डकप’ लाभण्यासाठी आता सातत्य आणि वर्चस्व या गुणांनाच अथकपणे पैलू पाडावे लागतील.

आशिया कप पटकाविला तर आशियाई देशात एक नंबर झाल्याचा पटका डोईवर चढेल; पण टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकला तर भारताच्या शिरी जगात नंबर वन झाल्याचा मुकुट झळकेल. तेव्हा जगात नंबर वन ठरण्याच्या दृष्टीनेच पूर्वतयारी भारताने करायला हवी. म्हणूनच आशिया चषक स्पर्धेकडे टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणूनच पाहायला हवे आणि त्या अनुषंगाने धोरण आखायला हवे.

जगात नंबर वन व्हायचे असेल तर आता प्रयोगशीलतेचा हव्यास टाळला पाहिजे. आशिया कपचाच संघ विश्वचषकात खेळेल, अशी अंतिम ११ जणांची निवड केली पाहिजे. असे केल्याने संघात एकवाक्यता निर्माण होऊ शकेल. फलंदाजांचे क्रमांक निश्चित होऊन कोणता फलंदाज बाद झाल्यावर खेळायला जायचे, याबाबत पुढील फलंदाज मानसिकदृष्ट्या तयार आणि खंबीर राहतील. प्रयोग केल्यास ते प्रयोग यशस्वी होतीलच, असे नाही. शिवाय, ‘मेरा नंबर कब आयेगा’ ही प्रतीक्षा जांभया देत बसून खेळपट्टीवर गेल्यावर भोपळाही फोडता न येण्याच्या अवस्थेलाही आयते निमंत्रण देणारी ठरू शकेल, कदाचित.

संघात फारसे बदलही करता कामा नयेत. अंतिम ११ खेळाडूंमध्ये आपण असणारच याची खात्री प्रत्येक खेळाडूला वाटेल, अशीच तगडी संघनिवड आधीपासूनच असायला हवी. यामुळे प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी कळेल. गोलंदाजांना मनात आडाखे बांधता येतील.

क्षेत्ररक्षणाच्या जागा आधीच निश्चित केल्यास झेल कसा आणि कोणत्या दिशेने येऊ शकेल, याचे अनुमान क्षेत्ररक्षकाला काढता येऊ शकेल आणि तसा सरावही करता येऊ शकेल. कोणी काय करायचे, ते प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन यांना एकदाच ठरविता येईल. प्रयोगशीलतेच्या धरसोड धोरणांमुळे साराच पट विस्कळीत होण्याचा धोका आहे. तेव्हा प्रयोग करण्यास पुढे जाण्यापूर्वी ‘जपून जपून जा रे... पुढे धोका आहे...’ हे ध्यानात ठेवायलाच हवे. ‘ट्रायल अॅण्ड एरर्स’ची वेळ आता निघून गेली आहे, निश्चितच.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी वाहणार असले, तरी सुदैवाने आशिया चषक स्पर्धेसाठी राहुल द्रविड हे उपलब्ध असणार आहेत. विश्वचषक स्पर्धेसाठी तेच प्रशिक्षक असतील, असे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रशिक्षकाची कार्यशैली ही भिन्न असते. डावपेच निरनिराळे असतात. त्यामुळे धोरणात सुसूत्रता राखण्याच्या दृष्टीने दोन्ही मोठ्या स्पर्धांसाठी एकच प्रशिक्षक असणे संयुक्तिक ठरेल.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी प्रशिक्षक बदलण्याची गरज रास्त होती; पण शिखर धवनकडून कर्णधारपद काढून ते लोकेश राहुलकडे देण्याचा निर्णय मात्र अनाकलनीय वाटतो. शिखरची नेतृत्व करण्याची पूर्ण मानसिक तयारी झाली होती. अशा परिस्थितीत अपेक्षाभंग किंवा हिरमोड हा खेळाडूच्या कार्यक्षमतेवर विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम घडवून आणण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच नुकताच दुखण्यातून उठलेल्या लोकेश राहुलच्या डोक्यावर अतिरिक्त भार देणेही व्यवहार्य वाटत नाही. त्याच्या डोक्यावर फार ताण पडू न देता त्याला खेळवायला पाहिजे होते. शिखरने तीन सामन्यापुरते नेतृत्व केल्याने असे काय बिघडणार होते? किंवा राहुलने नेतृत्व केल्याने कोणते फार मोठे स्थित्यंतर घडणार आहे? शेवटी, आशिया चषक स्पर्धेत आणि नंतरच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच नेतृत्त्व करणार आहे ना!

झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिखर धवनने त्याच्या फेसबुक स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला, त्यामध्ये तो विमानतळावर झोपलेला दिसत होता. आता बोला! हा फोटोही या संदर्भात ‘बोलका’च म्हणावा लागेल, खरोखरच.

तेव्हा स्थिती ‘जैसे थे ’ ठेवण्यावर संघ व्यवस्थापन आणि संबंधित अधिकारी गण यांनी कटाक्षाने भर द्यावा, असे सुचवावेसे वाटते. खूपच निकड असेल, तरच संघात बदल करावेत. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे...’ या गाण्याप्रमाणे संघाची घडीसुद्धा विस्कटू न देता सातत्य राखत टिकवून ठेवली पाहिजे. या घडीला केलेले बदल, प्रयोग यामुळे जर घडी विस्कटली, तर ती पुन्हा ठिकठाक करण्यास आता बिलकूल वेळ नाही, याचे भान संबंधितांनी ठेवणे जरुरीचे आहे. संघाची घडी प्रत्येक सामन्यात टिकली गेली तरच ‘स्वप्नातील चांदवा’ अर्थात ‘वर्ल्डकप’ लाभू शकतो, खचितच.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in