
ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १०० धावांनी जिंकून इंग्लंडने भारतावर अक्षरशः नव्हे; तर शब्दशः ‘शंभर नंबरी’ विजय मिळविला. या विजयामुळे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आली. त्यामुळे आता रविवारी उभय संघात होणारा अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.
लॉर्ड्सवर इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात मिळविलेला विजय हा अतिशय नियोजनबद्ध व्यूहरचनेचा एक आदर्श नमुनाच म्हणावा लागेल. मालिकेतील आपले आव्हान शाबूत राखण्यासाठी इंग्लंडला या दुसऱ्या सामन्यात विजय मिळविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ओव्हल येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा तब्बल १० विकेट्स राखून पराभव केला होता ना!
खेळात किंवा युद्धात प्रतिस्पर्ध्याला एकतर थेट आक्रमण किंवा चढाई करून; नाहीतर गाफील ठेवून नामोहरम करायचे असते. इंग्लंडने यापैकी दुसरा पर्याय निवडला असावा. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा संघ अवघ्या ११० धावांत गारद केला होता. त्यामुळे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली, हे ढळढळीतपणे स्पष्ट होत होते; परंतु इंग्लंडने हा विचार केला नसावा. त्यांचे अनेक फलंदाज फॉर्मात होते आणि ते कधीही मुसंडी मारू शकतात, याची पूर्ण जाणीव इंग्लंडला होती. म्हणूनच ढेपाळलेल्या फलंदाजीची चिंता करण्याऐवजी इंग्लंडने १११ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या भारताचा एकही फलंदाज बाद का करता आला नाही, याचा विचार अधिक खोलवर केला असावा. त्यामुळेच त्यांनी फलंदाजीपेक्षा गोलंदाजीची धार अधिक प्रखर करण्याची व्यूहरचना ठरविली असावी. सामन्यातील खेळाडूंची देहबोली आणि आवेश यातून हेच जाणवत होते. अगदी त्यांनी फलंदाजांचे लक्ष्य विचलित करण्यासाठी टोमणेबाजी अर्थात स्लेजिंगच्या अस्त्राचाही अवलंब केला आणि विराट कोहलीला बकरा बनविले. निराशाजनक फॉर्ममधून जात असलेल्या कोहलीला अस्तित्वासाठी मोठी खेळी खेळावी लागणार असल्याचे भान ठेवून त्यांनी कोहलीला जाणीवपूर्वक लक्ष्य केले. गोलंदाज डेव्हिड विली हा सतत कोहलीशी बडबड करताना दिसत होता. अखेर कोहलीचे लक्ष विचलित झाले आणि तो विलीची शिकार बनला. हे सारे काही अचानक मैदानावर घडून येत नाही. त्यासाठी नियोजनच लागते.
पहिल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सलामीवीर नाबाद राहिल्याने अन्य भारतीय फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पहिल्या सामन्याच्या एक दिवसानंतर लगेच दुसरा सामना नियोजित असल्याने वॉर्मअपसाठीही अन्य फलंदाजांना अवधी नव्हता. त्यामुळे हे दोघे बाद होताच वॉर्मअप नसलेल्या इतर फलंदाजांवर दबाव आणण्यात इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव यांच्यासारखे दिग्गज नको त्या चेंडूला फटकविण्याच्या नादात आपली विकेट चक्क गिफ्ट देताना पाहावयास मिळाले. फलंदाजांनी सपशेल शरणागतीच पत्करली. स्वतःची फ्लॉप झालेली फलंदाजी भक्कम करण्यावर भर देण्याऐवजी भारतीय फलंदाजांनाच जाळ्यात पकडून विजयाच्या ‘मच्छी करी’वर ताव मारण्याची इंग्लंडची रणनीती कमालीची फलद्रूप ठरली. अर्थात, इंग्लंडने फलंदाजांनाही प्रत्येकाला किमान ३०-४० धावा करण्याचे लक्ष्य नेमून दिले असणार म्हणा. म्हणूनच, तर प्रमुख फलंदाजांनी किमान २० ते ४० च्या आसपास योगदान दिल्याचे दिसून आले. त्यामुळेच मग यजमान इंग्लंडला भारतापुढे विजयासाठी २४६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवता आले.
भारतीय संघ पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाल्याच्या आनंदात बेसावध राहिला. ‘प्रभावी’ गोलंदाजीलाच आपले भांडवल समजून बसला आणि फसला. इंग्लिश फलंदाजांना रोखल्याच्या धुंदीतच भारतीय संघ वावरला. पुरेसा सराव मिळाल्याचे भान न ठेवता प्रत्येक भारतीय फलंदाज मैदानात उतरून फाजील आत्मविश्वासाने फटकेबाजी करू लागला आणि इंग्लंडच्या चक्रव्यूहात अडकू लागला. ‘अभिमन्यू चक्रव्यूह में फस गया हैं तू...’ असेच प्रत्येक भारतीय फलंदाज बाद होत असताना वाटून गेले, खरोखरच.
सामनावीर रीस टॉपलीने चक्क टोपलीत फलंदाज गोळा करावेत, त्याप्रमाणे मारा करून सहा फलंदाज टिपले. टॉपलीने सहा मासे टोपलीत पकडल्यानेच खरे तर यजमानांची विजयाची खमंग ‘मच्छी करी’ छानपैकी शिजली. पहिल्या डावात इंग्लंडचे चार फलंदाज शून्यावर बाद करून टीम इंडियाने केलेल्या ‘अंडा करी’चा वचपा टॉपलीने हा असा काढला. विजयासाठी २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरुवातच मुळी निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा तब्बल १० चेंडू खेळून भोपळाही न फोडता बाद झाला. त्यापाठोपाठ शिखर धवन, ऋषभ पंत झटपट बाद झाले. कोहलीकडून मोठ्या अपेक्षा असतानाच तो १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने २७ धावा करून ‘छोटीशी आशा’ पल्लवित केलेली असताना त्याने एक विलक्षण फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेटवर चेंडू ओढवून घेतला आणि तो त्रिफळाचित झाला. त्यापाठोपाठ लगेच हार्दिक पंड्याही परतला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी विजयासाठी धडपड केली; मात्र त्यांची झुंज भारताला विजयापर्यंत पोहोचविण्यात तोकडी पडली. गोलंदाजी कुचकामी तर ठरलीच; पण फलंदाजीनेही आपटी खाल्ली.
आता शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात गाफील राहून चालणार नाही. खेळपट्टीचा रागरंग अचूक ओळखावा लागेल. वाऱ्याची दिशा पाहूनच ऑफ स्टंपशी संबंधित चेंडूकडे पाठ फिरविण्याबाबतचा किंवा योग्य ते पदलालित्य राखत चेंडूला सामोरे जाण्याबाबतचा निर्णय फलंदाजांना अचूक टायमिंग साधत घ्यावा लागेल. गोलंदाजांना खेळपट्टीचे खाचखळगे पाहूनच ‘चाल’ करावी लागेल. चेंडूच्या टप्प्याचे भान फलंदाजांना काटेकोरपणे ठेवावे लागेल. चुकांची पुनरावृत्ती टाळणारी रणनीती संघ व्यवस्थापनाला आखावी लागेल. दुसऱ्या सामन्यात महत्त्वाचे झेल सुटले होते, याची जाणीव ठेवत तिसऱ्या सामन्यात केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही सुधारणा करावी लागेल. मालिका जिंकण्यासाठी ‘बच के रहना रे बाबा, बच के रहना रे...’ एवढेच टीम इंडियाला सांगण्यापलीकडे तरी आपण दुसरे काय करू शकतो?