भारताच्या बॅडमिंटनपटूंना अपयश; सुवर्णपदक हुकले,रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत मलेशियाविरुद्धच्या अंतिम फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक रंकीरेड्डी यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या
भारताच्या बॅडमिंटनपटूंना अपयश; सुवर्णपदक हुकले,रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या सांघिक सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने दमदार कामगिरी करत विजय मिळविला; पण भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळेच भारताचे सुवर्णपदक हुकले आणि अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाने भारताला ३-१ असे पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले.

बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत मलेशियाविरुद्धच्या अंतिम फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक रंकीरेड्डी यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. या दोघांनी मलेशियाच्या टेंग फाँग आणि वुई इक सो यांच्याविरुद्ध दमदार सुरुवातदेखील केली होती. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या: पण मलेशियन जोडीने त्यांना १५-२१ असे पराभूत केले. सामन्यातील पहिला गेम अतिशय रंगतदार झाला; पण भारताला पहिल्या गेममध्ये तीन गुणांनी पराभव पत्करावा लागला. भारताने पहिला १८-२१ असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही भारताची जोडी ७-११ अशी पिछाडीवर राहिली. त्यानंतर दुसरा गेम या जोडीने १५-२१ असा गमावला आणि भारत ०-१ असा पिछाडीवर पडला.

अव्वल बॅडमिंटपटू सिंधूने लौकिकाला साजेसा दमदार खेळ केला. सिंधूने मलेशियाच्या गोह जिन वेईवर दोन गेम्समध्ये विजय मिळविला. सिंधूने पहिल्या गेममध्ये २२-२० अशी सरशी साधली. या पहिल्या गेममध्ये सिंधू आणि वेई यांच्यात जोरदार संघर्ष झाला. सिंधूने आपल्या अनुभवाच्या जोरावर हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने शानदार खेळ केला. दुसरा गेम सिंधूने २१-१७ असा जिंकत वेईवर विजय साकारला. सिंधूच्या विजयामुळे भारताला मलेशियाबरोबर १-१ अशी बरोबरी करता आली.

किदाम्बी श्रीकांतकडून मोठ्या अपेक्षा असतानाच त्याचा मलेशियाच्या टिझयंगकडून १९-२१, २१-६ आणि १६-२१ असा पराभव झाला आणि भारत पुन्हा १-२ने पिछाडीवर गेला. त्यानंतर महिला दुहेरीच्या सामन्यात गायत्री गोपीचंद आणि थ्रीसा जॉली यांना मलेशियाच्या काँग ली पेअरली टॅन आणि मुलरीथर थिन्नाह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या जोडीने भारतीय जोडीचा पहिल्या गेममध्ये २१-१८ असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये जॉली आणि गोपीचंद यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांनी सामना ८-८ असा बरोबरीत आणला; मात्र त्यानंतर मलेशियाच्या जोडीने जोरदार पुनरागमन करत सात गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा भारताच्या जॉली आणि गोपीचंद जोडीने सामना १७-१८ असा फरक कमी केला; मात्र मलेशियाच्या जोडीने सामना २१-१७ असा जिंकत सुवर्णपदकावर कब्जा केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in