आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल स्टार्ट टू एंड फूल फाॅममला

आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल स्टार्ट टू एंड फूल फाॅममला

आयपीएलच्या एका संपूर्ण सीरिजमध्ये सर्वात जास्त बळी मिळवण्याचा २०२१ मधला रेकॉर्ड यावेळच्या आयपीएलमध्ये तुटू शकेल काय? २०२१ला खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत गुजरातच्या हर्षल पटेल या मध्यम गतीच्या गोलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना १५ सामन्यांमध्ये १४.३४च्या सरासरीने ३२ बळी मिळवले होते. हा एक रेकॉर्ड होता. अर्थात, अजूनही तो कायम आहे; पण यावेळच्या आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल या राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या लेगब्रेक गुगली गोलंदाजाने १४ सामन्यांमध्ये १६.५३च्या सरासरीने २६ बळी मिळवले आहेत. त्याला हर्षल पटेलचा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी आणखी सात बळींची गरज आहे. २४ मे २०२२ ला कोलकातामध्ये चहलच्या राजस्थान रॉयल्सचा मुकाबला गुजरात टायटन्स संघाबरोबर होणार आहे. या सामन्यात चहलला आपल्या बळींची संख्या वाढवून घेण्याची पूर्ण संधी आहे. आयपीएलमध्ये यापूर्वी चहलने स्वत: एका संपूर्ण सत्रात जास्त बळी २०१५ ला घेतले होते. त्यावेळी त्याने १५ सामन्यांमध्ये १८.०४ च्या सरासरीने २३ बळी मिळवले होते. हा स्वत:चाच वैयक्तिक रेकॉर्ड त्याने यावेळच्या आयपीएलमध्ये मोडला आहे.

आयपीएलच्या एका संपूर्ण सत्रात हर्षल पटेलप्रमाणे ड‌्वेन ब्राव्हाेनेदेखील ३२ बळी मिळवले आहेत; पण सर्वोत्तम सरासरीच्या दृष्टीने पाहता यात हर्षल पटेल अधिक सरस ठरला होता. ड‌्वेन ब्राव्होने १८ सामन्यांमध्ये १५.५३च्या सरासरीने ३२ बळी मिळवले होते. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने ही कमाल करून दाखवली होती. २०२२च्या आयपीएलमध्ये मात्र युजवेंद्र चहल चांगलाच चमकतोय. त्याने या स्पर्धेत सुरुवातीपासून जी पकड बनवून ठेवली आहे, ती त्याने कायम ठेवली आहे. त्याच्या राजस्थान रॉयल्स संघाने या स्पर्धेत खेळलेले एकूण नऊ सामने जिंकले असून पाच सामने गमावले आहेत. १८ पाॅईंटच्या बळावर हा संघ अंकतालिकेत सध्या गुजरात टायटन्सनंतरच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचे काही अंशी श्रेय युजवेंद्र चहलकडे जरूर जाते. त्याच्या याच शानदार फॉर्ममुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

३२ वर्षीय चहल अलीकडच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये विशेष फॉर्म दाखवत नव्हता. २०१९ पासूनच्या प्रत्येक वर्षी तो साधारणच कामगिरी करत आला आहे. २०१९ला त्याने टी-२०च्या नऊ सामन्यांमध्ये आठ, त्यानंतर २०२० ला नऊ सामन्यांमध्ये सात बळी घेतले. २०२१ला त्याला पाच सामन्यांमध्ये पाच आणि २०२२ला चार सामन्यांमध्ये चार बळीच मिळवता आले होते. या साधारण कामगिरीमुळे त्याच्यावर टीकाही झाली होती; पण आपली ही कसर त्याने यावेळच्या आयपीएलमध्ये भरून काढली. आयपीएलमधला त्याचा यावेळचा फॉर्मच त्याला भारताच्या टी-२० संघात घेऊन आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या टी-२०च्या सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलच्या कामगिरीचा टीम इंडियाला बऱ्यापैकी फायदा करून घेता आला आहे. त्याने यात खेळलेल्या एकूण ५४ सामन्यांमध्ये २५.३३ च्या सरासरीने ६८ बळी घेतले आहेत. टी-२०ची सुरुवात त्याने चांगली केली होती. २०१७ला त्याने भारताकडून खेळलेल्या ११ टी-२०च्या सामन्यांमध्ये २३ आणि २०१८ च्या १३ सामन्यांमध्ये १८ बळी घेतले होते. या दोन वर्षांनंतर तो टी-२०मध्ये थोडा लडखडायला लागला; पण त्याच्याच उपस्थितीत खेळल्या गेलेल्या या ५४ टी-२०च्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला ३७ विजय आणि १५ पराभव स्वीकारावे लागले. चहल तसा भारतीय संघाला टी-२०मध्ये फायदेशीरच ठरला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय टी-२०मधील स्वत:ची सर्वोत्तम गोलंदाजी १ फेब्रुवारी २०१७ला बंगळुरूमध्ये पाहायला मिळाली होती. तेव्हा त्याने त्या सामन्यामध्ये आपल्या चार षट्कांच्या गोलंदाजीत २५ धावा देत इंग्लंडचे सहा बळी घेतले होते. सॅम बिलिंग्ज ०, जो रूट ४२, इयॉन मॉर्गन ४०, बेन स्टोक्स ६, मोईन अली २ आणि क्रीस जॉर्डन ० अशा एकूण सहा फलंदाजांना त्याने बाद करून इंग्लंड संघाला १२७ धावांमध्येच गुंडाळलं. हा सामना भारताने ७५ धावांनी जिंकला. २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांनंतर मात्र चहलच्या फॉर्ममध्ये संकटे आली. त्याला मनासारखा फॉर्म मिळवता येत नव्हता; पण २०२२ च्या आयपीएल स्पर्धेने पुन्हा त्याच्यातली उमेद जागृत केली आहे. आयपीएलमधील त्याचा फॉर्म त्याला भारताच्या टी-२० संघात जागा देऊन गेला. चहलने आपली शेवटी टी-२० सीरिज भारतातच श्रीलंका संघाविरुद्ध खेळली होती. त्यात त्याला दोन सामन्यांमध्ये फक्त दोन बळीच मिळवता अाले होते. त्याच्या अगोदरच्या भारतातच खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये चहलला ३२.५०च्या सरासरीने दोनच बळी मिळवता आले होते; पण या दोन्ही सीरिजमध्ये भारताचा विजय झाला होता म्हणून चहलच्या फ्लॉप शोकडे डोळेझाक झाली होती; पण हाच चहल आता आयपीएलमधल्या फॉर्ममुळे पुन्हा एकदा चर्चेत येतोय. बघू या, यावेळच्या आयपीएलमधल्या उरलेल्या सामन्यांमध्ये चहल आणखी किती बळी वाढवतोय. हर्षल पटेलच्या ३२ बळींच्या तो जर पुढे गेला तर तो आयपीएलमधला नवा रेकॉर्ड होऊ शकतो. युजवेंद्र चहल यावेळच्या आयपीएलमध्ये खरंच ‘स्टार्ट टू एंड’ फूल फॉर्मला दिसतोय.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in