बच के रेहना रे बाबा...!

ऑक्टोबर रोजी होणारा सामना हा नेहमीप्रमाणेच शौकिनांना चातकाप्रमाणे वाट पाहायला लावत आहे,
बच के रेहना रे बाबा...!

संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेल्या टी - २० विश्वचषक स्पर्धेला आता जेमतेम काही दिवसच उरलेले असल्याने सरावासाठी फारच थोडा अवधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा होऊ घातली आहे. सहभागी होणाऱ्या देशांचे संघ जाहीर झाल्याने सर्वच संघ रणनीती आखण्यास आता गती देतील, अशी अपेक्षा आहे. काही देशांमध्ये उभयपक्षीय मालिका नियोजित असल्याने या देशांना या मालिकांचा सरावासाठी पुरेपूर वापर करून घेता येईल, साहजिकच.

टी - २० विश्वचषक स्पर्धा ही बहुप्रतिक्षित असली, तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी होणारा सामना हा नेहमीप्रमाणेच शौकिनांना चातकाप्रमाणे वाट पाहायला लावत आहे, खचितच. या सामन्याची सुद्धा आतापासूनच चर्चा होऊ लागली आहे. या सामन्याची सर्व तिकिटेही हातोहात संपली आहेत. तेव्हा अशा या बहुचर्चित होऊ घातलेल्या या सामन्याबाबत चर्चा करणे सयुक्तिक ठरेल.

मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियाला खूपच दक्ष राहावे लागणार आहे. जपून पावले टाकावी लागणार आहेत. कारण पाकिस्तान खास रणनीती आखूनच मैदानात उतरणार, हे स्पष्टच आहे. त्यातच पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे. शाहीन हे पाकिस्तानी गोलंदाजीच्या भात्यातील प्रभावी अस्त्र आहे. त्यामुळे त्याची निवड ही अटळ होतीच. शाहीनला दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेला मुकावे लागले होते. शाहीन उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्याला आपसूकच विश्रांती मिळाल्याने तो ताजातवाना झाला आहे. आता हा फ्रेश खेळाडू भारतीय फलंदाज दिसताच 'किलर्स इंस्टिंक्ट'ने नव्या जोशात मेलबर्नवर आग ओकणारी गोलंदाजी करेल, यात संदेह नाही. तेव्हा भल्याभल्या फलंदाजांना आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने कवायत केल्याप्रमाणे चक्क नाचायला भाग पाडणाऱ्या या गोलंदाजापासून सावध राहावे लागेल.

दुखापतीमुळे बाहेर असलेला मोहम्मद वसीम ज्युनियरचेही पुनरागमन झाले आहे; मात्र अनुभवी स्फोटक फलंदाज फखर झमानला राखीव ठेवण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेत झमानची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. त्याने हाँगकाँगविरुद्ध एकमेव अर्धशतक झळकाविले होते. झमानला डावलल्याने टीम इंडियासाठी सुंठीवाचून खोकला गेल्यासारखेच आहे, जणू.

या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा आधी झाल्यानंतर मग पाकिस्तानने कुठे आपला संघ जाहीर केला. म्हणजे इथपासूनच चालबाजीला सुरुवात झाली आहे, म्हणा ना! खेळाडूंच्या दुखापती, त्यांचा फिटनेस आणि संघातील राजकारण यामुळे संघ निवडीसाठी विलंब झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी भारतीय संघाचे योद्धे पाहून त्यांच्यावर कोणते अस्त्र प्रभावी ठरेल, याची खातरजमा करण्यासाठी पाकिस्तानने आधी भारतीय संघ जाहीर होण्याची वाट पाहिली असणार, असा तर्क काढण्यास मोठा वाव आहे. तेव्हा ही चालबाजी शेवटच्या चेडूपर्यंत राहील, याचे भान ठेवून टीम इंडियाने प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी मिळू न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. थोडीशी बेपर्वाईसुद्धा अनपेक्षित निकालाला कारणीभूत ठरू शकते, याचे भान राखले पाहिजे.

टी-२० विश्वचषकासाठी निवडलेला पाकिस्तानचा संघ हा आशिया कप संघापेक्षा काहीसा वेगळा वाटत असला, तरी पाकिस्ताननेही भारताप्रमाणेच काही अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंना कायम ठेवले आहे. टी - २० वर्ल्ड कपसाठी टीम पाकिस्तानमध्ये कर्णधार बाबर आझमसह शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद आणि उस्मान कादिर हे खेळाडू आहेत. फखर झमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी हे राखीव खेळाडू असल्याने गरज भासली, तरच मैदानात उतरतील.

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादिर याचा मुलगा उस्मान कादिर याचा टी-२० विश्वचषक स्पर्धसाठी पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे, हे विशेष. उस्मानच्या निवडीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. योगायोग असो की जाणूनबुजून असो. ज्या दिवशी टी - २० विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला, त्या दिवशी अब्दुल कादिर यांचा जन्मदिवस होता. अब्दुल कादिर यांचा जन्म १९५५ मध्ये झाला होता. दिवंगत अब्दुल कादिर यांच्या ६५ व्या जन्मदिनी त्यांचा मुलगा उस्मानची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात निवड जाहीर झाली.

पाकिस्तानसाठी उस्मानने १९ टी-२० सामन्यात २५ विकेट्स आणि एका एकदिवसीय सामन्यात एक बळी टिपला आहे. त्याचे टी २० मधील पदार्पण २०२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध म्हणजे त्याच्या वडिलांच्या निधनानंतर एक वर्षाने झाले. आशिया चषक स्पर्धेत उस्मान पाकिस्तान संघाचा भाग होता. टी - २० विश्वचषक २०२२ ही स्पर्धा उस्मानची पहिलीवहिली आयसीसी स्पर्धा असेल. 'मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा...' असे स्वप्न पाहणाऱ्या अब्दुल कादिर यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा आपल्या वडिलांना अनोखे अभिवादन करण्यास उस्मान उत्सुक असेल, हमखास.

तब्बल ३६८ आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या लेगस्पिनर अब्दुल कादिर यांच्या एकाच षटकात चार षटकार १९८९ मध्ये पेशावरमध्ये झालेल्या एका सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लगावले होते, याचीही आठवण उस्मानच्या निवडीमुळे होते, निश्चितच. अब्दुल कादिर यांच्या गोलंदाजीच्या शैलीशी त्यांचा मुलगा उस्मान याची शैली मिळतीजुळती असल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत पाकिस्तानी निवडकरत्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धसाठी उस्मानकडेही त्याच्या वडिलांप्रमाणेच काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आढळले असणार, हमखास.

एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न खेळलेला डावखुरा फलंदाज शान मसूदचा पाकिस्तानने संघात समावेश केला आहे. म्हणजेच झाकून ठेवलेला पत्ताच बाहेर काढला आहे, म्हणा ना! 'रख पॉकेट में घोडा, दे घोडे को लगाम ' असाच हा डाव म्हणायचा. मसूदने या वर्षी तशी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो अव्वल फळीतील फलंदाज आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना त्याच्या फलंदाजीमुळे दमदार साथ मिळणार आहे. तेव्हा भारतीय गोलंदाजापुढे जटिल आव्हान असणार आहे. तरीसुद्धा भारतीय गोलंदाजांना अत्यंत धोकेदायक ठरू शकणाऱ्या कर्णधार बाबर आझमसाठी खास व्यूहरचना आखावी लागेल. कोणत्याही क्षणी सुसाट सुटणाऱ्या आझमच्या अफाट बॅटला लगाम घालावा लागेल. टी-२० या छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय गोलंदाजांची ही मोठीच कसोटी असेल. संभाव्य आक्षेपार्ह शेरेबाजीकडेही (स्लेजिंग) भारतीयांना दुर्लक्ष करावे लागेल. या साऱ्या पार्श्वभूमीवर 'बचके रहना रे बाबा, बचके रहना रे...' असेच टीम इंडियाला सांगावेसे वाटते, निश्चितच.

कोणताही चषक मिळाला नाही तरी चालेल; पण कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजयी व्हायचेच, अशीच मानसिकता भारत - पाकिस्तान सामन्यात खेळाडू आणि समर्थक यांची असते. त्यामुळे खेळाला आगळीच रंगत प्राप्त होत असते. म्हणून तर अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागलेले असते.

तेव्हा घोडा मैदान जवळच आहे. कोणाचा घोडा बाजी मारतो, याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे, खरोखरच.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in