बुमराहला विश्रांती दिल्याने तर्क-वितर्क सुरु

दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळू न शकलेल्या हर्षल पटेलने पुनरागमन केले; मात्र बुमराहने पुनरागमन केले नाही.
बुमराहला विश्रांती दिल्याने तर्क-वितर्क सुरु

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात मंगळवारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला खेळविण्यात आले नसल्याने त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. बुमराहला विश्रांती दिल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितल्याने तो अजूनही बरा झालेला नाही का? विश्वचषकासाठी त्याला संघात घेण्यासाठी निवडकर्त्यांचा आटापिटा सुरू आहे का? अशा चर्चाचे पेव फुटले आहे. दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळू न शकलेल्या हर्षल पटेलने पुनरागमन केले; मात्र बुमराहने पुनरागमन केले नाही.

दुखापतीमुळे बुमराह आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला नव्हता. त्याची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवली. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या वेळी नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, बुमराहला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो दुसरा आणि तिसरा सामना खेळू शकेल अशी आशा आहे.

“टी-२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीने महत्त्वाचा गोलंदाज बुमराहच्या पुनरागमनाबाबत घाई होत आहे का, असा प्रश्न सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारला असता रोहित म्हणाला की, ‘‘तो पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला फक्त या एकाच सामन्यासाठी विश्रांती दिली होती.”

भारताने ऋषभ पंतचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नसल्याबाबत विचारले असता, रोहित म्हणाला की, “आम्ही खेळाच्या दिवसाची परिस्थिती विचारात घेऊन संघनिवड करतो.”

भारताने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावा केल्या होत्या. के एल राहुलने ५५ आणि सूर्यकुमार यादवने ४६ धावांचे योगदान दिले होते. अखेरीस हार्दिक पंड्याने जोरदार फटकेबाजी करीत अवघ्या ३० चेंडूंत ७१ धावा फटकाविल्या. या धावांचा पाठलाग करताना कॅमेरून ग्रीनने ६१ धावांची झंझावाती खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मॅथ्यू वेडने नाबाद ४६ धावा केल्या. दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in