वन-डे मालिकेत बरोबरी;दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट‌्स राखून विजय

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे दोन्ही सलामीवीर ४८ धावात माघारी परतले होते.
वन-डे मालिकेत बरोबरी;दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट‌्स राखून विजय

तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट‌्स आणि २५ चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे मंगळवारी दिल्ली येथे होणारा शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. विजयासाठीचे २७९ धावांचे लक्ष्य भारताने ४५. ५ षटकांत तीन गडी बाद २८२ धावा करीत साध्य केले. ईशान किशन (८४ चेंडूंत ९३) आणि श्रेयस अय्यर (१११ चेंडूंत नाबाद ११३) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. १० षटकात एक निर्धाव षटक टाकत ३८ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजची गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली. सामनावीर श्रेयस अय्यरने शानदार नाबाद शतक झळकविताना १५ चौकार लगावले. त्याला संजू सॅमसने (३६ चेंडूंत नाबाद ३०) दमदार साथ दिली.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे दोन्ही सलामीवीर ४८ धावात माघारी परतले होते. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शिखर धवन (८४ चेंडूंत ९३ ) वेन पारनेलचा शिकार झाला. त्याला पारनेलने त्रिफळाचीत केले. शुभमन गिलचा (२६ चेंडूंत २८ ) जम बसलेला असतानाच नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर कगिसो रबाडाने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला.

त्यानंतर श्रेयस अय्यर आणि र्इशान किशन यांनी भारताचा डाव सावरत दमदार भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. एकविव्या षटकात भारताचे शतक धावफलकावर झळकले. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर र्इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी धावगती वाढविण्यास सुरूवात केली. या दोघांनी अर्धशतके पूर्ण करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. र्इशानने नॉर्त्जेची जबरदस्त पिटाई केली. र्इशान किशन ८६ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. रबाडाने स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल सोडला. परंतु ३५ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर र्इशान बाद झाला. फॉच्युईनच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल हेंड्रिक्सने टिपला. र्इशानने ८४ चेंडूंत ९३ धावा करताना सात षटकार आणि चार चौकार लगावले.

त्याआधी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर निर्धारित ५० षटकांत ७ बाद २७८ धावा करून भारतासमोर २७९ धावांचे आव्हान दिले.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली होती. सलामीवीर क्विंटन डिकॉक (८ चेंडूंत ५) आणि जानेमन मलान (३१ चेंडूंत २५) लवकर बाद झाले. ९.५ षटकांत २ बाद ४० धावा अशी अवस्था झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी सावध पवित्रा घेतला. एडेन मार्कराम आणि रीजा हेंड्रिक्सने मोठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. हेंड्रिक्सने आक्रमक पवित्रा घेत अर्धशतक झळकविले. त्यानंतर मार्करमनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूत १२९ धावांची शानदार भागीदारी झाली.

मोहम्मद सिराजने ३२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हेंड्रिक्सला बाद केले. शाहबाझ अहमदने त्याचा झेल टिपला. ७६ चेंडूंत ७४ धावा करताना एक षटकार आणि ९ चौकार लगावले. हेंड्रिक्स बाद झाल्यानंतर आलेल्या यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेनने आक्रमक पवित्रा घेतला. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने त्याला ३० धावांवर बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने एडेन मार्करमला धवनमार्फत बाद केले. त्याने ८९ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यानंतर डेव्हिड मिलर (३४ चेंडूंत नाबाद ३५) आणि वेन पारनेल (२२ चेंडूत १६) यांनी धावगती वाढविण्याचे जोरदार प्रयत्न केले; मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकात टिच्चून मारा करत या दोघांना जखडून ठेवले. शार्दुल ठाकूरने वेन पार्नेलला बाद केले.

अष्टपैलू शाहबाज अहमद याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना एक गडी बाद केला. सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकात एक निर्धाव षटक टाकत आणि ३८ धावा देत तीन गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराजने सांभाळली. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला होता. या पराभवानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in