भारताची टी-२० मालिकेत आघाडी; दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेट‌्स राखून विजय

दुसऱ्याच षट्कातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला
भारताची टी-२० मालिकेत आघाडी; दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेट‌्स राखून विजय

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बुधवारी भारताने दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेट‌्स राखून विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विजयासाठीचे १०७ धावांचे माफक लक्ष्य भारताने १६.४ षट्कांत २ बाद ११० धावा करीत साध्य केले. के. एल. राहुल (५६ चेंडूंत नाबाद ५१ धावा) आणि सूर्यकुमार यादव (३३ चेंडूंत नाबाद ५० धावा) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. राहुलने विजयी षट्कार लगावला. पाहुण्यांचा डाव गुंडाळण्यात सामनावीर अर्शदीप सिंगने मोलाचा वाटा उचलला. त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळविल्या.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षट्कातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. रबाडाने त्याला डी कॉकच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा असतानाच सातव्या षट्कातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नॉर्टजेच्या गोलंदाजीवर उडालेला विराटचा झेल डी कॉकने टिपला. भारताची अवस्था २ बाद १७ अशी झाल्यानंतर राहुल आणि सूर्यकुमार यांनी मोलाची भागीदारी करीत भारताला विजयपथावर नेले. त्याआधी, तिरुवअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवरील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित षट्कात ८ बाद १०६ धावा केल्या. एका क्षणी ४२ धावांत सहा विकेट्स गमावलेल्या आफ्रिकी संघाला केशव महाराजने (३५ चेंडूंत ४१ धावा) शतकी धावसं‌ख्या गाठून दिली.

एडन मार्करम (२४ चेंडूंत २५ धावा) आणि वेन पारनेल (३७ चेंडूंत २४ धावा) यांनी मोलाचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन विकेट्स मिळविले. दीपक चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. अक्षर पटेलने एक फलंदाज बाद केला. दक्षिण आफ्रिकेच्या तब्बल चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये कर्णधार टेंबा बावुमा, रिले रुसो, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स हे भोपळाही न फोडता खेळपट्टीवरून चालते झाले.

पहिल्याच षट्कात वेगवान गोलंदाज दीपक चहरने दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. षट्काच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार टेंबा बावुमाला त्याने त्रिफळाचीत केले. दुसऱ्या षट्कात दक्षिण आफ्रिकेला आणखी तीन हादरे बसले.

अर्शदीप सिंगने सहा चेंडूंत तीन फलंदाज गारद केले. दुसऱ्या षट्काच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीपने क्विंटन डी कॉकला (४ चेंडूंत १ धाव) त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर अर्शदीपने रिले रुसोला (१ चेंडूंत ०) यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने डेव्हिड मिलरला (१ चेंडूत ०) त्रिफळाचीत केले. दोन षट्कांनंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था चार बाद आठ अशी दयनीय झाली. तिसऱ्या षट्काच्या तिसऱ्या चेंडूवर दीपक चहरने ट्रिस्टन स्टब्सला (१ चेंडूंत ०) दीपक चहरने अर्शदीप सिंगच्या हाती सोपविले. तीन षट्कांनंतर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद होऊन धावफलकावर ५ बाद १४ धावा दिसत होत्या. आठव्या षट्कात हर्षल पटेलने एडन मार्करमला (२४ चेंडूंत २५ धावा) पायचीत पकडले. मार्करमने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षट्कार लगावला. त्यानंतर नववे षट्कात अश्विनने निर्धाव टाकले. ९ षट्कांनंतर दक्षिण आफ्रिकेची ६ बाद ४२ अशी झाली. वेन पारनेल आणि केशव महाराज यांनी डावाला सावरण्याचे आटोकाट प्रयत्न केले. अक्षर पटेलने वेनला (३७ चेंडूत २४ धावा) झेलबाद करून ही जोडी फोडली. त्याचा झेल सूर्यकुमारने टिपला. वेनने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षट्कार मारला. वेनने केशव महाराजसोबत सातव्या विकेटसाठी ४७ चेंडूत २६ धावांची बहुमोल भागीदारी केली.

केशव महाराजने नंतर कागिसो रबाडाला साथीला घेऊन धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु धावसंख्या वाढविण्याच्या प्रयत्नात शेवटच्या षट्कातील पहिल्याच चेंडूवर केशव महाराज बाद झाला. त्याला हर्षल पटेलने त्रिफळाचीत केले. ३५ चेंडूंत ४१ धावांची झुंजार खेळी करताना केशवने दोन षट्कार आणि पाच चौकार लगावले. रबाडा आणि ॲनरिच नॉर्टजे हे अनुक्रमे सात आणि दोन धावांवर नाबाद राहिले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in