
नवी दिल्ली : भारताचे माजी डावखुरे फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. निधनासमयी ते लंडनमध्ये होते.
दिलीप यांनी वयाच्या ३२व्या वर्षी भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यांनी ३३ कसोटी सामन्यांत भारतासाठी ११४ बळी मिळवले. तसेच १५ एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर २२ बळी आहेत. बंगाल आणि सौराष्ट्रसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या दिलीप यांनी इंग्लंडच्या कौंटी स्पर्धेत वॉर्कशायर व नॉटिंघमशायरचेही प्रतिनिधित्व केले. दिलीप यांच्या निधनापश्चात भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
दिलीप यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर स्पिन पंच नावाचे आत्मचरित्रही आहे. १९७९ ते १९८३ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. बिशनसिंग बेदींसह अनेक तारांकित फिरकीपटू त्यावेळी भारतीय संघात होते. त्यामुळे दिलीप यांना भारतासाठी फारशी संधी लाभली नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीही दिलीप यांना आदरांजली वाहिली.
“दिलीप यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झाले. ते क्रिकेटपटूसह एक माणूस म्हणूनही तितकेच उत्तम होते. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमी स्मरणात राहील,” असे बिन्नी म्हणाले.
दिलीप यांनी १९७९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात १०३ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. १९८१ च्या मेलबर्न कसोटीत त्यांची उत्कृष्ट कामगिरी झाली, जिथे त्यांनी पाच विकेट्स घेतल्या आणि भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. निवृत्तीनंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले आणि त्यांना तेथे व्यवसायात यश मिळाले.