पहिल्या क्वालिफायर सामन्याद्वारे दोन्ही संघ अंतिम प्रवेशास उत्सुक

 पहिल्या क्वालिफायर सामन्याद्वारे दोन्ही संघ अंतिम प्रवेशास उत्सुक

आयपीएल २०२२ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मंगळवारी गुजरात टायटन्सला राजस्थान रॉयल्स भिडणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचणार आहे, तर पराभूत संघाला २७ मे रोजी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात एलिमिनेटरच्या विजेत्याशी लढून अंतिम प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ याच सामन्याद्वारे अंतिम प्रवेशास उत्सुक असणार आहेत. लीग सामन्यांमध्ये या दोन्ही संघांनी वर्चस्व प्रस्थापित केल्याचे गुणतालिकेतील त्यांच्या क्रमवारीतूनच लक्षात येते. गुजरातने १४ सामन्यांपैकी १० सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले. त्यामुळे त्यांच्याकडून प्ले ऑफ फेरीतही चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. तरीही त्यांना फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्यांना मजबूत पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. या क्रमांकावर आतापर्यंत मॅथ्यू वेड, साई सुदर्शन आणि स्वत: कर्णधार हार्दिक पंड्या हे खेळलेले आहेत; परंतु अपेक्षित कामगिरी करण्यात त्यांना अपयश आले. थेट अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल, तर गुजरातला या समस्येवर तोडगा काढावा लागेल.

राजस्थान रॉयल्सने १४ पैकी नऊ सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले. सुरुवातीचे सामने त्यांना सलामीवीर जॉस बटलरच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर जिंकता आले. बटलरने पहिल्या सात सामन्यात ४९१ धावांचे योगदान दिले; परंतु नंतरच्या सामन्यांमध्ये केवळ १३८ धावा केल्या. थेट अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर त्यांना बटलरकडून अपेक्षा बाळगाव्या लागतील. बटलर जर फॉर्ममध्ये परतला नाही, तर राजस्थानची वाट बिकट होऊ शकते. हा संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज खेळवत आला आहे. रविचंद्रन अश्विनने अष्टपैलूची उणीव तशी भरून काढली आहे; परंतु एका चूक संपूर्ण हंगामातील कामगिरीवर पाणी ओतण्यास कारणीभूत ठरू शकते, याची जाणीव राजस्थानला ठेवावी लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in