टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून शानदार विजय

भुवनेश्वर कुमारने त्याची शानदार खेळी पाचव्या षट्काच्या अखेरच्या चेंडूवर संपविली.
टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून शानदार विजय

तिसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेिलयावर ६ िवकेटस राखून विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली. विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य भारताने १९.५ षटकांत चार बाद १८७ धावा करीत साध्य केले. विराट कोहली (४८ चेंडूंत ६३) आणि सूर्यकुमार यादव (३६ चेंडूंत ६९) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. अक्षर पटेलने ३३ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट‌्स मिळवत किफायती गोलंदाजी केली. हादिक पंड्याने (१६ चेंडूंत नाबाद २५)विजयी चौकार लगावला.

त्याआधी सलामीवीर कॅमेरून ग्रीन (२१ चेंडूंत ५२ धावा) आणि टीम डेव्हिड (२७ चेंडूंत ५४ धावा) यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षट्कांत ७ बाद १८६ धावा केल्या. त्यामुळे भारताला अर्थातच १८७ धावांचे आव्हान मिळाले. भारताकडून अक्षर पटेलने ३३ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट‌्स मिळविल्या. भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. कॅमेरून ग्रीनने जोरदार फटकेबाजी करत तीन षट्कांत तब्बल ४० धावा वसूल केल्या. चौथ्या षट्कातील तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला ७ धावांवर बाद करून कांगारूंना पहिला धक्का दिला. फिंचचा झेल पंड्याने टिपला.

धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या कॅमेरून ग्रीनने १९ चेंडूंत अर्धशतक झळकविले. भुवनेश्वर कुमारने त्याची शानदार खेळी पाचव्या षट्काच्या अखेरच्या चेंडूवर संपविली. ग्रीनचा झेल राहुलने टिपला. ग्रीनने २१ चेंडूंत ५२ धावा फटकविताना तीन षट्कार आणि सात चौकार यांची आतषबाजी केली. अक्षर पटेलने आठव्या षट्कातील चौथ्या चेंडूवर थेट चेंडूफेकीने धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला सहा धावांवर धावबाद केले. त्यानंतर अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर कार्तिकने चित्याच्या चपळाईने यष्टिचीत केले. स्मिथ १० चेंडूंत एका चौकारासह ९ धावा करून माघारी परतला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ८४ अशी झाल्यानंतर टीम डेव्हिड आणि जॉश इग्निस या दोघांनी कांगारूंचे शतक धावफलकावर लावले. २४ व्या षट्कातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने इग्निसला रोहितच्या हाती सोपविले. इग्निसने २२ चेंडूत २४ धावा करताना तीन चौकार लगावले. मॅ‌थ्यू वेडचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपून अक्षर पटेलने अवघ्या एका धावेवर त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठविले. टीम डेव्हिड फटकेबाजीच्या नादात २०व्या षट्कातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल रोहितने टिपला. डेव्हिडने २७ चेंडूंत ५४ धावा करताना चार षट्कार आणि दोन चौकार लगावले. १८ वे स्लॉग ओव्हर टाकणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या तीन चेंडूवर दोन षट्कार आणि एक चौकार मारत डेव्हिडने २१ धावा फटकविल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in