England-Sri Lanka Test Series: इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनने (६२ धावांत ५ बळी) केलेल्या दमदार माऱ्यापुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९० धावांनी दमदार विजय नोंदवला.
England-Sri Lanka Test Series: इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी
PTI
Published on

लंडन : वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनने (६२ धावांत ५ बळी) केलेल्या दमदार माऱ्यापुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९० धावांनी दमदार विजय नोंदवला. याबरोबरच इंग्लंडने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

इंग्लंडने दिलेल्या ४८३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच ८६.४ षटकांत २९२ धावांत आटोपला. दिनेश चंडिमल (५८), दिमुथ करुणारत्ने (५५), धनंजय डीसिल्व्हा (५०) यांनी अर्धशतके साकारूनही श्रीलंकेला पराभव टाळता आला नाही. पाच बळी घेणाऱ्या ॲटकिन्सनला ओली स्टोन व ख्रिस वोक्स यांनी दोन गडी टिपून चांगली साथ दिली.

दरम्यान, इंग्लंडचा दुसरा डाव ५४.३ षटकांत २५१ धावांवर आटोपला. जो रूटने सलग दुसऱ्या डावात शतक साकारताना १२१ चेंडूंत १० चौकारांसह १०३ धावा केल्या. हॅरी ब्रूक (३७) व जेमी स्मिथ (२६) यांनीही योगदान दिले. पहिल्या डावात इंग्लंडने रूट व ॲटकिन्सन यांच्या शतकाच्या बळावर ४२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, त्यांनी श्रीलंकेला १९६ धावांत गुंडाळून मोठी आघाडी मिळवली. त्यामुळे दुसरा डाव २५१ धावांवर संपुष्टात आल्यावरही त्यांनी श्रीलंकेपुढे विजयासाठी ४८३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. ॲटकिन्सन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांतील तिसरी कसोटी ६ सप्टेंबरपासून सुरू होईल.

logo
marathi.freepressjournal.in