
कॅलगरी : भारताच्या २१ वर्षीय लक्ष्य सेनने अखेर गेल्या वर्षापासूनचा दुष्काळ संपुष्टात आणताना जेतेपदाचे ध्येय साध्य केले. कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावताना लक्ष्यने ऑल इंग्लंड विजेत्या खेळाडूवर वर्चस्व गाजवून संपूर्ण विश्वाला आपण पुन्हा एकदा लयीत परतल्याचे दाखवून दिले.
५०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत रविवारी मध्यरात्री झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्यने चीनच्या ली शी फेंगला २१-१८, २२-२० अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. २३ वर्षीय फेंगने यंदा ऑल इंग्लंड ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली होती. तसेच जागतिक क्रमवारीत तो १०व्या स्थानी आहे. तरीही क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने फेंगला ५० मिनिटांत नेस्तनाबूत केले. तसेच फेंगविरुद्धच्या आठपैकी पाच लढती लक्ष्यने जिंकल्या आहेत, हे विशेष.
उत्तराखंडच्या लक्ष्यने गतवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर जवळपास १० स्पर्धांमध्ये लक्ष्यला अंतिम फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. यादरम्यानच त्याच्या नाकावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याने तो काही काळ कोर्टपासून दूर होता.
कॅनडा स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्याने त्याचे मनोबल उंचावले व याचाच परिणाम निर्णायक लढतीतही दिसला. भारतासाठी या वर्षी एकेरीत एखादी स्पर्धा जिंकणारा तो दुसरा पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. मे महिन्यात एच. एस. प्रणॉयने मलेशिया मास्टर्स स्पर्धेचा किताब मिळवला होता. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने प्रणॉय व लक्ष्यचे यश भारतीयांसाठी सुखावणारे आहे.
बॅडमिंटनमध्ये सहा प्रकारच्या दर्जांच्या स्पर्धा खेळवण्यात येतात. यामध्ये वर्ल्ड टूर फायनल्स, १०००, ७५०, ५००, ३०० आणि १०० या सुपर दर्जा गुणांच्या स्पर्धेचा समावेश असतो. प्रत्येक स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूला जागतिक क्रमवारीत फायदा होतो व ऑलिम्पिक पात्रतेच्या आशाही बळावतात.
माझ्यासाठी ही कारकीर्दीतील सर्वाधिक आव्हानात्मक तसेच संस्मरणीय अंतिम फेरी होती. यंदाचे वर्ष ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर एकही स्पर्धा जिंकता न आल्याने मी काही काळ नक्कीच निराश होतो. मात्र आता या जेतेपदामुळे आगामी स्पर्धांसाठी आत्मविश्वास बळावला आहे.
- लक्ष्य सेन
लक्ष्यने दुसऱ्यांदा ५०० सुपर गुणांच्या दर्जाची स्पर्धा जिंकली. जानेवारी २०२२मध्ये त्याने इंडिया ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. एकंदर त्याचे है चौथे बीडब्ल्यूएफ जेतेपद आहे. २०१९मध्ये त्याने सार्लोलक्स आणि डच ओपन या १०० सुपर गुणांच्या स्पर्धा जिंकल्या होत्या.
अमेरिका ओपनमध्ये सिंधू, लक्ष्यवर भिस्त
कॅनडा ओपनमधील यश बाजूला सारून लक्ष्यला मंगळवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिका ओपनमध्ये पुन्हा एकदा दमदार खेळ करावा लागेल. त्याच्याशिवाय महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल. या स्पर्धेसाठी ३०० सुपर गुण असून बी. साईप्रणित, ऋत्विका गाडे, कृष्णाप्रसाद गर्ग- विष्णूवर्धन गौड हे भारतीय खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होतील.