
पालेकेले : भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाला दमदार प्रारंभ झाला. त्यानंतर आता मंगळवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. उभय संघांत पालेकेले येथील स्टेडियमवर तिसरा टी-२० सामना रंगणार आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी टी-२० विश्वचषक जिंकल्यावर या प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतापुढे नव्याने संघबांधणीचे आव्हान होते. मात्र नवा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने दोन्ही सामन्यांत श्रीलंकेवर वर्चस्व गाजवले. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांनी फलंदाजीत छाप पाडली, तर गोलंदाजीत रवी बिश्नोई, अक्षर पटेल या फिरकीपटूंनी चमक दाखवली. तसेच हार्दिक पंड्यानेही उत्तम अष्टपैलू योगदान दिले. स्वत: सूर्यकुमार कर्णधारपदाचे दडपण झुगारून मुक्तपणे फलंदाजी करत आहे. त्यामुळे भारताचेच पारडे जड मानले जात आहे.
दुसरीकडे चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला मालिकेत संघर्ष करावा लागला. पथुम निसांका, कुशल परेरा यांनी चमक दाखवली. मात्र स्वत: असलंकासह गोलंदाजांनी निराशा केली आहे.
वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप