ब्रेथवेटचे ते चार षटकार आणि विंडीजची हॅटट्रिक

भक्कम शरीरयष्टीच्या ब्रेथवेटने स्टोक्सच्या पहिल्याच चार चेंडूंवर सलग चार षटकार लगावून वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावून दिला
 ब्रेथवेटचे ते चार षटकार आणि विंडीजची हॅटट्रिक

२०१६चा ट्वेन्टी-२० विश्वचषक. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरू असलेली अंतिम फेरी. अखेरच्या षटकात विंडीजला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता. चेंडू बेन स्टोक्सच्या हाती, तर स्ट्राइकवर तसा नवखा व प्रामुख्याने गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा कार्लोस ब्रेथवेट. यानंतर जे घडले त्याने अवघ्या क्रीडाविश्वाला अचंबित करून सोडले.

उंचपुऱ्या आणि तितक्याच भक्कम शरीरयष्टीच्या ब्रेथवेटने स्टोक्सच्या पहिल्याच चार चेंडूंवर सलग चार षटकार लगावून वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावून दिला. विंडीजने २०१६ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक, महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचीसुद्धा करामत केली. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे विश्वचषक जेतेपदांची हॅट्‌ट्रिक साकारली. डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील विंडीजचा हा संघ त्यानंतर पुन्हा कधीच एकत्र खेळला नाही, हेही खरे.

८ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान भारतात झालेल्या या विश्वचषकात विंडीजचा संघ सहभागी होण्याची शक्यताही कमी होती. त्यांचे क्रिकेट बोर्डाशी सुरू असलेले वादविवाद तसेच आर्थिक मंदी यामागील मुख्य कारण होते. मात्र बीसीसीआयने पुढाकार घेतल्यामुळे विंडीजचा संघ भारतात दाखल झाला. त्यांना क्रिकेटचे कीटसुद्धा बीसीसीआयनेच पुरवले. त्यामुळेच विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सॅमी बीसीसीआय तसेच भारतीय चाहत्यांचे आभार मानणे विसरला नाही. विंडीजने त्या विश्वचषकात फक्त गटसाखळीत अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव सामना गमावला. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांना धूळ चारल्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत भारतालाही नमवले. अखेरीस पुन्हा इंग्लंडवरच सरशी साधून त्यांनी जेतेपद मिळवले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक असताना वेस्ट इंडिजचा यावेळी त्या कामगिरीचा कित्ता गिरवण्यास उत्सुक असेल, मात्र यंदा विंडीजला पात्रता फेरीचा अडथळा ओलांडणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in