अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सीएसकेमध्ये परतण्याची शक्यता धूसर

हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्याच्या खांद्यावर सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती
 अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सीएसकेमध्ये परतण्याची शक्यता धूसर

चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सीएसकेमध्ये परतण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. दरम्यान, जडेजाला इतर मोठ्या फ्रँचायझींकडून विचारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जडेजासाठी यंदाचा आयपीएल हंगाम निराशाजनक ठरला. हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्याच्या खांद्यावर सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती; मात्र हंगाम अर्ध्यावर आल्यानंतर पुन्हा महेंद्रसिंहवर नेतृत्वाची जबाबदारी टाकण्यात आली. हा जडेजाचा अपमान असल्याची चर्चा सुरू झाली. जडेजाने दुखापतीचे कारण देत उरलेला हंगाम खेळण्याचे टाळले. त्यानंतर त्याने सीएसकेशी असलेले सर्व संबंध तोडले.

जडेजाने मुंबईतील सीएसकेचा संघ थांबलेले हॉटेल सोडले, तेव्हापासून त्याचे आणि फ्रँचायझींशी असलेले मतभेद दूर झालेले नाहीत. त्यानंतर जडेजाने सोशल मीडियावरील सीएसके संदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्याने महेंद्रसिह धोनीलादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

दरम्यान, धोनीने पुढचा आयपीएल हंगाम खेळण्याचे आणि संघाचे नेतृत्वदेखील करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे जडेजा पुन्हा सीएसकेमध्ये परतण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता जडेजाला इतर मोठ्या फ्रेंचायजींकडून विचारणादेखील होत आहे. सीएसकेचे व्यवस्थापन आणि धोनी यांनी जडेजाला शांत करत संघात कायम ठेवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सीएसकेच्या काही चाहत्यांचे मत आहे. जडेजा सीएसकेशी २०१२ पासून जोडला गेला आहे

त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याच्या सध्याच्या कामगिरीत सीएसकेचाही मोठा वाटा आहे. धोनीने जडेजाला त्याच्या बऱ्या-वाईट काळात कायम साथ दिली आहे. याच भावनिक मुद्द्याचा विचार करून हे प्रकरण नव्याने हाताळणे गरजेचे असल्याचे जडेजाच्या समर्थकांचे म्हणणे आहे. सध्या कर्णधार हवा असणारे संघ जडेजाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यात अधिकृतरीत्या बोलाचाली झालेल्या नाहीत. भारताच्या टी-२० संघातील जडेजाचे स्थान धोक्यात येऊ नये, म्हणूनच त्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता, असे सीएसके मॅनेजमेंट धोनीला पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in