
भालाफेकीच्या वेळी परिस्थिती अनुकूल नव्हती. वाऱ्याचा वेग खूप जास्त असतानाही मी चांगली कामगिरी करेन, असा मला विश्वास होता, अशा भावना ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राने व्यक्त केल्या.
या स्पर्धेनंतर नीरजने माध्यमांशी संवाद साधला. नीरज म्हणाला की, मी निकालावर समाधानी आहे. मी माझ्या देशासाठी पदक जिंकू शकलो, याचा मला आनंद आहे. स्पर्धा खडतर होती. स्पर्धक चांगल्या सरासरीने मारा करत होते. ते सारे आव्हानात्मक होते. चौथ्या थ्रोच्या वेळी हवा प्रतिकूल होती. स्नायूही दुखावला गेल्याने मागे पडलो.
तो पुढे म्हणाला की, मी ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, याचे दडपण मला वाटले नाही. तिसऱ्या थ्रोनंतरही माझा स्वतःवर विश्वास होता. मी पुनरागमन केले आणि रौप्यपदक जिंकले; पण पुढच्या वेळी वेळी पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करेन.
सुवर्णपदक जिंकलेल्या अँडरसनचेही नीरजने यावेळी कौतुक केले. तो म्हणाला की, अँडरसनने ९० मीटर अंतर पार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असेल. ९० मीटरच्या वर अनेक चांगले थ्रो फेकत तो यावर्षी जागतिक आघाडीवर आहे. त्याने खूप मेहनत घेतली याचा मला आनंद आहे. हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.
त्याने स्पष्ट केले की, मी आज खूप काही शिकलो. सुवर्णपदकाची भूक कायम राहील; पण प्रत्येक वेळी आपल्याला सुवर्णपदक मिळू शकत नाही. मी जे करू शकतो ते करेन, माझ्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करेन.