डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताचा पराभव होण्याची शक्यता

भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू असलेल्या रामकुमारला अपेक्षेप्रमाणे खेळ साकारता आला नाही
 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताचा पराभव होण्याची शक्यता

रामकुमार रामनाथन याला विक्टर दुरासोव्हिच याच्याकडून सलग दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताचा डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जागतिक गटातील पहिल्या फेरीत भारतीय संघ नॉर्वेविरुद्ध ०-२ अशा पिछाडीवर पडला आहे.

भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू असलेल्या रामकुमारला अपेक्षेप्रमाणे खेळ साकारता आला नाही. अखेर एक तास १६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात रामकुमारला दुरासोव्हिच याने १-६, ४-६ असे सहज पराभूत केले. पहिल्या एकेरीच्या सामन्यात प्रज्ञेश गुणेश्वरन याला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावणाऱ्या कॅस्पर रूड याने १-६, ४-६ असे पराभूत केले होते.

आता भारताला विजय मिळवण्यासाठी पुढील तिन्ही लढती जिंकाव्या लागतील. रविवारी रंगणाऱ्या दुहेरीच्या लढतीत युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांच्यासमोर रुड आणि दुरासोव्हिच जोडीचे आव्हान असेल.

तसेच परतीच्या एकेरीच्या सामन्यात रामकुमारचा सामना रुडशी तर प्रज्ञेशची लढत दुरासोव्हिच याच्याशी होईल. जागतिक क्रमवारीत २७६व्या स्थानी असलेल्या रामकुमारला दुरासोव्हिचविरुद्ध आपली कामगिरी उंचावता आली नाही. जगात ३२५व्या क्रमांकावर असलेल्या दुरासोव्हिचने पहिल्याच सेटमध्ये तीन वेळा रामकुमारची सर्व्हिस मोडीत काढत हा सेट आपल्या नावावर केला. रामकुमारने दुसऱ्या गेममध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला.

पण दुसऱ्या गेममध्ये आपल्या सर्व्हिसवर गुण मिळवण्यात अपयशी ठरल्याने दुरासोव्हिचने २-१ अशी आघाडी घेतली. पुढे त्याने ती ५-४ अशी वाढवली. अखेर आपल्याच सर्व्हिसवर गुण मिळवून दुरासोव्हिचने दुसऱ्या सेटसह हा सामना सहज जिंकला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in