भारत पराभूत; आफ्रिकेचा पाच विकेट्स राखून विजय, लुंगी एनगिडी सामनावीर

भारताच्या सूर्यकुमार यादवने ४० चेंडूंत केलेल्या झुंजार ६८ धावा व्यर्थ ठरल्या.
भारत पराभूत; आफ्रिकेचा पाच विकेट्स राखून विजय, लुंगी एनगिडी सामनावीर

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत रविवारी झालोल्या तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. विजयासाठीचे १३४ धावांचे माफक लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने १९.४ षटकांत ५ बाद १३७ धावा करीत साध्य केले. २९ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स टिपणाऱ्या लुंगी एनगिडीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताच्या सूर्यकुमार यादवने ४० चेंडूंत केलेल्या झुंजार ६८ धावा व्यर्थ ठरल्या.

विजयासाठी निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना ५.४ षटकांत ३ बाद २४ अशा निराशाजनक सुरुवातीनंतरही दक्षिण आफ्रिकेने जोरदार मुसंडी मारत विजय साकार केला. एडन मार्करम (४१ चेंडूंत ५२) आणि डेव्हिड मिलर (४६ चेंडूंत नाबाद ५९) यांनी निर्धारित लक्ष्य गाठत विजयाचा कळस चढविला; तर लुंगी एनगिडीने विजयाचा पाया रचला. भारताच्या अर्शदीप सिंगने दोन विकेट‌्स मिळविले. शमी, हार्दिक, अश्विन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

त्याआधी, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे दोन्ही सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा (१४ चेंडूंत १५) व उपकर्णधार के. एल. राहुल (१४ चेंडूंत ९) झटपट बाद झाले. पाच षटकांतच दोन बाद २६ धावा अशी अवस्था झाली.

पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंहूवर रोहितला वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. १४ चेंडूंत केवळ १५ धावा करताना त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. रोहित झेलबाद झाल्यावर माजी कर्णधार व भारतातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा विराट कोहली मैदानावर उतरला. परंतु तो फार काळ टिकू शकला नाही.

राहुलला पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एनिगडीने मार्करममार्फत झेलबाद केले. त्यानंतर कोहलीने १२ धावा करताच टी-२० विश्वचषकात त्याच्या एक हजार धावा पूर्ण झाल्या. कोहली एक हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केल्यानंतर पुढच्या चेंडूवर झेलबाद होऊन परतला. सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर एनगिडीच्या गोलंदाजीवर त्याचा झेल रबाडाने टिपला.

भारताची अवस्था ८.३ षटकांत पाच बाद ४९ अशी झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांनी शानदार भागीदारी करून डाव सावरला. सोळाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही झेलबाद झाला. सूर्यकुमारने टी-२० विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक झळकविले. त्याने ४० चेंडूंत ६८ धावा करताना तीन षटकार आणि सहा चौकार लगावले. १९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. पार्नेलच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल केशव महाराजने टिपला. अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. लुंगी एनगिडीने २९ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स टिपले; तर पार्नेलने १५ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट‌्स मिळविले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in