
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला अवघे काही दिवस उरलेले असतानाच चार निष्णात खेळाडूच या स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचा जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, श्रीलंकेचा दुष्मंथा चमिरा, पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. यामुळे आशिया चषक स्पर्धेबाबत चाहत्यांचा हिरमोड झाल्यासारखे दिसत आहे.
श्रीलंकेचा दुष्मंथा चमिरा सोमवारी स्पर्धेतून बाहेर पडल्याचे वृत्त आले. चमिराची श्रीलंकेच्या संघात निवड झाली होती; मात्र सरावादरम्यान पायाला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.
भारताचा जसप्रीत बुमराहच्या या स्पधेतून बाहेर पडला. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला. गतवर्षी विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात आफ्रिदीची महत्त्वाची भूमिका होती आणि अशा परिस्थितीत पाकिस्तानला त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. बुमराह बाहेर पडल्यानंतर स्पर्धेची आणि विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ काहीशी कमी झाल्यासारखे चाहत्यांना वाटत आहे
आशिया चषक २०२२बाबत सर्वाधिक उत्सुकता आणि चर्चा २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीचा विजेता कोण होणार, याचीच आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर या सामन्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे; मात्र आता खेळाडूंच्या दुखापतीची चर्चा होत असल्याने उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे.
हर्षल पटेलच्या दुखापतीमुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे. हर्षलची या स्पर्धेसाठी निवड होणे निश्चित होते. त्याने डी-२०मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून विशेष ठसा उमटविला आहे. त्याने गेल्या वर्षी यूएईमध्ये चमकदार कामगिरी केली होती.