चेतेश्वर पुजाराची नवी इनिंग; सोशल मीडियावर केली घोषणा

अनुभवी फलंदाज असलेल्या चेतेश्वरने कोणत्या संघाकडून खेळणार, याबाबत खुलासा केलेला नाही
चेतेश्वर पुजाराची नवी इनिंग; सोशल मीडियावर केली घोषणा

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा लवकरच एका नवीन संघासोबत खेळणार आहे. पुजाराने स्वतःचा एक फोटो ट्विटरवर शेअर करून याबाबतची माहिती दिली.

अनुभवी फलंदाज असलेल्या चेतेश्वरने कोणत्या संघाकडून खेळणार, याबाबत खुलासा केलेला नाही. हा फोटो शेअर करत या ३४ वर्षीय फलंदाजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही नवीन इनिंग सुरू करताना खूप छान वाटत आहे. तुम्ही माझ्या नवीन संघाच्या नावाचा अंदाज लावू शकता का? अधिक माहितीसाठी संपर्कात रहा!’

चेतेश्वरची गणना भारतातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत गेल्या काही दिवसांत भारताकडून खेळताना त्याला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलेले असले, तरी इंग्लंड कौंटी क्रिकेटकडून खेळताना त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत शानदार कामगिरी केली आहे.

चेतेश्वरने इंग्लंडच्या ससेक्स या कौंटी संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अलीकडेच चेतेश्वरने भारताच्या देशांतर्गत इराणी चषक स्पर्धेमध्ये सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आता चेतेश्वरने स्वत:च नव्या संघाकडून खेळण्याचे संकेत दिले आहेत.

चाहत्यांकडून तर्कवितर्क

दरम्यान, पुजाराच्या या ट्विटवर त्याचे चाहतेही कमेंट करून तर्कवितर्क व्यक्त करीत आहेत. पुजारा एका नव्या जाहिरातीत दिसणार असल्याचे अनेक चाहत्यांना वाटत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो सौराष्ट्र संघाकडून खेळू शकेल, अशी आशाही काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. चाहतेही त्याचे जोरदार कौतुक करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

पुजाराने भारतासाठी १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने १६८ डावांत ६ हजार ८१६ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये ९६ सामने खेळून पुजाराने १६४ डावांत ४३.८ च्या सरासरीने ६ हजार ७९२ धावा केल्या; तर वन-डे क्रिकेटमधील चार सामन्यांमध्ये ६.० च्या सरासरीने २४ धावा केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in