'फिफा’ने घातलेली बंदी उठविण्याबाबत घातलेली बंदी उठविण्याबाबत केंद्र सरकारने ‘सक्रीय भूमिका’ पार पाडावी - सर्वोच्च न्यायालय

फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था असलेल्या फिफाने मंगळवारी भारतीय फुटबॉल संघटनेवर बंदी घातली
'फिफा’ने घातलेली बंदी उठविण्याबाबत घातलेली बंदी उठविण्याबाबत केंद्र सरकारने ‘सक्रीय भूमिका’ पार पाडावी -  सर्वोच्च न्यायालय

फिफा’ने (फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल फेडरेशन) भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) घातलेली बंदी उठविण्याबाबत आणि भारतातील नियोजित अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धा होण्याबाबत केंद्र सरकारने ‘सक्रीय भूमिका’ पार पाडावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. सरकार याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, ए. एस. बोपण्णा आणि जे. व्ही परिडवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने याबाबतचे निर्देश दिले. फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था असलेल्या फिफाने मंगळवारी भारतीय फुटबॉल संघटनेवर बंदी घातली. त्यामुळे भारतात ११ ते ३०ऑक्टोबर दरम्यान होणारा फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक बारगळण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारीच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सर्वोच्च न्यायालयात या विषयावर आपत्कालीन सुनावणी घेण्याची विनंती केली. ही विनंती स्वीकारून सुनावणी करण्यात आली.

फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेल्या बंदीमुळे भारताचे अनेक सामनेही धोक्यात आले आहेत. भारत २४ सप्टेंबरला व्हिएतनाम आणि २७ सप्टेंबरला सिंगापूरविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. बंदी उठवली नाही तर हे सामने रद्द होतील. त्याच वेळी, भारतीय महिला लीग चॅम्पियन संघ गोकुलम केरळला २३ ऑगस्ट रोजी एएफसी महिला क्लब चॅम्पियनशिपमध्ये उझबेकिस्तान क्लबशी खेळायचे आहे. त्यानंतर पुढचा सामना इराणी क्लबशी आहे.

गोकुलम केरळही मंगळवारी ताश्कंदला पोहोचले आहे. मोहन बागान क्लबचा एएफसी चषक आंतरविभागीय उपांत्यफेरीचा ७ सप्टेंबरला होणारा सामनाही अडचणीत आला आहे. एफसी अंडर-२० क्वालिफायर सामने १४ सप्टेंबरपासून इराकमध्ये होणार आहेत. भारताला इराक, ऑस्ट्रेलिया, कुवेत या देशांकडून सामने खेळायचे आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in