Paris Olympics 2024 : अपात्रतेची कारवाई विनेशच्याच चुकीमुळे - सायना नेहवाल

भारताची माजी बॅडमिंटनपटू तसेच ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवालने या प्रकरणात विनेशचीच चुकी असल्याचे म्हटले आहे.
Sania Nehwal On Vinesh Phogat
संग्रहित चित्र
Published on

नवी दिल्ली : १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने पदकाला मुकलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटची सध्या भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे. यामध्ये बहुतांश जण विनेशला पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र भारताची माजी बॅडमिंटनपटू तसेच ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवालने या प्रकरणात विनेशचीच चुकी असल्याचे म्हटले आहे.

२९ वर्षीय विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीच्या दिवशी १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला अपात्र ठर‌वण्यात आले. तसेच तिला पदकही देण्यात आले नाही. त्यामुळे विनेशने निवृत्ती जाहीर केली. विनेशने याबाबतीत न्यायालयात धाव घेतल्यानंतर तूर्तास यावर अंतिम सुनावणी झालेली नाही.

“विनेशच्या कारकीर्दीतील ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. त्यामुळे एक खेळाडू म्हणून तिला सर्व नियम ठाऊक असणे स्वाभाविक होते. तिच्याकडून मोठी चूक घडली आहे. तसेच यामध्ये सहाय्यक चमूचाही दोष आहे. तिचे वजन कसे वाढले याविषयी मला फारशी माहिती नाही. मात्र या प्रकरणी दोष विनेशचा आहे,” असे सायना म्हणाली.

काही दिवसांपूर्वी हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर या माजी क्रिकेटपटूंनी विनेशला पाठिंबा दर्शवला होता. मात्र सायनाने तिचे दु:ख कळत असले तरी विनेशने काळजी घ्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे.

विनेशला किमान रौप्यपदक द्यावे!

“विनेशला किमान रौप्यपदक देण्यात यावे. कुस्तीचा नेमका नियम काय आहे, मला ठाऊक नाही. मात्र विनेश उपांत्य लढतीपर्यंत नियमांत राहूनच खेळली व जिंकत आली. त्यामुळे अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली असली तरी रौप्यपदक तिला मिळायलाच हवे,” अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुलीने विनेशची पाठराखण केली. त्याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता माजी नेमबाज अभिनव बिंद्रा, युवराज सिंग यांनीही आपपल्या परीने विनेशला पाठिंबा दर्शवला होता. सायनाने मात्र विनेशच्या चुकीकडे बोट दाखवल्याने तिच्यावर चाहत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in