
भारताने , श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाचा पाच विकेट्स राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारतीय महिलांनी विजयासाठीचे १२६ धावांचे लक्ष्य १९.१ षट्कांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात साध्य केले. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने ३९, तर हरमनप्रीत कौरने नाबाद ३१ धावा केल्या. तिने एक विकेटही मिळविली. हरमनप्रीतला ‘प्लेअर ऑफ दि मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.
भारताला चौदाव्या षट्कात पहिला धक्का बसला. सलामीवीर शेफाली वर्मा १० चेंडूंत १७ धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि सभिनेनी मेघना यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र सुगंधिका कुमारीने मेघनाला सहाव्या षट्कात १७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर स्मृतीने हरमनप्रीत कौरबरोबर शानदार भागीदारी रचली. स्मृती मानधना अर्धशतकाकडे वाटचाल करीत असताना रनवीराने तिला ३९ धावांवर बाद केले.
यानंतर कर्णधार कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला विजयापर्यंत पोहोचविले. तिने ३२ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. तिला यस्तिका भाटिया (१८ चेंडूंत १३), दिप्ती शर्मा (५ चेंडूंत नाबाद ५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (६ चेंडूंत ३) यांनी साथ दिली. श्रीलंकेकडून रणसिंगे आणि रनवीरा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ७ बाद १२५ धावा केल्या. सलामीवीर विशमी गुणरत्ने आणि चामरी आटापटू यांनी ८७ धावांची सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजांना १४व्या षट्कापर्यंत झुंजवत ठेवले. चौदाव्या षट्कात चामरी बाद झाली. तिने ४१ चेंडूत ४३ धावा केल्या. सतरावे षट्क संपताना बाद झालेल्या विशमीने ५० चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले. हरमनप्रीतने विशमीला बाद केले.
त्यानंतर १७ षट्कात २ बाद १०६ धावांवरून श्रीलंकेची अवस्था २० षट्कांत ७ बाद १२५ अशी झाली. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या, तर रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौरने यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविला.