
स्वत:च्याच मायभूमीत २००९मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इंग्लंडवर सुपर-आठमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की अोढवली. २००७नंतर २००९मध्ये सुद्धा इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यावर त्यांच्यावर चोहीकडून टीका करण्यात येत होती. क्रिकेटचा जन्मदाता असूनही इंग्लंड आयसीसी स्पर्धांमध्ये कच खायचा. परंतु २०१०चा ट्वेन्टी-२० विश्वचषक इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला. कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला नमवून पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरणाऱ्या इंग्लंडच्या वाटचालीचा घेतलेला हा वेगवानआढावा.
वेस्ट इंडिज येथे ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान झालेल्या या विश्वचषकात पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला पहिल्याच साखळी लढतीत वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला. मात्र आयर्लंडला नमवून त्यांनी गटातील दुसऱ्या स्थानासह सुपर-आठ फेरीत प्रवेश केला. तेथे इंग्लंडने कामगिरी उंचावून सलग तिन्ही सामने जिंकताना पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडला धूळ चारली. केव्हिन पीटरसनने इंग्लंडसाठी मोलाचे योगदान दिले.
उपांत्य फेरीत इंग्लंडने श्रीलंकेवर सात गडी राखून वर्चस्व गाजवले. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला रोमहर्षक लढतीत नमवले होते.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड हसीने दमदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर मात्र इंग्लंडने १७ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. क्रेग किसवेटरने ६३, तर पीटरसनने ४७ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे इंग्लंडने प्रथमच विश्वचषकावर नाव कोरले. किसवेटर सामनावीर, तर स्पर्धेत सर्वाधिक २४८ धावा करणारा पीटरसन सर्वोत्तम खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीसुद्धा इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. ते २०१०च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी होणार का, याचे उत्तर लवकरच मिळेल. इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांच्यासह अ-गटात समावेश करण्यात आला आहे.